"बहुजन उद्धारक", "दादासाहेब रुपवते" ...."अकोल्याचे खरे विकासपुरुष"


मुंबई :- "जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण" या वाक्याला माणूस किती सहज वाचतो. पण, त्यामागे किती यातना असतात हे वरवर बोलणाऱ्याला कळत नाही. अर्थात जी मानसे मनाने आणि कर्माने मोठे असतात ते कधी आपल्या कामाचा गाैगवा करत नाहीत. त्यातलेच एक अकोले तालुक्याने दुर्लक्षीत केलेले डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी "कर्मविर दादासाहेब रुपवते" होय. आज त्यांचा स्म्रुतीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांचे आंबेडकरी चळवळीला आणि विशेषत: अकोले तालुक्याला किती योगदान आहे हे प्रत्येक सुजान व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे काम या लेखाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे.
          दि. २८ फेब्रुवारी १९२५ या दिवशी महाराष्ट्राच्या मातीने एका कर्मयोगी पुरुषाला जन्म दिला. शिक्षणाचा विटाळ तेव्हाही काही कमी नव्हता, तरी या बुद्धीच्या पैलवानाने मिरीट म्हणजे काय ! याची प्रचिती इयत्ता दहावीत आणून दिली. तेव्हा अकोल्यासारख्या खेडूतात काॅलेज हे नाव फक्त काही मोजक्या डोक्यांनीच एकलेले असावे. तेव्हा ते पाहणे दुरच. म्हणून दादासाहेब रुपवते यांनी संगमनेर गाठले, नंतर नगर आणि पुढे मुंबई असा प्रवास सुरू झाला. आता मुंबई म्हणजे बाबासाहेबांच्या "चळवळीचे माहेरघरच" होय. तेथून रुपवते कुटुंबाचा रथ समाजप्रवाहात आला. दादासाहेब वयाची २५ शी पुर्ण करेपर्यंत अवघ्या महाराष्ट्राला परिचीत झाले होते. डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीत त्यांनी मोलाची भुमिका घेत एक वैचारीक वयल असणारे लोक जमा केले होते. डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वान झाल्यानंतर दादासाहेबांनी स्वत:ला बाबासाहेबांच्या विचारांना झोकून दिले. १९५६ ला दिक्षा घेतल्यानंतर "प्रबुद्ध भारत" घडविण्यासाठी दिवस रात्र एक करणारे हे व्यक्तीमत्व होते. त्याकाळी भारतात ख्रिश्चन मिशनऱ्या शिक्षणाच्या नावाखाली भारतात आल्या होत्या. जातीव्यवस्था, मुलभूत गरज आणि अमीष म्हणून ख्रिश्चनांकडून मिळणारी "रसद" यामुळे अनेक बेईमान महार, मांग त्यांना जाऊन मिळाली. याचा सर्वात पहिला अभ्यास कोणी केला असेल तर तो दादासाहेब रुपवते यांनी. त्यानंतर त्यांनी बीड आणि नगरचा दक्षिण भाग पिंजून काढला. नगरच्या कानाकोपऱ्यात धम्मदिक्षेचे आयोजन केेले. तेव्हा खासदार बी. सी. कांबळे व आमदार राम पवार यांनी दादासाहेबांना खूप मदत केली. ही चळवळ वेगाने वाढत गेली. या सर्व चळवळीला एक करण्यासाठी ३ आॅक्टोबर १९५७ रोजी "शेड्युल कास्ट फेडरेशन" बरखास्त करण्यात आली व प्रा. एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली राजाभाऊ खोब्रागडे, खा. बी. सी. कांबळे, खा. डी.ए. कट्टी, खा. बी. पी माैर्या,  एल. आर. बली, दादासाहेब रुपवते, डी. गायकवाड यांनी "रिपाई" पक्ष स्थापन केला. मात्र, दुर्दैव असे की, अवघ्या दोन वर्षात राजा ढेले, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे यांच्या "दलित पँथर" प्रमाणे रिपाईत फुट पडली. दादासाहेब गायकवाड आणि आर.डी. भंडारे एका बाजूने तर बी. सी कांबळे यांनी दुसऱ्या बाजूने "आरपीआय दुरुस्त" ही संघटना सुरू केली. हे दोन्ही गट एकमेकांना गेंड्यासारखे भिडले. समाज उन्नती सोडून याचीत्याची उणीधुणी धुण्यात यांनी चळवळीचे वाटोळे केले.
         

डॉ. बाबासाहेबासवे दादासाहेब

दरम्यान दादासाहेब रुपवते यांचा स्वभाव अगदी विनोदी होता. कदाचित त्यांचे पाणी खा. आठवलेंनी पिले असावे. दादासाहेबांची भाषणशैली विनोदी होती, त्यांचे व्यक्त होणे अगदी अंतर्मनातून होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेक टिका होत असे. पण, त्यांच्यातील कलावंतांमुळेच वामनदादा कर्डक, लक्ष्मण केदार, श्रावण यशवंते यांसारखे नामांकीत शाहिर त्यांच्या सोबत जोडले गेले होते. यांच्या विद्रोहामुळे गायकवाड व भंडारे दादासाहेब रुपवतेंना "नगरचा दामू नाच्या" असे मिश्किलीने म्हणत. पण दादासाहेब प्रचंड सयमी होते. त्यांनी भाषेचा, मानसाचा आणि वक्तेपणाचा कधी अपमान केला नाही. डॉ. बाबासाहेबांच्या मृत्युची चौकशी व्हावी यासाठी ते अग्रही होते. या मागणीला धरूनच "आरपीआय दुरूस्त" पक्ष चांगलाच चर्चेत आला होता. राज्यात मागासवर्गीयांच्या हाताला काम नाही, व्यवसाय नाही म्हणून १९५९ साली दादासाहेबांनी भुमिहीनांना जमीनी मिळाव्यात म्हणून नगर जिल्ह्यात सत्याग्रह सुरू केला होता. त्याला चांगले यश आले.
                 दरम्यान पुढे निवडणुका आल्या होत्या. दलित समाज्याची ताकद विभागली होती. सत्तेत जायचे असेल तर एकाेपा हवा म्हणून स्वत: दादासाहेब रुपवते यांनी १९६२ साली ऐक्याची साद घातली. परंतु त्यांना यश आले नाही. दोन्ही पक्षांनी स्वबळाचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. एव्हाना प्रस्तापित पक्षाने त्यांना एक होऊ दिले नाही, ना यशाचे पाऊल टाकू दिले. परिणामी "आरपीआय दुरुस्त" संपुर्ण रसातळास गेली. पुढे दादासाहेब रुपवते दादासाहेब गायकवाडांच्या पक्षात विलीन झाले. राजकारण थोडे बाजूला सारून रुपवतेंनी "प्रबुद्ध भारत" व "रिपब्लिकन" या साप्ताहिकांची संपादकीय जबाबदारी स्विकारली व हळुहळू साहित्यीक म्हणून ते पुढे आले. नंतर त्यांनी मराठी "विश्वकोष" बनविण्यात मोलाचे सहकार्य केले.

दादासाहेबांचे विचार

    लेखन क्षेत्रात प्रगल्भ झालेल्या दादासाहबांनी १९६७ साली पुन्हा राजकारणात उडी घेतली. या दरम्यान यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांनी "रिपाई आणि काँग्रेस एक्य" करून "सामाजिक अभिसरण" घडवून आणले. त्याच काळात निवडणुकीत दलित चेहरा म्हणून गायकवाड यांना अर्धांगवायू झालेला असताना काँग्रेसने त्यांचा वापर केला. त्यानंतर दादासाहेब रुपवते यांना विधानपरिषदेवर घेतले. याचाच फायदा घेत रुपवते यांनी नगर, बीडसह अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या तर वसतीग्रुह सुरू केले. तर अनेकांना शासनमंजुऱ्या दिल्या. त्यांच्याकडे ग्रुहनिर्माण व समाजकल्याण खाते होते. त्यामुळे म्हाडा व मुंबईतील बहुतांशी झोपडपट्यांचे पुनर्ववसन केले. आज आठवले आणि अन्य दलित मंत्र्यांच्या तुलनेत दादासाहेबांचे काम कित्तेक पटीने अनमोल आहे.
     
      खरे पाहिले तर दादासाहेब रुपवते हे अकोले शहरातील रहिवाशी होते. या मायभुमीचे पांग फेडताना त्यांनी "अगस्ति सहकारी साखर कारखाना" काढण्यासाठी अनमोल योगदान दिले आहे. संगमनेरच्या प्रस्तापितांनी कारखान्यास विरोध केला. तेथील कारखान्याच्या अंतर्गत अकोल्याच्या कारखान्याची कुदळ मारा. असा प्रस्ताव होता. मात्र, दशरथ सावंत, मधुकर पिचड, भाऊसाबेह हांडे, बुवासाहेब नवले यांच्यासह अनेकांनी त्यास नकार देऊन मंत्री महोदय दादासाहेबांना नव्याने साखर कारखाना स्थापन करण्याचे साकडे घातले. त्यानंतर हा कारखाना उभा राहिला. त्यात दादासाहेब "संस्थापक चेअरमन" होते. त्यानंतर "अकोले पुलाचा प्रश्न" उभा करून वसंतराव नाईक यांच्या काळात दादासाहेबांनी पुलाची पायाभरणी केली. नाहीतर पुर्वी देवठाणला जाण्यास होड्यांचा वापर केला जात होता. पुढे सर्वात महत्वाचे म्हणजे "निळवंडे" धरणाचे श्रेय आज कोणीही लुटत असले तरी ते सर्वस्वी दादासाहेबांची देण आहे. कारण, यशवंतराव चव्हाण यांच्या काळात हे धरण म्हळदेवी येथे होणार होते. अगदी आणिबानीच्या काळात त्याचे उद्घाटन देखील झाले होते. मात्र, या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी जात होत्या, त्या तुलनेत निळवंडे येथे शेतीचे व शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होत नव्हते. म्हणून पहिला प्रस्ताव दादासाहेब रुपवते यांनी मांडून यशवंतराव चव्हाण पायऊतार झाल्यानंतर वसंतराव नाईक यांनी त्यावर शिक्कामुर्तब केले. त्या धरणावर आज हजारो शेतकरी आणि लाखो लोक आपली उपजिवीकी भागवत आहेत.
           

दादासो रुपवते काॅलेज अकोले

इतकेच काय तर तो काळ १९७२ च्या भिषण दुष्काळाचा होता. राज्यात कोठेही मोठी कामे व शाळा महाविद्यालये मंजूर होतील अशी परिस्थिती नव्हती. अशावेळी भाऊसाहेब हांडे, लालचंद शहा यांच्यासारखे नेते दादासाहेबांकडे आले होते. अकोल्याचे काँलेजकुमार संगमनेरला जातात, मुलांची गैरसोय होते म्हणून अकोल्यात महाविद्यालय असावे अशी विनंती केली. या प्रस्तावाला संगमनेरच्या प्रस्तापितांनी प्रचंड विरोध केला. कारण, अकोल्याहुन आलेली मुले जर संगमनेरला आली नाही तर तिकडची काॅलेज बंद पडतील. म्हणून, अकोले काॅलेजला आडकाठ्या घालण्यात आल्या. मात्र, दादासाहेब मंत्री होते, त्यांची प्रतिमा चांगली असल्यामुळे त्यांचे वजन होते. या कडूकाळ दिवसात अकोल्यात काॅलेज मंजूर करायचे काम दादासाहेबांनी केले. मात्र, याच अकोलेकरांना त्यांच्या कोणत्याच कामाची जाणिव राहिली नाही. दादासाहेबांच्या नंतर कांदामार्केट, राजूर काॅलेज, दुधसंघ आणि व्रुद्धाश्रम वगळता कोणते उल्लेखनिय काम सरकारेन किंवा स्थानिक पुढाऱ्यांनी केले ? पण लोकनिर्वाचीत नसताना आज दादासाहेब रुपवते यांनी अकोल्याचा विकास केला. तरी ते लोकांच्या स्मरणात नाही. आज २३ जुलै त्यांचा स्म्रुतीदीन आहे. ना काॅलेजने त्यांना सन्मानाने अभिवादन केले ना साखर कारखान्यावर त्यांच्या गोडधोड आठवणींना उजाळा दिला जातो. उदार अंत:करणाच्या अकोलेकरांना कधी वाटले नाही. की, ज्या अकोले पुलाचा किंवा निळवंडे धरणाच्या पायाभारणीचे खरे शिलेदार असणाऱ्या ठिकाणांना "दादासाहेब डॅम" नाव द्यावं. स्वार्थ सोडून अकोलेकरांनी यशस्वी झालेल्या मानसांच्या पदरात टाकले तरी काय ? साधे "अगस्ति काॅलेजला" दादासाहेब रुपवते नाव द्यायचे तर काहींना पोटसुळ उठला. ज्याने ते काॅलेज उभे केले. त्याचे नाव देण्यासाठी जातीचे राजकारण उभे राहिले. शेवटी चळवळ म्हणून रिपाईचे विजय वाकचाैरे, बाळासाहेब गायकवाड, शांताराम संगारे, चंद्रकांत सरोदे, रमेश जगताप, शशिकांत शिंदे, अरुण रुपवते, दिलीप गायकवाड, वसंत उघडे, रमेश शिरकांडे अशा नव्या पिढीला रस्त्यावर उतरावे लागेले.
                 

एक खंत बाकी राहुन गेली. दादासाहेबांनी बाबासाहेबांचा खूप मोठा रथ पुढे नेऊन ठेवला होता. त्याची चाकं पुढे जाण्यापेक्षा काही अंशी मागे आली. त्यांच्या बहुजन शिक्षण संस्थांच्या झाडाचे रुपांतर वटव्रुक्षत होऊ शकले नाही. ज्या दादासाहेबांनी चळवळ उभी राहण्यासाठी पद, प्रतिष्ठा आणि पैसा, याला कधी स्थान दिले नाही. मात्र, त्यांच्यानंतर दादासाहेबांच्या पावलांचे ठसे पुढे उमटले नाही. संघराज रुपवते आणि प्रेमानंद रुपवते ही दोघेही दादासाहेब होऊ शकली नाही. अर्थात आमच्यासारखे आजही ठाम आहोत. दादासाहेबांचा स्म्रुतीदीन हाच आमच्या अभ्यासातील पुस्तकाचे शेवटचे पान. बाकी... ना अकोलेकरांना दादासाहेब समजले ना त्यांच्या कुटुंबाला. म्हणून ज्या महानायकाने, महायोद्ध्याने लाखो घरे उभी केली, लाखो भिमसैनिक उभे केले, लाखो शतकरी उभे केले, डॉ. बाबासाहेबांच्या नंतर धम्माचा गाडा अविरत ओढला, चळवळीला नेहमी स्वत:चा श्वास अर्पन केला अशा दादासाहेबांना त्रिवार अभिवादन.

(ऋणनिर्देश :- गेल्या आठवड्यात मी राजा ढाले यांच्यावर "ब्लु पँथर हरपला" हा लेख लिहीला. त्याला १० हजार बांधवांनी वाचले. आज दादासाहेबांवर लिहीण्याची वेळ आली. त्यासाठी रिपाई राज्यसचिव विजय वाकचौरे, मधुकर सोनवणे, अरुण रुपवते, रविंद्र रुपवते, किशोर रुपवते, निखील पवार, संदिप घोलप यांची मदत झाली. या सर्वांचे आभार)
--------------------------------
         ---  सागर शिंदे