|
"संयमी" व्यक्तीमत्व "चिंताजनक"!
|
सागर शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
आदरणीय "शरद पवार" यांच्या "इतिहासाची पाने" चाळत गेलो आणि नकळत त्याची "पुनरावृत्ती" आज होतांना दिसली. खरेतर "पक्षनिष्ठ, व्यक्तीनिष्ठ" हे शब्द जो प्रस्थापित होताे ना..! त्यालाच हवे हवे वाटतात. पण, त्याने स्वत: उभे राहताना असेच बंड पुकारुन आजवरचा पल्ला गाठलेला असतो. हे निष्ठावंताचे झेंडे घेऊन मिरविणाऱ्या त्यांच्या अर्धवट कार्यकर्त्याला माहित नसते. म्हणून निष्ठा-निष्ठा हे असले शब्द सोशल मीडियावर फिरताना दिसतात. अर्थात जसे "वारे फिरेल, तसे उफणले" नाही तर नासाडी शिवाय हाती काहीच लागत नाही. यालाच राजकारण म्हणतात. आणि ते आजवर शरद पवार साहेबांनी केल्याचे इतिहास सांगतो. त्यामुळे जैसी करणी, वैसी भरणी" अशी टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे. त्यामुळे "कुबेरासारख्या राष्ट्रवादीला" गळतीचे "ग्रहन" लागले आहे. म्हणून त्यांच्या संयमाचा ताबा सुटल्याचे आपल्याला पहायला मिळाले. अर्थात कुटुंबाचा येथे काय प्रश्न ! असे म्हणणाऱ्या साहेबांनी राजकारणात सुप्रिया सुळे, अजित पवार, पार्थ पवार, रोहित पवार यांच्यासह राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या नातेवाईकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय वलय निर्माण करून दिले आहे. आणि सक्षम झाल्यानंतर ते पवारांना सोडून जात असतील तर तो प्रश्न विचारल्याने बिघडले काठे ? हेच कळायला तयार नाही. अर्थात ज्यांनी साहेबांचे बोट धरून राजकारण केले. लाल दिव्यासह कुबेराच्या अपसंपदा जमा केल्या त्यांनी बंडखोरी केलेली चालते. त्यांना जाब विचारायला साहेब तयार नाहीत. मात्र, जवळचेच तुम्हाला सोडून का जात आहेत. हे विचारल्यानंतर "तळाची आग मस्तकात" गेली. म्हणजे "वड्याचे तेल वांग्यावर काढायचे" अशी टीका होऊ लागली आहे. साहेबांच्या या रिएक्शनमुळे देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, प्रश्न चुकीचा नव्हता. यावर पत्रकार, जनता व जाणकार राजकारणी ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
|
काय म्हणाले पत्ररकार महोदय !!
|
राजकारणातील "धुरंधर जाणते राजे" अस्थिर झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे एक अभ्यास म्हणून इतिहास डोळ्याखाली आला आणि पवारांचे राजकारण बुद्धीत शिरले. वास्तव पाहता, "सत्तेसाठी बंड" हाच पवारांचा इतिहास सांगतो. कारण १९६७ साली "यशवंतराव चव्हाण" यांनी पवारांना "आमदारकीचे तिकीट" मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांना निवडून देखील आणले; पण जेव्हा चव्हाण काँग्रेसमध्ये गेले तेव्हा पवारांनी चव्हाण यांना साथ दिली नाही. इतकेच काय ! १९७८ साली जेव्हा आणीबाणी उठली तेव्हा महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस अलिप्त लढल्या. त्यात रेड्डी काँग्रेसला ६९ जागा, इंदिरा काँग्रेसला ६२, जनता पक्षाला ९९, शेतकरी कम्युनिष्ठ पक्ष १३, माकप ०९ व ३९ जागा अपक्ष आल्या होत्या. तेव्हा जनता पक्षाला "बहुमत" सिद्ध करता आले नाही. म्हणून वसंतदादा पाटील यांनी रेड्डी व गांधी यांच्यात एकोपा करुन ७ मार्च १९७८ ला सरकार स्थापन केले होते. तेव्हा शरद पवार त्यात "उद्याेगमंत्री" होते. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे आणि वसंत दादा याचे टिपन बसत नव्हते. याचाच फायदा घेत "मुख्यमंत्री" होण्यासाठी पवारांनी सर्वात मोठा डाव टाकला आणि ४० आमदारांसह सत्तेतून बाहेर पडत वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाहून खाली खेचले. त्यावेळी (सन १९७८) जुलै महिन्यात विधीमंडळाचे "पावसाळी अधिवेशन" सुरू होते. पवारांच्या या अचानक निर्णयामुळे अवघ्या साडेचार महिन्यात सरकार पायऊतार झाले.
|
काय उत्तरले साहेबांनी !!
|
अर्थात पवार साहेबांनी सत्तेसाठी दादांच्या "विश्वासाला तडा" दिला. त्यात सुशिलकुमार शिंदे देखील पवारांसोबत होते. या सगळ्यांनी मिळून "समाजवादी काँग्रेसची" निर्मिती केली. याचे अध्यक्ष दादासाहेब रुपवते होते. या सर्वांनी "जनतादलाशी" बैठक घेऊन आजच्या "भाजपच्या पाठींब्याने" सरकार स्थापन केले. तेव्हा एस. एम. जोशी यांनी पवारांचे स्वागत करुन नेतृत्व मान्य केले आणि १८ जुलै १९७८ रोजी "पवार प्रणित भाजपची सत्ता" महाराष्ट्रात आली. यात समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप व कम्युनिष्ठ पक्ष यांनी मिळून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) स्थापन करुन वयाच्या ३८ वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. याच वयात आजचा तरुण अजूनही काय परिस्थितीत जगतोय हे नव्याने सांगायला नको. तर पवार यांनी त्यावेळी मुख्यमंत्री पदावर पकड निर्माण केली होती. अर्थात हे "बोचकडून" घेतलेली सत्ता फार काळ टिकली नाही. केंद्रात पुन्हा काँग्रेस आले आणि जनतापक्षात फुट पडली. परिणामी १७ फेब्रुवारी १९८० साली राष्ट्रपतींनी पुलोद सरकार बरखास्त करून तेथे "राष्ट्रपती राजवाट" लागू केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात १९८० ला पुन्हा निवडणुका झाल्या तेव्हा शरद पवारांच्या "समाजवादी काँग्रेस" पक्षाचे "आजच्या राष्ट्रवादी सारखे "हाल बेहाल झाले. तेव्हा अब्दुल रेहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तब्बल ६ वर्षे पवार साहेब "विरोधी पक्ष" म्हणून कार्यरत राहिले. पण, पवार या शब्दाला "समांतर अर्थ म्हणजे सत्ता" होय. हीच सवय त्यांनी त्यांच्या "तालमितील पठ्ठ्यांना" लावली आणि म्हणून अवघ्या दहा वर्षात याच पठ्ठ्यांनी "सत्तेसाठी राष्ट्रवादी" संपून टाकण्याची वेळ आणली आहे. "राजा तसेच वजीर" निघाल्याचे हे उत्तम उदाहरण महाराष्ट्राला पहायला मिळाले आहे.
|
घड्याळ उलटे फिरतेय की काय !!
|
पुढे आपला काही निभाव लागणार नाही. त्यामुळे १९८७ साली पवारांनी राजीव गांधी यांच्या करवी "काँग्रेसध्ये प्रवेश" केला. त्यानंतर त्यांना काँग्रेसकडून नेहमी सत्तेत सहभाग मिळत राहिला. १९९९ साली गांधी घराण्याचे "परकीय नेतृत्व" अमान्य करीत पवारांनी काँग्रेसमधून काढता पाय घेतला व "राष्ट्रवादी" पक्षाची स्थापना केली. मात्र, "तुझे माझे जमेना अन तुझ्यावाचून करमेना". अशीच सत्तेची लालसा लागल्यामुळे पवार काँग्रेसचा एक "अविभाज्य भाग" म्हणून त्यांना कायम चिकटून राहिले. मात्र, सत्तेतील सहभाग जसजसा मिळत गेला. तसतसे ताई, दादा, मामा, भाचे, चुलते पुतने यांची राजकारणार "एन्ट्री" झाली. "बारामतीचा विकास" झाला. पण, बारामतीसारखे दुसरे एखादे "विकसित शहर" तयार झाले नाही. म्हणून तर पिचड, भुजबळ, पाचपुते, पवार अशा अनेकानी मतदारसंघाचा विकास केला नाही. तर, निव्वळ घरे भरायची कामे केली. असे आरोप झाले आणि म्हणून अपसंपदा, ईडी आणि निष्ठा दावणीला बांधून "पळापळ" सुरू झाल्याचे दिसते आहे. साहेबाची हीच चूक की; मतदारसंघाचा विकास जोपासण्यापेक्षा "व्यक्ती संभाळत" बसले. जर आज प्रत्येक आमदाराच्या तालुक्यात "बारामतीचे प्रतिबिंब" दिसले असते. तर, ना "यात्रा" काढायची वेळ आली असती ना "ईडीचा डाव रडी" झाला असता. केवळ विश्वासाच्या बळावर मोकाट सोडलेल्या निष्ठावंतांवर योग्यवेळी कटाक्षाने लक्ष केंद्रीत केले असते तर, आज पत्रकाराने "वास्तवाला धरुन" विचारलेेल्या प्रश्नावर इतके "रिअॅक्ट" होण्याची वेळ आली नसती असे अभ्यासकांना वाटते.
|
आता फक्त "विखे पॅटर्ण",
बाकीच्यांनी घ्यावा थेट "युटर्ण"
|
राजकारणात कुटुंब आले कोठून ? असा प्रश्न साहेबांना पडतो. तर सामान्य माणसाला देखील एक सहज प्रश्न पडतो. जेव्हा राजकारणात "डॉ. सुजय विखे" यांना नगर दक्षिणची जागा देण्याची वेळ आली. तेव्हा पवार साहेब म्हणाले होते. तो कोठे "माझ्या कुटुंबातला" आहे. त्याचे "बालहट्ट" मी का पुरवावे. आणि दुसरीकडे पुण्यात बैठक झाली तेव्हा पार्थ पवारला कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली तेव्हा साहेब म्हणाले होते. "सगळ्या उमेदवाऱ्या घरातल्यांनीच केल्या, तर सामान्य कार्यकर्त्याला संधी कधी द्यायची".? असे खडसावून बोलणारे पवार साहेब, नंतर त्यांच्या कुटुंबाचे "बालहट्ट" पुरविण्यासाठी पार्थला लोकसभेची उमेदवारी देतात. तर आता कर्जतमधून रोहित पवारला पुढे करतात. येथे कौटुंबिक राजकारण केलेले चालते. मात्र, त्यावर प्रश्न केलेला चालत नाही. हे लोकशाहीला शोभेल असे गणित कोणालाच मान्य वाटत नाही. म्हणजे "आपलं ते पोरगं आणि लोकाचं ते कारटं" ! असेच नाहीतर काय !!! अर्थात डॉ. सुजय विखे यांचा एक "बालहट्ट" पुरविला असता तर सगळं "राष्ट्रवादी कुटुंब" कदाचित उद्या पुन्हा सत्तेत बसले असते.
|
हाच तो "बालहट्ट" !!
|
एक गोष्ट आणखी प्रकर्षाने जाणवली, "काँग्रेस-राष्ट्रवादी" यांनी नेत्यांना वलय दिला. मात्र, पडत्या काळात कधी अभय दिला नाही. जसे आज बोलले जाते की, सेना-भाजपच्या काळात नेत्यांच्या पडत्या काळात पक्ष ठामपणे पाठीशी उभा राहतो. भले सत्तेत वाटा देत नाही. पण, "क्लिनचिट" नक्कीच देतो. जसे एकनाथ खडसे, बबनराव पाचपुते, एस. मेहता, सुभाष देशमुख, विनोद तावडे, पंकजा मुंढे, प्रविण दरेकर, चंद्रकात पाटील अशा अनेकांवर झालेल्या आरोपाचे काय झाले "देवाला" माहित. पण, विरोधी पक्षातील नेत्यांना मात्र, एकापाठोपाठ एक "ईडीच्या नोटीसा" जाऊ लागल्या आहेत. पण, जेव्हा अ. नगरला भानुदास कोतकरांवर वेळ आली तेव्हा काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. संग्राम जगताप यांच्यावर वेळ आली तेव्हा राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. छगन भुजबळांवर वेळ आली तर अडीच वर्षांनी पवारांचे पत्र बाहेर पडले. अशा अनेक घटना सांगता येतील. मात्र, "केडगाव हत्याकांडात" शिवसेना कुटुंबाच्या पाठीशी ऊभी राहिली. "तिवरे धरण" फुटले तेव्हा सरकार ठेकेदाराच्या पाठीशी ऊभे राहिले. असे एक तरी उदाहरण दाखवा की सकारने सरकारमध्ये असणाऱ्या सरकारी व्यक्ती किंवा बड्या नेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पक्षाने नेत्यांना पडत्या काळात साथ दिली पाहिजे. राजनीती हेच सांगते. नाहीतर संग्राम जगताप, अरुण जगताप यांना सत्तेची आणि चौकशांची भिती नाही. पण, "अन्याय" सहन करावा लागला. हीच सल मनात आहे. सगळेच "इडी आणि सत्तेसाठी" लाचार नाहीत. पक्षाचे प्रेम देखील कोठेतरी कमी पडले याचे देखील "आत्मचिंतन" झाले पाहिजे. असे जाणकारांना वाटते. अर्थात येणाऱ्या काळात या सर्वांची "पोलखोल" करतील असा एकमेक चेहरा म्हणजे "मनसेचे अध्यक्ष" राज ठाकरे हे आहेत. कारण, बाळासाहेब थोरात म्हणजे "सोज्वळ आणि सरळ" चेहरा, धनंजय मुंढे आणि अजित दादा हे सरकारच्या आधीच "कचाट्यात" आहेत. झालं,! प्रकाश आंबेडकर म्हणजे "न उलगडणारं गणित" आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षात ही "घुसमट आणि चिडचिड" वाढत राहणार आहे. त्यामुळे उद्याची विधानसभा जागविण्याची हिम्मत फक्त ठाकरे यांच्यात असल्याचे बोलले जात आहे.
|
साहेबांच्या चिडचिडीचे प्रमुख पाहुणे
|
एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ज्या पत्रकाराने प्रश्न केला तो कदापी चूक नव्हता. आपले सहकारी पक्ष सोडून जाताय ठीक आहे; पण "कुटुंबातील लोक सुद्धा" पक्ष सोडत आहेत. यात "गैर" काहीच नाही. ते अगदी वास्तवाला धरुन आहे. ज्याला पवार साहेबांनी राष्ट्रवादीचे तिकीट देऊन उभे केले. तो "दगड्या असो वा धोंड्या" हे न पाहता "शरद पवार" म्हणून लोकांनी ज्यांना निवडून दिले. त्यांनी साहेबांची साथ सोडावी !!? हा प्रश्न होऊ शकत नाही का ?.. ते पूर्वी साध्या घरात रहात होते आणि आता तुमच्या आशिर्वादाने अलिशान बंगल्यात का राहतात ? असे विचारले असते तर नक्की गैर वाटले असते. पण, ज्यांच्यावर "विश्वास" होता. त्यांनीच "पाठीत खंजिर" खुपसला. हे साहेब स्पष्ट सांगणार तरी कसे ? म्हणून का जाताय, हे विचारण्याची सुद्धा संधी ज्यांनी दिली नाही; त्यांचे दु:ख मांडण्यापेक्षा "वड्याचे तेल वांग्यावर" काढून "गेलेल्यांना आणि जाणाऱ्यांना हे हटके उत्तर होते. त्यात "पत्रकार" हे फक्त एक "माध्यम" होते. असे जाणकारांना वाटते. पवार साहेबांच्या रागावण्याने पक्ष सोडून गेलेले सचिन आहिर, संदिप नाईक, गणेश नाईक, मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, रणजितसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षिरसागर, शिवेंद्रराजे भोसले, रश्मी बागल, दिलीप सोपल, पांडुरंग बरोरा अशा अनेकांना तोंड लपविण्यापलिकडे काही वाटणार नाही. पण जे जाणार आहेत ते रामराजे निंबाळकर, धनंजय महाडिक, राणा जगजितसिंह पाटील, पद्मसिंह पाटील, उदयनराजे भोसले, छगन भुजबळ, अवदुत तटकरे व घोषणा केलेले भास्कर जाधव यांच्या मनाचे तरी "परिवर्तन" होईल. यासाठी ती "किंकाळी" असावी असे अभ्यासकांना वाटते आहे.
|
जाऊ नका हं ! बाहेर आम्हीच काढलय !
|
एकीकडे ज्या पत्रकाराने प्रश्न विचारला त्याच्यावर ना. विखेंचे शिक्का मारुन विषय कुठलच्या कोठे गेला आणि प्रामाणिक पत्रकार हकनाक "ट्रोल" झाला. त्या पत्रकाराचे व ना. विखे साहेबांचे फोटो व्हायरल करण्यात आले. मात्र, वास्तव पाहता पत्रकाराचे काम असते शोध घेणे. तो पिंड पार पाडला असता समजले की; एका कार्यक्रमात विखे साहेबांनी या पत्रकाराच्या गाडीतून प्रवास केला होता. तेव्हा स्वत: या पत्रकाराने सेल्फी फोटो काढले होते. त्याचा आधार घेत विषयांतर करून सगळ्या गोष्ठींचे खापर विखे घराण्यावर फोडण्याचा केविलवाना प्रयत्न खुद्द आ. आव्हाडाकडून झाला. त्यामुळे "पराचा कावळा" होऊन पवार साहेब "अस्वस्थ" झालेत आणि त्यांनी "पत्रकारांच्या माध्यमातून" बंडखोरांना उत्तर दिले. हेच वस्ताव जाणकारांना वाटते आहे. अर्थात नगरची बहुतांशी मीडिया ही कमर्शीयल द्रुष्ठीकोणातून विखे साहेबांच्या तालावर नाचते. हे जगजाहिर आहे. ही "नावानिशी" यादी "वाड्यावर" आहे. ती मीडियाची गुलामी असली तरी, त्याचा बळी सामान्य पत्रकारच का ? असा प्रश्न मीडियाच्या मनात खदखदत आहे.
|
एक क्लिक वादग्रस्त
|
अखेर साहेबांच्या वक्तव्याने "नागराज मंजुळे" यांच्या "फाॅड्री" पिक्चरची आठवण झाली. चित्रपटाच्या शेवटी "जब्या" ज्या व्यक्तींना "रोषाने" जोराचा "दगड फेकून" मारतो. आणि आपल्या भावना व्यक्त करतो. तेव्हा त्या "दगडाचे विश्लेषण" करताना "समिक्षक" म्हणतात की; तो दगड व्यक्तीला फेकून मारलेला नाही. तर, "जातीव्यवस्थेवर भिकावला" आहे. अगदी सेम परिस्थिती साहेबांची झाली आहे. त्यांना "बंडखोरांचा" प्रचंड "संताप" आला आणि त्यांनी "पत्रकाराला" नाही. तर त्यांच्या "पाठीत खंजिर" खुपसणाऱ्यावर "शब्दसंहार" केला. असे बोलले जात आहे.
=======================
- सागर शशिकांत शिंदे
(संपादकीय)
=======================
विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायीक, आणि गोर-गरिबांच्या "हक्काचे ताट" मिळण्याचे एकमेव ठिकाण. साईनिवास बिल्डींग, कॅनॉल रोड, कर्वेनगर. "हॉटेल शिवराय" पुण्यात "एकही माणूस उपाशी रहायला नको" हेच आमचे "उद्दीष्ट"..!
मो. 9975990980
कल्पीत विजय वाकचौरे
=====================
४६ दिवसात ५ लाख वाचकांचे एकमेव लोकप्रिय पोर्टल. "रोखठोक सार्ववभौम"
=======================