"ओळखलत" का "साहेब" मला !! मी तुमच्या "मयत" झालेल्या "कार्यकर्त्याचा" मुलगा; "पिचडांना" १७ वर्षानंतर "स्मरणपत्र"

साहेब आपण शब्द पाळला नाही !!

अकोले :-   
          गेली ४० वर्षे पिचड घराण्याने अकोल्यावर "राज्य" केले. त्यांच्याकडून लाखो जनतेची कामे झाली असतील. तर, लाखो लाेकांचे प्रश्न आजही "अनुत्तरीत" आहेत. असाच एक प्रश्न तब्बल १७ वर्षापुर्वी लहान असणाऱ्या मुलाने आज मोठा झाल्यानंतर व्यक्त केला आहे. कवी "कुसुमाग्रज" यांच्या "कणा" या कवीतेप्रमाणे त्याने माजी मंत्री पिचड साहेबांना "स्मरणपत्र" लिहिले आहे. त्यांच्याच "कार्यकर्त्याच्या मुलाने" त्यांना प्रश्न केला आहे. ओळखलत का साहेब मला.! लहान होतो तेव्हा आम्ही, जेव्हा दारी आले होते तुम्ही ! उरले नव्हते, सरले नव्हते, आमचे जवळ, शव बापाचे पाहुणी ! कपडे होते शुभ्र खादीचे, पोलीस चहु बाजुंनी ! क्षणभर बसले, नंतर बोलले, सरकारीत घेऊ मुले दोन्ही.! ओळखलत का सर मला. तोच मी !! असे पत्र सोशल मीडियावर फिरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या तरुणाच्या भावना "रोखठोक सार्वभौमने" जाणून घेतल्या असून त्या जनतेसमोर मांडल्या आहेत.
     
     आदरणीय 
 मधुकर पिचड साहेब
माजी आदिवासी वि. मंत्री
सप्रेम नमस्कार

पत्रास कारण की;....
          साहेब..! तुम्हाला आठवतय का ? सन १० जून २००२ सालची गोष्ट आहे. ९ जुनला "अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या" संचालक पदांसाठी "मतदान" उरकले होते. त्याची "मतमोजणी" क्रुषीउत्पन्न बाजार समिती येथे दुसऱ्या दिवशी सुरू झाली होती. समसमान संचालक निवडून येत असताना प्रति-स्पर्ध्यांमध्ये "शब्दयुद्ध" सुरू झाले. निवडणूक अधिकारी निकाल घोषीत करेना. म्हणून मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यात "प्रतिबंध" झाला आणि काही क्षणात पोलिसांनी जनतेवर लाठ्या-काठ्यांचा हल्ला सुरू केला. डोळ्याची पाते लवते ना लवते. तोच, होत्याचे नव्हते झाले. शेतकरी, मतदार व बघ्यांच्या बरगड्या झपाटून निघाल्या. जमावावर दगडफेक झाली. एक ना दोन तब्बल ४० जण गंभीर जखमी झाले. तर ४ लाख ७५ हजार रुपयांच्या मुद्देमालाची नुकसान झाली. हा अमानवी प्रकार येथेच थांबला नाही. तर, तत्कालिक निवडणूक अधिकारी डॉ. प्रमोद बोरसे यांनी गोळीबाराचे आदेश दिले आणि सुरु झाली ती "अंदाधुंद" फायरिंग. यात कोणी राजकीय बळी गेला नाही, ना कोणाला फटका खावा लागला. मात्र, विक्रम बाळासाहेब नवले यांना मुत्रपिंड गमवावे लागले. तर, चंद्रकात कानवडे यांना रोजचा अर्धा श्वास पणाला लावावा लागला. आणि तोच मी दुर्दैवी पुत्र, ज्याने लहानपणीच आपला बाप या घानेरड्या राजकारणाला अर्पन केला. तेव्हा ज्यांना सत्तेचा माज करायचा होता. ते गेंड्यासारखे एकमेकांना भिडले. पण, माझ्या बाबांचा यात निष्पाप बळी गेला. तर कानवडे यांच्यासारखा समाजकारणी व्यक्ती अंथरुनाला प्रिय झाला. या घटनेनंतर ही दोन्ही कुटुंब अगदी अनाथ झाल्यासारखे जगले. मात्र, कोणीही मदतीचा हात दिला नाही.
        साहेब..! तेव्हा तुम्ही "मंत्री" होते. तुमच्या देखत नको त्यांच्या "गचांड्या धरून" आत टाकले. पण, आपला "ब्र" बाहेर पडला नाही. माझा बाप गेला. वाटलं होतं, ज्यांनी "फायर" केला. त्यांना "शासन" होईल. पण, आज १७ वर्षे झाली. ना कोणी "केसचा निकाल" सांगितला. ना कोणी साक्ष म्हणून घरी विचारायला आले. आज कारखान्याची रक्तरंजीत सत्ता राजकीय व्यक्ती भोगत आहेत. मात्र, त्यापासून तीन कुटुंबांना झालेल्या जखमा. खूप खोलवर आहेत. त्यांच्या वेदना निर्ढावलेल्या राजकारणाच्या कित्तेक पटीने काळजावर घाव घालणाऱ्या आहेत. त्याची पुनराव्रुत्ती बाबांच्या आठवणीने रोज होते. त्यामुळे मी कोण ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

ओळखलत का सर मला !!

                   साहेब..! मला आठवत नाही तो दिवस. पण, "बाप गेल्यानंतर" आम्ही "परके" झालो आणि "खुल्या आभाळाखाली" फरपटणारं आयुष्य "विधवा" आईसोबत सुरु झाले. तेव्हा मी (सागर तिकांडे) इयत्ता ६ वीच्या वर्गात शिकत होतो. भलेही मला फार काही आठवत नाही. पण, आठ तास म्रुत्यूशी झुंज देणाऱ्या बापाच्या किंचाळ्या, नकळत कानात गुंजून आजही उरात धडकी भरून येते. हे मी कधीच विसरु शकत नाही. माझा भाऊ संकेत हा अगदी नुकताच पहिलीच्या वर्गात जात होता. तर बापासाठी असुसलेली माझी "मतीमंद बहिन" सारीका त्या दिवशी बाबांची वाट पाहत दारात बसली होती. बाप घरी आला. पण, तो शेवटचा श्वास घेऊन. त्यानंतर त्यांनी घराकडे जी पाठ फिरविली, ती आजवर.  पण, त्यांच्या पश्चात आमचे पालक म्हणून तीन दिवसानंतर दारावर आले ते माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड. त्यांनी माझ्या मायच्या डोक्यावर हात ठेवला आणि शब्द दिला. लेकी, सतिश म्हातारबा तिकांडे (वय ३२, रा. टाकळी. ता. अकोले) हा माझा कार्यकर्ता होता. त्याच्या पश्चात मी या कुटुंबाची जबाबदारी घेतो. तुझी दोन्ही मुले येणाऱ्या काळात सरकारी नोकरीत घेईल. या घरावर कधीच कोणते संकट येऊ देणार नाही.  असे म्हणून २५ हजार रुपये हातावर टेकविले आणि पोलीस बंदोबस्तात साहेब माघारी परतले. त्यानंतर आम्ही उभे राहिलो. मात्र, साहेब या घराच्या उंबऱ्यात कधीच उभे रहायला आले नाही. होय..! ओळखलत का साहेब मला..!! मी तुमच्या कार्यकर्त्याचा मुलगा. २५ वर्षानंतरही पुन्हा तुमच्या समोर उभा ठाकलो आहे.
सागर सतिश तिकांडे.
साहेब..! जेव्हा बाप नावाचे छत्र हरपले तेव्हा आईच्या आयुष्याची खूप मोठी फरपट झाली होती. म्हणून आम्ही कधी मोठे होणार आणि कधी कुटुंबाला हातभार लागणार ! म्हणून आमच्या पाहुण्यांना संधी देण्याची विनंती आम्ही केली होती. तेव्हा तुम्ही हो म्हणून मुंबईला बोलविले. पाहुणे एक ना दोन सारखे चकराच मारत राहिले. अगदी आम्ही लहानचे मोठे झालो. तरी त्यांना नोकरी लागली नाही. तुमच्या दरबारी दिलेल्या आश्वासनावर नोकरी शोधणे हेच एक काम लागून गेले. चाल ढकल करीत आम्ही दोघे भाऊ मोठे झाले. पण, एकालाही संस्थेत किंवा सरकारी नोकरीत काम मिळाले नाही. शेवटी आम्ही शेती कसून तिथे आयुष्य स्टेबल केेले. कदाचित तुमच्या आशेवर बसलो असतो. तर, कार्यकर्ता म्हणून जगावे लागले असते. आणि कोण जाणे, पुन्हा एखादा जीव गमवावा लागला असता. पण, अखेर एकच विनंती आहे साहेब. ! १७ वर्ष आम्हाला प्रलोभन दिले. पण, जर एखादे काम होत नसेल. तर, सरळ सांगा. होणार नाही. मग माणूस आशेवर बसत नाही. कारण, अशा खूप वाईट असते. ती नसेल तर माणूस पर्यायी रस्ता पाहुन मार्गस्त होण्याचा प्रयत्न करतो. म्हणून १७ वर्षात नोकरी का मिळाली नाही. माझ्या वडिलांना आणि तुमच्या कार्यकर्त्यास म्रुत्युनंतर न्याय का मिळाला नाही. याचे उत्तर अजूनही आम्ही आपल्याकडून मागतो आहे. ते मिळावे विनंती.

साहेबांनी टोपी घातली !!

           एक विनम्र आवाहन करावे वाटते की, कार्यकर्ता म्हणून उभी हयात अनेकांची निघून गेली आहे. पण, राजकारणात "आयुष्याचा सारांश शुन्य" आहे. काल, साहेबांसाठी दार उघडणारे व बुट वाहणारे दोन रुपयांसाठी महाग आहे. तर अनेकांवर कर्ज आहेत. कोणताही साहेब असो. तो मोठा होतो, त्याची संपत्ती वाढते. पण, कार्यकर्ता जैसे थे असतो. म्हणून जे तरुण आज प्रस्तापितांच्या पायी झुकून आयुष्य संपवून टाकण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी वेळीच टर्न घ्यावा. शिकून, पायावर उभे राहुन मग समाजकारण व राजकारण करावे. अन्यथा आयुष्य असेच कोठेतरी दंगलीत अर्पन करावे लागेल.

     --  सागर शिंदे

 ===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६८ दिवसात ११९ लेखांचे ६ लाख ३५ हजार वाचक)