पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे तिचा गळा दाबून ठार मारले, गोड बोलून मकामध्ये नेले आणि मागून दांडा डोक्यात मारला.! पतीला अटक.!

 

सार्वभौम (संगमनेर) :-

                    संगमनेर तालुक्यातील जाखुरी गावातील एका चाळीस वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधावरून पतीला राग आला. त्याने गोड बोलुन घरापासून काही अंतरावर असणाऱ्या मकेच्या शेतात नेऊन पत्नीच्या डोक्यात लाकुड मारून तिचा गळा दाबुन निघृणहत्या केली. ही सर्व धक्कादायक घटना दि.10 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. यात संगीता भारत मोरे (वय 40, रा, मांडेमळा जाखुरी,ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ पंचनामा केला. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी तपास पथके तयार करून तपासला वेग दिला. तालुका पोलीस व पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. जेव्हा पती भारत रामभाऊ मोरे (रा. जाखुरी, ता. संगमनेर) यांना खाकी दाखवली असता ते पोपटासारखे बोलु लागले. त्यांनी खुनाची कबुली दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोवीस तासांच्या आत गुन्ह्याची उकल केल्याने तालुका पोलीस व पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाचे कौतुक होत आहे.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, जाखुरी गावातील मांडेमळा वस्तीवर मोरे कुटुंब गेली अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहे. त्यांचे तिथे छोटेसे घर आहे. मयत संगीता मोरे व पती भारत मोरे हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होती. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मयत संगीता मोरे यांचा गावाकडील व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांचे एकमेकांसोबत जीव जडल्याने त्या कोरोनाच्या अगोदर प्रियकरासोबत गावाकडे गेल्या होत्या. मयत संगीता मोरे या तीन चार वर्षे प्रियकरा सोबत राहीले. दरम्यानच्या काळात भारत मोरे यांनी देखील दुसरे लग्न केले. त्यांनी आपला संसार पुन्हा उभा करून दुसऱ्या पत्नी सोबत संसार थाटला. दरम्यान, मयत संगीता मोरे ही प्रियकराला सोडुन पुन्हा गावाकडे आली. मुलगी आजारी असल्याने तिला भेटली. दवाखान्यातील उपचारानंतर मुलगी बरी झाली. दोन तीन दिवसानंतर मयत संगीता मोरे हिचे मन जाखुरी येथे पुन्हा पतीजवळ रमू लागले. 

          दरम्यान, भारत मोरे यांनी दुसरे लग्न केले असल्याने त्यांची नेहमी शाब्दिक बाचाबाची होत होती. दि.10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सर्वजण एकत्र येऊन कुटुंबातील सदस्यांसोबत जेवण केले. घरातील सर्व जण झोपण्यासाठी गेले होते. मात्र, त्यावेळी गावाकडील प्रियकर हा देखील जाखुरी येथे मयत संगीता मोरे हिला भेटण्यासाठी आला. प्रियकर हा माझ्यासोबत गावाकडे चाल असे मयत संगीता मोरे हिला बोलत होता. परंतु मयत संगीता मोरे ही पती भारत मोरे याच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले. ती प्रियकरासोबत जाण्यासाठी तयार नव्हती. त्यावेळी पत्नी संगीताचे प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध त्रासाला कंटाळुन पती भारत याने ठरविले होते. की, हा काटा आपल्या वाटेतून कायमचा दुर करायचा. कारण, दुसऱ्या पत्नीसोबत आनंदात राहत असताना पहिली पत्नी ही वारंवार त्रास देत होती.   

दरम्यान, पत्नीला गोड बोलुन घरापासुन काही अंतरावर असणाऱ्या मकेच्या शेताकडे नेले. तेथे किरकोळ वाद सुरू झाला. पती भारत याने कोणी नसताना अंधाराचा फायदा उचलत बेसावध असताना तोंडावर लाकुड मारले. पत्नी बेशुद्ध अवस्थेत खाली पडली. त्यानंतर गळा आवळुन तिची निघृण हत्या केली. त्यानंतर तिचा श्वास बंद झाला. ती मयत झाल्याची पुर्ण खात्री झाली. मात्र, आता हे प्रेत टाकायचे कोठे? जर असेच शेताच्या कडेला उघड्यावर पडले तर आपल्यावर संशय येऊ शकतो. त्यामुळे, पती भारत मोरे याने एक आयडीया लावली. त्याने पत्नीचा खुन करून तिला ओढत शंभर मीटर अंतर असणाऱ्या फॉरेस्ट विभागातील झाडाझुडुपांमध्ये प्रेत नेऊन टाकले. शांत डोक्याने विचार करून पती भारत मोरे याने आपल्यावरील संशय प्रियकरावर यावा यासाठी एक प्लॅन बनवला. त्याने दुसऱ्यादिवशी बाथरूमचे कारण सांगून फॉरेस्ट विभागात झाडाझुडुपांमध्ये आपल्या पत्नीचे प्रेत पाहिले असे सांगितले. त्याने पोलिसांनपुढे बनाव केला.

          त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी उपविभागीय पथक व तालुका पोलीस ठाण्यातील एक पथक तयार करून या गुन्ह्यातील तपासला वेग दिला. त्यांनी फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने भौतिक पुरावे गोळा करून तपासाची दिशा ठरवली. काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यावेळी पती भारत मोरे याच्यावर संशय निर्माण झाला. त्याच्या चेहऱ्यावर कुठला ही हावभाव नसल्याने पोलिसांनी त्याला हेरले. मात्र, भारत मोरे याने देखील पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला खाक्या दाखवला असता तो पोपटासारखा बोलु लागला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मयत पत्नीच्या भावाने दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी भारत रामभाऊ मोरे (रा. जाखुरी, ता. संगमनेर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही दमदार कामगिरी पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते, पो. ह. संपत जायभाई, दत्तात्रय बडदे, अमित महाजन, आशिष आरवडे, शिवाजी डमाळे, सचिन उगले, पो. ना. राहुल डोके, पो.कॉ. राहुल सारबंदे, पो. कॉ. प्रमोद चव्हाण, अनिल उगले यांनी केली.