"भाजपची वरात", "काँग्रेसची लगिनघाई", "वंचितचं वऱ्हाड", अन् वाहतुकीला "मनसेचे इंजिन"......
देवा सत्तेपासून वंचित ठेऊ नको |
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
"भाजपची वरात" काढण्यासाठी आता "काँग्रेसची लगीनघाई" सुरू झाली आहे. तर त्यासाठी वऱ्हाडी म्हणून "वंचित आघाडी" तर वाहतुकीला "मनसेचे इंजिन" घेऊन विधानसभेचा बस्ता बांधण्याचे नियोजन नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यासाठी पहिल्यांदाच साईबाबांना साकडे घालून विधानसभेची रणधुमाळी सुरू केली आहे. लोकसभेत "बहुजन वंचित आघाडीला" अदखलपात्र ग्रुहीत धरून काँग्रेसने खूप मोठा फटका सहन केला. परीनामी राज्यात एक जागा वगळता काँग्रसचे नामोनिशान मिटले. ज्या मुस्लिम आणि दलित मतांवर काँग्रेस आजवर उड्या मारत होती. त्यांच्या मतांचे विभाजन झाल्यानंतर त्यांना स्वत:ची खरी ताकद किती शुल्लक आहे हे लक्षात आले. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना "वंचितची मनधरणी" करता आली नाही. त्यामुळे स्वत:सह पक्षाला संपविण्यात त्यांचा खूप मोठा वाटा निर्माण झाला. मात्र, त्यांच्यानंतर थोरात गटाला संधी मिळाली आहे. आता जो पक्ष डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरीत आहे. त्या पक्षाची मनधरणी करायला काँग्रेसने "साईबाबांना साकडं" घालत आहे. त्यांनी यशाच्या अजेंड्यावर सर्वप्रथम वंचित आघाडीला घेतले असून त्यांना किती यश येते. हे पाहणे सर्वांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.
आघाडीत जावं की नाही...... |
एक विचार केला तर लक्षात येईल. आंबेडकरांच्या ताकदीने भाजप राज्यात यशस्वी झालं. म्हणजे खरी "किंग मेकरची" भूमिका 'प्रकाश आंबेडकर' यांची आहे. तर रामदास आठवले यांचा प्रभाव लोकसभेत अगदी शुन्य दिसून आला. येथे त्यांनी जो मंत्रीपदासाठी स्वार्थ पाहिला. तो तोट्याचा ठरला. पण, त्यांचे नशिब इतके बलोत्तर की; अपयशी मानसाला राज्यसभेवर घेऊन, मंत्रीपद देऊन, वरुन राज्यात अविनाश महातेकरांना समाजकल्याण मंत्री केले. मागिल निवडणुकीत आठवलेंना अडिच वर्षे मंत्रीपदासाठी वेटींगवर ठेवणारी भाजप, इतका उदारमतवादी पक्ष कसा झाला असावा ? कारण महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांना शह देणारा माणूस कोण असेल तर तो फक्त रामदास आठवले आहेत. काल लोकसभेत वंचितचा फायदा भाजपला झाला. त्यानंतर आंबेडकरांना "बी टिम" म्हणून गणले गेले. मात्र, विधानसभेला प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढले नाही तर, त्याचा फटका नक्कीच भाजपला बसेल. त्यामुळे आठवले नावाचे हत्यार पुढे करून दलित मते फोडायची आणि प्रकाश आंबेडकरांची ताकद कमी करायची. हा यशस्वी डाव आरएसएस प्रणित भाजपने टाकला. नाहीतर ना आठवले ना महातेकर एकही जनतेतून निवडून आले. त्यांना खाजगी कोठ्यातून जागा करून मंत्रीपद देणारे भाजप काय मुर्ख नाही.
वंचितने डोकं बंद पाडलय |
मी मंत्री झालो बस |
पण एक मात्र नक्की, काॅग्रेसला भाजपसोबत शह द्यायचा असेल तर राष्ट्रवादी आणि वंचित आघाडीला सोबत घेणे अनिवार्य ठरणार आहे. त्यानंतर मनसे व अन्य पक्षांचा विचार करावा लागेल. हे वास्तव बाळासाहेब आंबेडकर यांनी जाणल्यामुळे आता ज्या काँग्रेसने आजवर दलितांची मते खाल्ली आणि हाती धुपाटणं दिलं. अशा काँग्रेसला ४० जागा देऊन अवहेलना केल्याने दलितांमध्ये अजिबात खेदाचे वातावरण नाही. काल प्रकाश आंबेडकर यांच्यावर "भाजपची बी टिम" म्हणून आरोप करण्यात आला. तो खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी ते काँग्रेसकडे खुलासा मागत आहे. पण काँग्रेसची गत "गुतली गाय अन फटके खाय" अशी झाली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना विरोध करण्यात कोणाची हिंमत राहिली नाही. साहेब..! तुम्ही म्हणाल तसे ! आम्ही मुर्ख अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
------------------------------------------
-- सागर शिंदे