वडगाव पानच्या दत्तधाम सरकारमधील भोंदु गडगे महाराजाला ठोकल्या बेड्या, अंधश्रद्धा नरबळी आणि जादुटोण्याचा गुन्हा.!
सह्याद्री (सार्वभौम)
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदु महाराज राजेंद्र बापू गडगे याच्यावर अखेर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्करोगासारख्या आजारांना मंत्राने बरे करतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, ज्या महिलांना मुल होत नाही अशा महिलांना मुल देतो, घरातल्या सर्व समस्या मंत्रोच्चाराने दुर करतो असे सांगून सामान्य लोकांकडून अकरा हजार, एकवीस हजार तसेच एक्कावन्न हजार अशा रकमा वसूल करतो. तसेच गेल्या आठ दहा वर्षापासून या भोंदु बाबाने आडल्या नडल्या माणसांकडून लाखो रुपये उकळले असून त्यांचे आर्थिक, शारिरीक व मानसिक शोषण केले आहे. असे आरोप भोंदुवर दिलेल्या फिर्यादीत करण्यात आले आहेत. याप्रकरणी काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास १)भोंदु महाराज राजेंद्र बापु गडगे २) डॉ. मोहन पुरी ३) ज्ञानेश्वरी गडगे तिघे रा.वडगाव पान ता.संगमनेर ४) सुरज शंदे ५) मधुकर शिदे दोघे रा.रहीमपुर ता.संगमनेर जि.अहिल्यानगर अशा पाच जणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे, अशोक खरात नंतर भोंदु गडगेच्या फाईली उघडतील का? त्याच्या कुकर्माची फळे त्याला मिळतील का? भोळ्या भाबड्या लोकांना फसवल्याची शिक्षा पोलीस त्याला देतील का.? की पोलीस देखील त्याच्या पाया पडतील.? याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्या अशोक खरातला ऐकेकाळी भेटायला लाईन लागत होती, त्याचे ओश्नो जल घेण्यासाठी भलेभले नेते फोन करीत, हेलिकॉप्टर पाठवत, त्या खरातला आता "कुत्र" सुद्धा भेटायला जात नाही. हे असे भेंदु अचानक उगवतात आणि भोळ्या भाबड्या जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेतात. त्यांची प्रचंड आर्थिक, शारिरीक व मानसिक लुट करतात. हे अशोक खरातने सिद्ध केले आणि त्याचे पितळ उघडे पडले. आता त्या पाठोपाठ संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील लुटारु तथा तोतया भोंदु महाराज गडगे याचे कारणामे पुढे येऊ लागले आहेत. हा लुटारु महाराज लोकांना त्याच्या दत्तधाम सरकार मठात बोलवत असे. त्याच्यापुढे पैसे फेकले की त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होते. विशेष म्हणजे हा तोतया बाबा हे सर्व त्याच्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह मांडत होता, दाखवत होता. तरी देखील अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही....
महिलांना मुलं होत नसतील तरी याच्याकडे मुलं द्यायचे सामर्थ्य होते, पती पत्नीचे नाते जोडायचे, विशेष म्हणजे हा विकृत गडगे म्हणत आहे की पत्नीने पतीला दारुचा ग्लास भरुन द्यायचा, तिने त्याची सेवा करायची. चक्क ज्याला मुलगा होत नाही त्याला चौदा महिन्यात श्रीकृष्णासारखा मुलगा होईल असे हा सांगत होता. ज्या आजारांवर उपचार नाहीत, डॉक्टर आणि विज्ञानाने हात टेकले आहेत त्या आजारावर हा गडी बिन्धास मंत्र पुटपुटून शरिरातील गाठी गायब झाल्या असे म्हणायचा. पेशन्ट मात्र पुन्हा यायचे. गाठ गेली नाही, फरक पडला नाही, मग याची अघोरी कारणे आणि विकृती सुरु व्हायची, हा आजारी माणसाकडून रग्गड पैसा वसुल करायचा, "आडला हरि गाढवाचे पाय धरी" या उक्तीप्रमाणे भोळे लोक त्याची शिकार होत असे. मात्र आता याच्या मुसक्या आवळण्यात अंधश्रध्दा निर्मुलन समितीला यश आले आहे.
खरंतर संगमनेर ग्रामीण पोलिसांनी या भोंदु बाबाला आजवर प्रोटेक्शन दिल्याचा आरोप होत आहे. अनेक तक्रारी होत होत्या, किंवा त्यांच्या हाद्दीत खुलेआम लोकांची लुट होत होती, अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात होेते, पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग होत होता, श्रद्धेच्या नावाखाली दरोडे पडत होते आणि तरी देखील दहा वर्षे पोलीस फक्त बघ्याची भुमिका घेत होते. हा तोतया भोंदू महाराज कित्तेक अक्षेपहार्य व्हिडिओ अपलोड करीत होता. त्यावर सरकार फिर्यादी हाेऊन पोलिसांनी गुन्हा का नोंदविला नाही. उलट या भोंदुच्या मदतीने काही बनावट ट्रॅप पोलिसांनी घडवून आणले, त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे, हा गडगे मोठा होण्यात आणि त्याला मोठे करण्यात पोलिसांचा देखील तितकाच रोल असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
यात विशेष दुर्दैवाची बाब अशी. की, याच वडगाव पानमध्ये एक चिमुरडी शालेय विद्यार्थीनी आजही त्या ॲसिड हल्ल्याच्या वेदना सोसत आहे. मात्र तीन महिने होऊनही तो हाल्लेखोर काही सापडला नाही. म्हणजे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हाद्दात चोर साव होऊन जगत आहेत आणि सामान्य माणूस जीव मुठीत धरुन जगत आहे. किमान आता तरी अपेक्षा आहे. की, या भोंदु गडगेवर कठोर कारवाई हे पोलिस करतील. अर्थात या कारवाईच्या कार्यपद्धतीवर देखील शंका आहे. कारण, हाच तो लबाड महाराज आहे. जो लोकांना लुटायचा आणि त्या पैशातून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बसायला बाकडे द्यायचा. त्याने आणखी काय काय दिले आणि त्याचे मलिदे कोणकोण खात होते देव जाणे.! फुकट नाही तो दिवसा ढवळ्या लोकांना लुटायचा, त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा. आता संगमनेर तालुका पोलिसांना "हिरो" होण्याची संधी आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास करणे आणि लोकांना आपिल करुन याचे कारणामे बाहेर काढणे ही नामी संधी आहे. त्यामुळे, पोलिस संधीचे सोने करतात की माती.! हो पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
असे म्हणतात की, भगवान के पास दैर है लेकीन अंधेर नही.! उशिरा का होईना लबाड भोंदुला बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. खरंतर याची एक मोडस होती. की, जो पत्रकार किंवा समाजसेवक याच्या विरोधात बोलेल, तथा लिखाण करेल. त्याला प्रचंड विश्वासात घ्यायचे, आम्ही फार घाबरलो आहोत, आपण हा विषय इथेच मिटवू असे म्हणत त्याच्याशी तडजोडीला बसायचे, चर्चा करायची, सांगताना रक्कम बऱ्यापैकी देऊ करायची म्हणजे पैसे घेणारा अमिषाला बळी पडतो आणि याच्या जाळ्यात अडकवितो. नंतर पोलिसांच्या मदतीने ट्रॅप होतो आणि खंडणी किंवा डिमांडचा गुन्हा दाखल होतो. असेच गुन्हे या भोंदु माणसाने नोंदविले आहेत. आता मात्र "आली रे आली, आता तुझी बारी आली" अशी म्हणण्याची वेळ या भोंगु गडगेवर आली आहे.
खरंतर स्वत:ला सिकंदर आणि आलेक्झांडर समजणाऱ्या भोंदुवर संगमनेर आणि अहिल्यानगर पत्रकारांनी चांगलीच मालिका चालविली. हा जिल्हा आणि अकोले- संगमनेर तालुका पुरोगामी विचारांचा आहे हे पत्रकार व समाजसेवक यांनी दाखवून दिले. याचे भोंगळ कारणामे समाजासमोर आले आणि आता या भोंदु बाबावर भारतीय न्याय सहिता कायदा कलम३१८, ३१९, ३५६, ३५२, ३५३, ३३६(४).सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अधोरी प्रथा व जादुटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधि.२०१३ चे कलम ? सह ड्रग्स अण्ड मॅजिक रेमिडिज ऍक्ट १६५४ चे कलम ७ मेडीकल प्रॅक्टीशनर ऍक्ट चे कलम ३३.३६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी भोंदु महाराज राजेंद्र गडगे तथा दत्तधाम आणि त्याचा सहकारी मधुकर शिंदे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रविण साळुंखे करीत आहेत.
टिप :- जर या गडगे भोंदुकडून तुमची, तुमच्या पाहुण्यांची, मित्राची फसवणूक झाली असेल, अन्याय अत्याचार झाला असेल तर संगमनेर पोलीस ठाणे शहर किंवा ग्रामीण येथे संपर्क साधावा.
