आमदारांनी वाळेच्या दोन कानफाडीत टेकविल्या, वीज मागितली तर कानाखाली जाळ काढला, पीएकडून सुद्धा तरुणाला धक्काबुक्की.!

सार्वभौम:- 

बिबट्यांची भिती असल्यामुळे शेतकर्‍यांना सकाळची लाईट द्या अशी मागणी लिंगदेव येथील एका शेतकर्‍याने केली होती. मात्र, भर कार्यक्रमात असा प्रश्‍न उपस्थित केला म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे यांनी शेतकरी वाळीबा होलगीर (टोपन नाव वाळे) यांच्या दोन कानाखाली मारल्या. त्यामुळे, वारंवार सामान्य व्यक्तींना मारहाण केल्यामुळे आमदारांची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. ही दादागिरी फक्त आमदारांपर्यंत थांबली नाही. तर, आज त्यांचे खाजगी पीए मुकुंद लहामटे याने देखील आंभोळ येथे एका सामान्य व्यक्तीशी हुज्जत घातली. त्याच्याशी दोन हात करुन त्याचा व्हिडिओ काढला. त्यामुळे, अकोले तालुक्यात लोकशाहीचे राज्य राहिले आहे का? असा प्रश्‍न तालुक्यातील जनतेला पडला आहे. 

त्याचे झाले असे की, शनिवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आ. लहामटे हे लिंगदेव येथे गेले होते. तेथे वाचनालयाचे उद्घाटन सुरू असताना वाळीबा होलगीर हे शेतकरी देखील तेथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर होलगीर म्हणाले आमदार साहेब थंडीचे दिवस आहेत, कांद्याच्या लागवडी सुरू आहेत, त्यामुळे आम्हाला दिवसा लाईट द्या. कारण, शेजारी जुन्नर तालुक्यात बिबट्यांनी माणसांना जीवंत खाल्ले तर शेतात गेलेल्या महिलांवर भर दिवसा हल्ले केले. त्यामुळे, सकाळीची लाईट मिळावी. मात्र, चार चौघात प्रश्‍न केल्याने आमदार साहेबांचा पार चडला आणि त्यांनी वाळीबा या शेतकर्‍याच्या दोन कानाखाली टेकविल्या. त्यामुळे, कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. ज्यांना मत देऊन प्रतिनिधित्व दिले त्यांच्या हातून असा मार खाणे हे शेतकर्‍यांच्या जिव्हारी लागल्यासारखे झाले होते.

दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर आमदार घटनास्थळाहून निघून गेले. त्यानंतर सोशल मीडियात त्यांच्यावर अनेक टिका टिप्पणी झाली. आमदारांनी शेतकरी होलगीर यांची जाहिर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. मात्र, आमदारांकडून कोणताही माफीनामा प्रसिद्ध झाला नाही. उलट कार्यकर्त्यांना होलगीर या शेतकर्‍यास गाडीत घालुन नेले आणि ते म्हणाले. की, कोणताही स्टण्टबाजी करू नको. तुला एक हजार रुपये देतो आता यावर पुढे काही प्रश्‍न वाढवू नको. स्वाभिमानी शेतकर्‍याने हजार रुपये घेतले नाही. परंतु ते घाबरुन गेले होते. मात्र, संपुर्ण होलगीर समाज एकत्र आला आणि त्यांनी आज लिंगदेव येथे जाहिर निषेध मेळावा आयोजित केला. त्यात अनेकांनी तिव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

खरंतर आमदारांच्या या घटनेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना शहाणपण येईल असे वाटत होते. मात्र, तसे काही झाले नाही. आमदारांचे स्वीय सहायक मुकुंद लहामटे याने देखील आज आंभोळ येथे एका तरुणाचा रस्ता आडविला. त्याला एका मंदीरात जाण्यापासून मज्जाव केला. म्हणजे तालुक्यात इतकी नामुश्की ओढवली आहे. की, यांना फिरणे व कार्यक्रम घेणे अवघड झाले आहे.  दारुच्या नावाखाली लोकांना दमदाटी करणे, मारहाण करणे हा प्रकार राजरोस सुरू आहे. तर, स्वत:ला अवैध धंद्यांचा व गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणवणार्‍यांवर स्वत: गुन्हेगारीचे वेळ आली आहे. तर तालुक्यात दारु कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहे, निवडणुकीच्या वेळी कोणाचे गुत्ते बुक होते? जैसी करणी वैसी भरणी अशा प्रकारची टिका आता होताना दिसत आहे. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी आता संरक्षण लागते म्हणजे किती दुर्दैवाची बाब आहे? असा सवाल नेटकरी उपस्थित करु लागले आहेत. 


दोन हजार देतो, आमदारांच्या दोन टेकुद्या.!

वाळीबा होलगीर यांच्या दोन कानाखाली लावल्यानंतर त्यांना आमदारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या एका गाडीत उचलुन नेले. आता हे प्रकरण जास्त वाढवू नको. तुला एक हजार रुपये देतो असे म्हणत होलगीर आणि त्यांच्या सामाजाचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावर कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. दोन तोंडात मारल्याचे जर आमदार एक हजार रुपये देत असतील तर आम्ही दोन हजार रुपये देतो, त्यांनी आम्हाला दोन कानाखाली देण्याची संधी द्यावी असे म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाले. इतकेच काय.! लिंगदेवची गावाची लायकी नसताना त्यांना इतका मोठा निधी दिला या वक्तव्यामुळे देखील लिंगदेव ग्रामस्थ आक्रमक होताना दिसून आले.

बिबट्या नव्हे, आमदार व पीऐंपासून संरक्षण द्या.!

अकोले तालुक्यात आमदार झालेल्या व्यक्तींनी कधी कोणत्या सामान्य मतदार व शेतकरी राजावर हात उचलल्याची आपवादात्मक सुद्धा घटना नाही. स्व. मधुकर पिचड साहेब यांच्यावर एका व्यक्तीने काळे फासले तर त्यांनी त्याला मोठ्या मनाने माफ केले. मात्र, आमदार लहामटे यांनी खडकी येथील व्यक्तीच्या उराडावर लाथ मारली, बदगी येथील काळे नावाच्या व्यक्तीला मारहाण केली, निंब्रळ असेल किंवा आता लिंगदेव येथील होलगीर असेल यांना देखील मारहाण केली आहे. इतके काय.! फक्त आमदारच नव्हे तर त्यांचा खाजगी स्विय सहाय्यक मुकूंद लहामटे याने देखील आज एक तरुणाशी हुल्लडबाजी केली. तालुक्यात एकीकडे बिबट्यांची दहशत सुरू त्यांच्यापासून लोक संरक्षण असे म्हणले जात आहे. मात्र, बिबट्यांपासून नव्हे तर आमदार आणि त्यांच्या पीएपासून संरक्षण मिळावे अशी मागणी आता तालुक्यातून होताना दिसत आहे.