वा रे उद्योग.! पान स्टॅलमध्ये हुक्का पार्लर, मध्यवर्ती भागात तरुणांचे झुरके, गांजा, टंम्हण आणि हुक्का संगमनेरमध्ये खुलेआम मिळतो.!
सार्वभौम (संगमनेर):-
संगमनेर शहरात मेफेंटरमाइन उत्तेजित करणारे ड्रग्ज, गांजा आता सुगंधी गुटखा, हुक्का स्पॉटवर कारवाई झाल्याने सुसंस्कृत संगमनेरात चालले तरी काय? संगमनेरचे बिहार होत चालले का? असा संगमनेर शहरातील सुज्ञ नागरिकांना प्रश्न पडत आहे. संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या बसस्टँड परिसरात हुक्का स्पॉट, कोळसे, सुगंधी तंबाखु, हुक्काला लागणारे सामग्री असा 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल काल मंगळवार दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजता पोलिसांनी हस्तगत केला. यामध्ये प्रवीण शंकर बत्तुल (रा. जनतानगर, ता. संगमनेर) यांस अटक केली आहे. खरंतर, कॅफे, हॉटेल्स मध्ये हुक्का पिताना सुशिक्षित, व्यापारी घराण्यातील तरुण मुले आढळुन आली होती. आता संगमनेर शहराच्या मध्यवर्ती भागात टपरीवर सहज हुक्का स्पॉट मिळत असल्याने शहरातील तरुण व कॉलेजची मुले व्यसनाच्या आहारी जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे मुलांचे पालक चिंतीत असुन त्यांनी यासर्व घटनांवर नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर बसस्थानकापुढे हुक्का स्पॉट, सुगंधी तंबाखु, गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जातो. त्यामुळे, तरुण पिढी वाम मार्गाला जात आहे. आशा वारंवार तक्रारी पोलीस ठाण्यात येत होत्या. संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली की, शहरातील बसस्टँड समोर लक्ष्मीपान स्टोल मध्ये हुक्का स्पॉट त्याला लागणारे कोळसे, तंबाखु, गुटखा विकत आहे. तर राहत्या घरी गुटख्यासाठी लागणारा कच्चामाल ताब्यात ठेऊन त्यापासुन सुगंधी गुटखा तयार करत आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक बारवकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ आपले एक पथक तयार करून लक्ष्मी पानस्टोलवर पाठवले. तेथे पोलिसांनी सापळा रचला. या पान स्टोल मध्ये खरोखर हुक्का, तंबाखु, गुटख्याची विक्री होते का? हे तपासण्यासाठी त्याच्यावर नजर ठेवली. तेव्हा विक्री करताना ते दिसुन आले. मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांची विक्री होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांच्या पथकाने लक्ष्मी पानस्टोलवर छापा टाकला.
दरम्यान, पोलिसांनी पान स्टोलची संपूर्ण झाडाझडती केली असता त्यांना हुक्का स्पॉट, त्याला लागणारी सामग्री, गुटखा, सुगंधी तंबाखु असा 1 लाख 10 हजार 497 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. अजुन कुठे मुद्देमाल लपवला आहे का? याची चौकशी केली असता आरोपी प्रवीण हा पोपटासारखा बोलु लागला. त्याच्या राहत्या घरी शिवाजीनगर येथे गुटख्याला लागणारा कच्चामाल तर सुगंधी तंबाखु, गुटखा असा 1 लाख 18 हजार एकूण 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तर या घटनेत प्रवीण शंकर बत्तुल (रा. जनतानगर, ता. संगमनेर) याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला आज न्याल्यापुढे हजर केले. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस ना. बाबासाहेब सातपुते, पो.कॉ. विजय खुळे, अतुल उंडे, सागर नागरे, राहुल पांडे, विजय आगलावे,महिला पोलीस संगीता डुंबरे, सुजाता थोरात यांनी ही कामगिरी केली. आता या लक्ष्मी पानस्टोलला कच्चामाल कुठुन आला? संगमनेरात कोण-कोणत्या पान स्टोलला कच्ची सुगंधी सुपारी येते? जर राहत्या घरी कच्चामाल सापडला त्याला पॅकिंग कोण-कोण करते? घरी मुद्देमाल सापडून देखील आरोपी एकच का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहरातील क्राईम पालकांसाठी चिंताजनक
संगमनेर शहरात महिन्याभराच्या आत राजकीय पुढाऱ्याचा मुलगा मेफेंटरमाइन ड्रग्ज विकताना मिळुन आला. तर मागील आठवड्यात तरुणांकडे गांजा मिळुन आला. आता हुक्का स्पॉट त्याला लागणारी सामग्री,कोळसा, गुटखा हे सर्व शहराच्या मध्यवर्ती भागात मिळून येत असल्याने शहरातील पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे राहता तालुक्यातील माणसांनी क्षुल्लक कारणावरून पोलीस आवारात पोलिसांवर हात उचलल्याची घटना घडली आहे. त्यामुळे, एकीकडे संगमनेरात वाढत चालेले अवैध धंदे, वाढत चाललेली गुन्हेगारी, लाच घेताना जाळ्यात अडकणारे पोलीस अधिकारी या गोष्टी संगमनेरच्या वाटचालीस फार घातक ठरणार आहेत. यावर अधिकारी आणि नेत्यांनी देखील विचार करणे गरजेचे आहे. आजकाल लोक आपल्या तालुक्याचे बिहार व्हायला नको असे म्हणतात. पण, येणार्या काळात आपल्या तालुक्याचे संगमनेर व्हायला नको अशी म्हण रुजू पडू नये म्हणजे झालं.!
