आ. वैभव पिचडांचा "शिवसेना प्रवेश" म्हणजे, "भाजपची मुस्कटदाबी"....

शिवसेनेच्या वाटेवर ?
अकोले (प्रतिनिधी) :- 
                    विधानसभा निवडणुकीचे वातावरण तयार झाल्यामुळे आता बंडखोरीचे वारे वाहु लागले आहेत. ते वारे आता अकोले तालुक्यात येऊन धडकले आहे. नगरमध्ये जगताप व लोणीत विखे यांच्यामुळे आपण पाहिले "बाप नंबरी, तर बेटा दस नंबरी" म्हणजे सरळ सांगायचे तर बापला डावलून मुले निर्णय घेऊ लागले आहेत. सत्तेपासून करमू द्यायचं नाही, हेच "पवार साहेबांचे धोरण" अनेकांनी अंगिकारले आहे. ज्या पक्षाची हवा त्याच पक्षाचे आम्ही. हेच धोरण आजकालचे मातब्बर राजकारणी अवलंबवित आहे. याची अंमलबजावणी "विखे साहेबांनी" चाेख बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ आ. संग्राम जगताप व पिचड साहेबांनी देखील बंडाची मशाल हाती घेतली आहे. या दोघांनी "शिवसेनेचा फेटा" बांधण्यासाठी कंबर कसली आहे. काल ना. विखेंनी काँग्रेसला टोला मारला होता. काँग्रेसमध्ये किती आमदार शिल्लक राहतात याचा विचार करा. त्यामुळे हे दोन्ही आमदार हातातील "घड्याळ" काढून ठेऊन योग्य तो "तीर" मारतील यात शंका नाही. या बंडखोरीचा खरा सुत्रधार कोण आहे हे नव्याने सांगायला नको. पण, पक्षपात होणार हे निच्छित झाले आहे. त्यामुळे अकोल्यात शिवसेना भाजप कार्यकर्त्यांची दाणाफान झाल्याचे चित्र दिसत आहे.               
             
आमदारकी एक अपुर्ण स्वप्न
लोकसभेत भाजप पक्षाने चांगल्या चांगल्यांना पाणी पाजले. जे निवडून आले ते विरोधी बाकावर बसले. पण विरोधालाही काही सिमा असते. केव्हर सरकारने धुतलेल्या धुण्यावर चिखल फेकीत बसायचा. म्हणून सत्तेत सहभाग घेण्यासाठी बंडखोरी सुरू झाली. नशिब पक्षांतरबंदी कायदा आला. त्यामुळे स्वार्थी राजकारणावर अंकुश बसला. पण, तरी राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर एखादी अर्धी जागा करून "आईये... आपका... स्वागत है"! हे विखेपाटील आणि अविनाश महातेकर यांच्यापासून आपण शिकलो. पण, यापलिकडे राजकारणात येण्यासाठी तरुण जास्तच उताविळ झाल्याचेही आपण पाहिले. ते नगरच्या डॉ. सुजय विखे आणि शिरूरच्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून. पक्षात वजन होते पण तिकीट नाही. त्यामुळे त्यांनी बंड करून स्वत:ला सिद्ध केले. आता आमदारकी धोक्यात आलेले आ. संग्राम जगताप व आ. वैभव पिचड यांनी  घड्याळाला पिन मारली आहे. ही दोघे शिवसेनेत जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतीही खात्रीशिर माहिती हाती आलेली नाही. अर्थात अकोले ही शिवसेनेेची जागा आहे. त्यामुळे आमदार शिवसेनेकडे झुकले आहे. अन्यथा पक्षपात करायचाच असेल तर भाजप त्यांना कधीही सुविस्कर आहे. तसेही शिवसेनेत मधुकर तळपाडे, सतिष भांगरे, बाजिराव दराडे, मच्छिंद्र धुमाळ, मारुती मेंगाळ यांच्याशिवाय विरोधक आहे तरी कोण ? आणि यातील काही नावे विरोधक आहे की "विरोधी समर्थक" हे सगळ्या तालुक्याला माहित आहे. तालुक्यात शिवसेना नक्कीच दोन नंबरचा पक्ष आहे. मात्र, तो कोणाच्याही बळावर नाही. तर येथे "जन्मजात शिवसैनिक" आहेत. म्हणून सेना जिवंत आहे. उलट 'भगव्याच्या नावाखाली' "दलाली" करणारे येथे जास्त आसल्यामुळे आजवर "सह्याद्रीच्या कुशित भगवा फडकू शकला नाही". हे वास्तव आहे. पण, जर अकोल्याचे "वैभव" सेनेत दाखल झाले तर नक्कीच खऱ्या अर्थाने "सह्याद्रीवर भगवा फडकेल" हे ही तितकेच खरे आहे.
       
अकोले बीजेपीचे खरे हिरो
आता अकोल्यातील भाजपचा विचार केला तर, जालिंदर वाकचौरे यांनी भाजपची मुहुर्तमेढ रवून धरली. त्याचा त्यांना फायदाही चांगलाच झाला. काल दुचाकीवर फिरणारा नेता आज "काळ्या" गाडीत फिरू लागला. त्यांनी भाजप उभी केली. पण त्यांच्यातलीच मानसे त्यांना "ऊभारु लागली", ते सोशल मीडियावरील संभाषण सगळ्या तालुक्याने अक्षरश: कानात हेडफोन लावून एकले. त्यामुळे भाजपात दोन गट पडले. भाजप सदस्य नोंदणीचे पोष्टर सगळ्या गावभर फिरले त्यावर अशोक भांगरे, शिवाजी धुमाळ, सिताराम भांगरे, साै. सुनिता भांगरे, वसंत मनकर यांचे फोटो आढळले. मात्र, फाऊंडर मेंबर कोठे झळकले नाही. त्यांचे समर्थक तथा भावी आमदारकीचे दावेदार डॉ. किरण लहामटे हे देेखील आऊट आॅफ होते. अर्थात ऐकेकाळी हे पिचड साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. पण वैचारिक मतभेद म्हणा, की राजकीय त्यांनी हातातील घड्याळ काढून ठेवले आणि कट्टर विरोधक म्हणून पुढे आले. मग अशात पिचड साहेब भाजपात गेले असते तर खरी मज्जा आली असती. या सर्वांना "तोंड दावून बुक्यांचा मारा" सहन करावा लागला असता. आणि उभ्या तालुक्याने ही मजा पाहिली असती.
        खरी मजेची बाजू ही आहे की, अशोक भांगरे किंवा त्यांच्या साै भांगरे यांना भाजपचे तिकीट मिळावे म्हणून विखे आणि इतर मान्यवर झटून आहेत इतकेच काय सेनेची जागा भाजपला मिळविण्यासाठी प्रयत्न चालू आहे. परंतु ही जागा नियोजित शिवसेनेची आहे. त्यांना पिचडांसरखा व्यक्ती लाभला तर जरी युती झाली तरी जागा सेफ आणि नाही झाली तरी जागा सेफ. त्यामुळे शिवसेना हाच योग्य पर्याय वैभव पिचड अर्थात सर्वेसर्वा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी निवडला आहे. त्यामुळे शिवसेना हा पक्ष बंडखोरीसाठी अगदी योग्य असल्याचे बोलले जात आहे.
( भाग ३ - क्रमश: )
--------------------------------
          --  सागर शिंदे