"पिचडांच्या" विरोधात "दोस्तीत कुस्ती", "महायुती" फक्त "नावाला", कोणी स्विकारीना "भाऊला"..!!


थांबा रे बाबांनो निवडून तर येऊद्या !

अकोले (प्रतिनिधी) :- 
               राज्याच्या निर्णयाने अकोल्यात "महायुती" झाली खरी. पण, पिचड साहेबांचा भाजप प्रवेश "मित्रपक्षांना" काही "पचता पचेनासा" झाला आहे. कोणी "रुसून" बसलय तर कोणी साहेबांच्या जवळ जायला. नको त्या थरावर जाऊ पहात आहे. कोणाला सत्तेत सहभाग हवा आहे. तर,  कोणाला "आर्थिक पाठबळ" वाढवायचे आहे. एकीकडे भाजपात उभी फुट पडली आहे. तर, राष्ट्रवादी साहेबांच्या विरोधीत एकवटून आली आहे. रिपाईने "शक्तीप्रदर्शन" केले. तर, त्यातून "बंडाचे निळे" निशान फडकू लागले आहे. ज्या शिवसेनेच्या भरवशावर पिचड साहेब "राजकीय गणिते" बदलू पहात आहेत. त्यात "एक ना दोन" तब्बल "चार गट" पडल्याचे दिसत आहे. दुसरीकडे रासप कोठे दिसेनात या सर्वांचा "सारासार" विचार करता.  सगळी "खिचडी" झाली असून. बंड, फुटातुट, कुरघोडी आणि नाराजी यातून फायदा होतो की तोटा. याचे "आत्मचिंतन" करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पिचडांच्या विरोधात "दोस्तीत कुस्ती" होत असून "महायुती" नुसतीच नावाला, अन, कोणी "स्विकारेना" भाऊला. अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागली आहे. एक मात्र नक्की, भाऊंना यशस्वी व्हायचे असेल तर. या "खिचडीच्या भरवशावर" अवलंबून न राहता. स्वत: "आरएसएस" प्रमाणे "बुथबांधनी" करावी लागणार आहे. असे "निष्ठावंतांना" वाटते आहे.

असून तोटा नसून फायदा !!

                 "चार घरचा पाहुणा, उपाशी मेला" !! ही म्हण सागळ्यांना ज्ञात आहे. तसेच चित्र महायुतीचे दिसू लागले आहे. एखादे काम "हा करेल, तो करेल" या भरवशावर कोणीच करत नाही. आणि महत्वाची कामे पेंडिंग पडू लागली आहेत. असे झाले तर वैभव पिचड यांना कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणाची मोठी किंमत चुकवावी लागेल. त्यामुळे महायुतीच्या खिचडीत साहेबांची मोठी गोची झाली आहे. मित्रपक्ष रिपाईला पिचडांनी विश्वासात घेतले नाही. म्हणून "संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांच्या बळाने ललकारी दिली.

एकला चलो रे..! 

        तर, रिपाईचे माजी तालुकाध्यक्ष "शांताराम संगारे" यांनी बंड पुकारुन रामदास आठवले यांच्या आदेशाला झिडकारुन डॉ. लहामटे यांना मदत करण्याची भुमिका घेतल्याचे बोलले जात आहे. संगारे यांना मनविण्यात  रिपाईचे राज्यसचिव विजय वाकचौरे यांना यश येते की नाही. ? तर, शिवसेनेच्या गोटातून मच्छिंद्र धुमाळ यांनी बाजीराव दराडे व मारुती मेंगाळ यांच्यावर तोफ डागविली आहे. त्यामुळे या दोघांच्या समर्थकांनी निषेधाचे बॅनर हाती घेतले आहे. तर, दुसऱ्या दिवशी मारुती मेंगाळ म्हणजे संबंध ठाकर समाज नाही. असे तुळशीराम कातोरे यांचे नावे पोष्ट फिरु लागली आहे. अर्थात कातोरे हे डॉ. नवले यांचे खंदे समर्थक आहे. त्यामुळे डॉक्टर व मेंगाळ हा जुना "मार्क्सवाद" तालुक्याला काही नवा नाही. यात आता पोळ्या भाजण्याचे काम सुरू झाले आहे.

एक दिवस प्रत्येकाचा येते !!

            यात एका डॉक्टरच्या वादाचा फायदा दुसऱ्या डॉक्टरला होऊ शकतो. असे बोलले जाते. तर माधवराव तिटमे यांचा "भगवा झेंडा" नेहमी एकला चलो रे..! असाच असतो. सतिश भांगरे यांनी भर बैठकीतून काढता पाय घेत. पिचडांच्या समर्थनाला जाहिर विरोध केला. तर, एक महत्वाची गोष्ट म्हणजे, माजी पोलीस अधिकारी मधुकर तळपाडे यांनी अद्याप स्वत:ची भुमिका स्पष्ट केली नाही. मात्र, ते मातोश्रीच्या आदेशाचे पालन करतील असे वाटते आहे. त्यांनी पिचडांना साथ दिली. तरी त्यांचे आणि अकोल्याच्या ठराविक शिवसैनिकांचे पटेल असे वाटत नाही. तसेही ज्यांनी पोलीस अधिकारी पदाचा "राजिनामा" देऊन "पोटतीडकीने" विरोध केला. ते किती पोटतीकडकीने प्रचार करतील. हे देखील जनतेला पहायचे आहे.

वेट & वॉच

          अकोल्यात कधी नव्हे रासपचा सोशल मीडियावर जन्म झाला आहे. तालुकाध्यक्ष भगवान करवर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. भाऊच्या गाडीला रासपचा झेंडा नाही, आम्हाला विचारात घेतले नाही.  सत्तेत सहभाग आणि सन्मानाची मागणी केली आहे. असे न झाल्यास आम्ही वेगळा निर्णय घेऊ अशी भुमिका त्यांनी मांडली आहे. भाजपमधील डॉ. लहामटे व भांगरे कुटुंब पुर्वीच बाहेर पडले आहे. त्यामुळे या महायुतीत सगळा सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.

धन्यवाद ! वाद तुमाचा, फायदा आमचा !

        या सगळ्यात पिचड साहेबांची गोची झाली असून. सगळ्यांना समजून सांगण्यात आणि समजून घेण्यात नाकीनव आला आहे. धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय. त्यामुळे काय करावं अशा स्थितीतला साहेब सामोरे जात असल्याचे दिसत आहे. पण, करणार तरी काय ? निवडणुकीच्या काळात "गाढवाला गोपाळशेट" म्हणावे लागते. हे त्यांना नव्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे निवडून येईपर्यंत फक्त वेट अॅण्ड वॉच ची भुमिका असणार आहे. यात शंका नाही. एकंदरीत वैभव पिचडांच्या पक्षप्रवेशाने राजकीय गणिते बदलली असून. तळागाळातील राजकीय कार्यकर्त्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. कट्टर विरोधकांना मित्र मानायची वेळ आली असून. लादलेला उमेदवार नेते स्विकारायला तयार नाही. जयघोष करायला मन तयार होईना आणि बंड पुकारायला निष्ठा तयार होईना. त्यामुळे सगळीकडून गोची झाल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठांचे आदेश नेत्यांनी मानले. तरी, त्यांना अंतर्गत विरोध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकं शरिराने भाऊंसोबत तर मनाने विरोधकांशी एकमत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे ही सुप्तलाट कोणाच्या पराजयाचा ठाव घेईल. हे येणारा काळच निच्छित करेल. असे जाणकारांना वाटते.
उद्यापासून वाचा शिवसेनेचे युवा नेते सतिश भांगरे यांची धक्कादायक विशेष मुलाखत..!! भाग २

    -- सागर शिंदे

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७० दिवसात १४० लेखांचे ८ लाख वाचक)