आताताईपणा केला तर कारखाना बंद पडेल, लोकशाहीचा अधिकार जपुन वापरा- गायकरांनी अनेकांचे कान टोचले.!

       

सह्याद्री सार्वभौम (अकोले) :- 

गेली ३५ वर्षे अगस्ति महाराजांच्या कृपेने कारखाना चांगला चालु आहे. त्यासाठी शेतकरी, कामगार, संचालक मंडळ आणि सर्व सभासदांचे फार मोठे सहकार्य लाभले आहे. शेतकर्‍यांनी कमी बाजारभाव घेऊन देखील कधी ब्र शब्द काढला नाही, कामगारांचे पगार देणे बाकी असुन देखील त्यांचे सहकार्य आहे, अनेक व्यापारी व बँकांची देणी आहेत तरी देखील कारखाना चालु आहे. कारखान्याने कोणाचे पैसे बुडविले नाही आणि बुडविणार देखील नाही. फक्त कोणी आताताईपणा केला तर कारखाना बंद पडेल. त्यामुळे, एकमेकांना सहकार्य करुन, विश्‍वासात घेऊन कारखाना चालवायचा आहे असे सिताराम पा. गायकर साहेब म्हणाले. यावेळी त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र, कठोर भुमिका घेणारे काही कामगार, कुरघोडी करणारे नेते आणि अंतर्गत घुसमट करुन चुगल्या करणार्‍या काही संचालकांचे कान त्यांनी टोचले. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि लोकशाही आली, त्या लोकशाहीच्या अधिकाराचा गैरवापर करु नका असा खोचक टोला त्यांनी लावला. १५ ऑगस्टच्या ध्वजारोहनाच्या वेळी ते अगस्ति कारखान्यावर बोलत होते.

कारखानदारी ही नगर जिल्ह्यातच अडचणीत आहे असे मुळीच नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर येथे देखील फार अडचणी आहेत. त्यामुळे, संपुर्ण महाराष्ट्रात सहकार चळवळ अडचणीत आहे, त्यात साखरची परिस्थिती फार बिकट आहे. त्यामुळे, आपला छोटा कारखाना असून देखील तो गेल्या ३५ वर्षे तग धरून आहे. ३५ वर्षापासून स्व. दादासाहेब रूपवते, स्व. मधुकर पिचड साहेब, तसेच स्व. भाऊसाहेब हांडे यांच्यासह अनेकांनी हा कारखाना सुरू ठेवण्यासाठी संघर्ष केला आहे. राज्यात बहुतांशी छोटे कारखाने बंद पडले आहे. त्यामुळे, अनेकांच्या हाताचा रोजगार गेला आणि फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तुलनात्मक आपल्या कारखान्यावर अगस्ति महाराजांचा आशिर्वाद आहे. तसेच शेतकरी, कामगार, संचालक, सभासद, बँका आणि अजित दादा पवार यांचे फार मोठे सहकार्य आहे म्हणून आपण कठीण काळात देखील टिकून आहोत असे गायकर पा. म्हणाले.



ते पुढे म्हणाले की, कारखानदारी ही एक काचेचे भांडे आहे, ते कधी फुटेल हे सांगता येत नाही. मात्र, याची जोपासना करण्याचे काम शेतकरी, कामगार व सभासदांनी केले आहे. आजवर अनेक संकटे आली. सिझन चालवायला १० पैसे नसताना सुद्धा काहीतरी मार्ग निघतोच. मात्र, अगस्तिने कोणाचे पैसा बुढविले नाही. शेतकर्‍यांचे पैसे देखील दिवाळीच्या दरम्यान दिले जाणार आहे, कामगारांचे देखील काही पगार देणे आहे ते सुद्धा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मात्र, कोणी आंदोलन करु नये, कारखान्याविषयी अपशब्द वापरु नये, कारखान्याची बदनामी करु नये. याचा परिणाम फार वाईट होत असतो. बाहेरील शेतकरी व्हायबल होतात, कामगार देखील येण्यासाठी टाळाटाळ करतात, बँका देखील आडून पहातात. त्यामुळे, गेली ३५ वर्षे अविरत संघर्ष करुन चालु असलेला कारखाना काही लोकांच्या आताताईपणामुळे बंद पडू शकतो. म्हणून आपण समन्वयाने प्रश्‍न मिटवु, सामोपचाराने मार्ग काढू आणि एकमेकांना सहाय्य करुन कारखाना चालवु अशी साद गायकर पा. यांनी घातली.

सगळीकडे कारखानदारी अडचणीत आहे. त्यामुळे, साखर चळवळ धोक्यात आहे. यावर मार्ग काढण्यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. सरकार यावर एक दिवस सकारात्मक निर्णय घेईल आणि सहकार चळवळीला चांगले दिवस येतील असे मला वाटते. अगस्ति कारखान्याचे अल्पमुदत कर्ज हे दिर्घमुदतीत टाकण्याचा प्रयत्न चालु आहे. तसे झाले तर कारखाना चालु राहण्यासाठी फार संघर्ष करावा लागणार नाही. यंदा चांगला पाऊस झाला आहे, शेतकरी ऊस लागवड करत आहेत, भविष्यात चांगले गाळप होणार आहे. त्यामुळे, प्रत्येकाने संयमाने घ्यावे, गडबड करु नये, आपण एक विचाराने निर्णय घेणार आहोत, एकमेकांना सोबत घेऊन कारखाना चालविणार आहोत. मला बरे नसताना सुद्धा एव्हाना उभे देखील राहता येत नव्हते. तरी नगरला जाऊन कारखान्याचे कामकाज केले. कारण, माझी देखील प्रामाणिक इच्छा आहे. की, हा कारखाना सदैव चालु राहीला पाहिजे. बरे नसताना मी कारखान्यासाठी झटतोय, मनातून वाटते की तब्बेत संभाळली पाहिजे. पण, कारखाना चालु दिसावा म्हणून धडपड करावी वाटते असे गायकर साहेब म्हणाले.