पोलीस अधिकार्‍याशी झटापट, आ.लहामटेंच्या कार्यकत्यांचा माज, पोलिसांचा लाठीचार्ज, आमदार म्हणे याचा हिसोब करू.!

सह्याद्री सार्वभौम (अकोले) :- 

अकोले तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा आदिवासी दिन साजरा होतो. मात्र, या उत्सवाला डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांमुळे गालबोट लागले आहे. चक्क पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याच्या वर्दीवर हात टाकून त्यांची नेमप्लेट ओढण्याची मजल आमदारांच्या कार्यकर्त्यांची झाली. त्यामुळे, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात दुर्दैव असे की, इतका राडा होऊन देखील पोलिसांनी साधी एनसी सुद्धा नोंदविली नाही. त्यामुळे, एका अधिकार्‍याच्या वर्दीवर हात पडतो तरी त्यांना काहीच वाटत नाही, पोलीस अधिक्षक बोलतील, वरिष्ठांना उत्तर द्यावे लागेल, नाचक्की होईल या भितीपोटी पोलिसांनी घटनेला दडविण्याचा प्रयत्न केला. प्रथमत: लाठीचार्ज झालाच नाही असे म्हणणार्‍या पोलिसांना आमदारांनीच उत्तर दिले. आमच्यावर लाठीचार्ज केला, आमचा नाद करु नका, तुमचा हिसाब चुकता करु, आम्ही हजारो लोक होतो, ठरविले असते काहीही होऊ शकले असतो असे म्हणत आमदारांनी वर्दीच्या चिंधड्या केल्या. मात्र, तरी देखील पोलीस उपाधिक्षक यांनी कोणातीही कठोर भुमिका घेतली नाही. त्यामुळे, पोलीस खात्यातील कर्मचार्‍यांनी नाराजीचा सुर लावला आहे. जर अधिकार्‍यांचे असे हाल आहेत तर आमच्यासारख्या सामान्य कर्मचार्‍यांनी यांचा काय आदर्श घ्यावा, नेत्यांच्या दबावाला हे बळी पडत असतील तर आम्ही कोणाच्या भरोशावर नोकरी करायची? त्यामुळे, काल व्हायरल झालेल्या व्हिडिओकडे पाहून अनेकांनी पोलिसांच्या हतबलतेवर खंत व्यक्त केली आहे.



नेमकी काय कारण होतेे..!!

काल अकोेल्यात आदिवासी दिन साजरा झाला. मारुती मेंगाळ यांनी प्रचंड मोठी सभा घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अकोल्यात आणले होते. ते परतीच्या प्रवासाला असताना आदर्श पेढ्याच्या दुकानासमोर आले असता आमदारांच्या कार्यकर्त्यांना बाजुला होण्यास नकार दिला. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात धरपकड झाली. जमाव एकत नाही म्हणून स्वत: पोलीस उपाधिक्षक मैदानात आले. मात्र, त्यांना देखील कार्यकर्त्यांनी जुमानले नाही. त्यांच्याशी झक्कडपक्कड करीत साहेबांच्या वर्दीवर हात घातला. त्यांची नेमप्लेट जमिनीवर पडली. हा सर्व प्रकार सुरू असताना जमाव आणखी चिघळला. अधिकार्‍यांच्या वर्दीला हात घातल्यानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. काही काळ एकच पळापळ झाली. मात्र, नंतर पोलिसांनी हा विषय योग्य पद्धतीने हताळला. तोवर एकनाथ शिंदे यांचा ताफा योग्यत्या ठिकाणी पोहचला होता.

ही तर पोलिसांची चूक होती.!

खरतर एकनाथ शिंदे हे काही साधेसुधे व्यक्ती नाहीत, ते माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत. असे असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस अधिक्षक यांची होती. मात्र, जेव्हा शिंदे सभास्थळाहून निघाले तेव्हा त्यांच्या मार्गावरील एक बाजु तरी रिकामी करायला पाहिजे होती. रस्त्यात असणारी वाहणे, वाटसरु आणि डिजे तसेच नाचनारे कार्यकर्ते यांना बाजुला करणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही दिसले नाही. या ताफ्यातील पहिली सफेद गाडी अगदी वेगाने आली आणि पुढे जाऊन तीच गर्दीत अडकली. त्यामुळे, मागे ताफा विस्कळीत झाला. पोलिसांच्या नियोजनात भोंगळेपणा जाणवला. त्यामुळे, कदाचित ताफ्यात अनुचित प्रकार घडला असता. कारण, अनेकांना वाटत होते. एकनाथ शिंदे हे अकोल्यात यायला नको होते, मारुती मेंगाळ यांना मोठे करायला नको, जालिंदर भोर यांचे प्रस्त वाढायला नको. त्यामुळे, सत्तेत असून देखील शिंदे यांना काही लोकांचा विरोध होता. तो विरोध त्यांना ताफ्याला आडवे होऊन व्यक्त केला. या सगळ्या नियोजनात पोलिसांच्या नियोजनाचा प्रचंड आभाव जाणवून आला.



आमदारांची भुमिका चुकीचीच..!

खरंतर आपला एखादा सन उत्सव कर्कश आवाज असणार्‍या डिजेच्या तालावर आणि लोकांच्या बोकांडी बसून नाचण्यापेक्षा त्याला वैचारिक वळण देणे अपेक्षित आहे. कारण, बोलताना फार पुरोगामी आणि नैतिकतेच्या गप्पा मारताना दिसतात. मात्र, मिरवणुकीत मद्यधुंद कार्यकर्त्यांच्या काय आवस्था होत्या, रस्त्याने किती अपघात झाले, किती तरुण जखमी झाले याची त्यांना जाणिव नाही का? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, कार्यकर्त्यांना अधिकार्‍यांच्या वर्दीवर हात घालायचा आणि तरी त्याच कार्यकर्त्यांना सपोर्ट करायचा, आम्ही हिसाब चुकता करु, पाहून घेऊ, कारवाई करु ही भाषा कितपत योग्य आहे? हिच गोष्ट अजित पवार यांचा ताफा अडविताना झाली असती तर? त्यामुळे, कार्यकर्त्यांना शहाणपणा शिकविण्यापेक्षा त्यांना चुकीचे समर्थन करताना आमदार दिसून आले. आमचा नाद करायचा नाही हे मागील वर्षी वापरलेले वाक्य यंदा देखील त्यांना पोलिसांना वापरले. त्यामुळे, ही सत्तेची मस्ती त्यांच्यात दिसून आली.

पोलिसांचे मनोबल खचले.!

दुसर्‍यांवर अन्याय झाला तर त्यांना न्याय देण्यासाठी पोलीस मदत करतात असे म्हटले जाते. मात्र, येथे स्वत:वर अन्याय झाला तरी पोलिसांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवल्याचे पहायला मिळाले. बड्या अधिकार्‍यांच्या वर्दीवर हात घातला जातो, पाहुन घेऊ, हिसाब चुकता करू अशा अनेक धमक्या दिल्या जातात. तरी आयपीसी काल १८६ नुसार साधी एनसी सुद्धा दाखल केली जात नाही. इतकी हतबलता पोलिसांमध्ये दिसून आली. अर्थात म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये अशी म्हण आहे. त्यामुळे, पोलिसांशी दोन हात केल्याने कोणी काहीच वाकडे करीत नाही असा संदेश काल गेला आहे. यांना धमक्या द्या नाहीतर गचांडी धरा, काही होत नाही अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे, एखादा खमक्या अधिकारी असता तर त्याने किमान अदखलपात्र गुन्हा तरी नोंदविला असता. त्या निमित्ताने अकोले तालुक्याला अनेक खमक्या अधिकार्‍यांची आठवण झाली. अनेक पोलीस उपाधिक्षकांच्या कठोर भुमिकांना उजाळा मिळाला. तर, सामान्य पोलीस कर्मचार्‍यांचे मनोबल खचलेले दिसून आले. जर अधिकार्‍यांचे हे हाल आहेत तर आपल्यावर वेळ आल्यावर हे उभे राहू शकत नाही अशी भावना खाकीतील कर्मचार्‍यांनी बोलुन दाखविली आहे. तर, कार्यकर्ते म्हणत होते, की आम्ही अधिकारी झोडला कोणी काय वाकडे केले? या चर्चेने तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



एसपी साहेब.! तुम्हीच लक्ष घाला...

नगर जिल्ह्याला माजी पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश, ज्योती प्रियासिंग, विश्‍वास नांगरे पाटील तसेच लखमी गौतम यांच्यासारखे खमके अधिकारी लाभले होते. त्यांनी कधी पुढारी, आमदार, खासदार यांचा दबाव सहन केला नाही. लखमी गौतम यांनी तर अनेक आमदार आणि मंत्री यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यात शिक्षा देखील लागली. केवळ पोलीस दलातील साध्या कर्मचार्‍याकडे बोट जरी केले तरी त्याच्या नांग्या ठेचण्याची ताकद त्यांच्यात होती. आमरावतीमध्ये एकदा दंगल झाली होती. पोलिसांना खुले आम पळुपळू मारले होते. तरीदेखील तत्कालिन अधिकार्‍यांनी पुढार्‍यांच्या दबावापोटी मुग गिळु भुमिका घेतली होती. तेव्हा लखमी गौतम हे ग्रामीण पोलीस अधिक्षक होते. तेव्हा जखमी झालेल्या पोलिसांनी प्रतिक्रिया दिली होती.  'शहराला असते' गौतम लखमी' तर आम्ही नसतो झालो जखमी. विशेेष म्हणजे लखमी हे नगर जिल्ह्यातून बदलुन गेले होते. त्यांनी विखे पाटलांना देखील न जुमानता काही निर्णय घेतले होते. त्यामुळे, पोलिसांना बळ देण्याचे काम अधिकार्‍यांनी दिले पाहिजे. अन्यथा साहेबच गप्प तर आपण का उड्या मारायच्या? आणि कोणाच्या भरोशावर? अशा प्रकारचे प्रश्‍न आता पोलीस कर्मचारी उपस्थित करु लागले आहे. त्यामुळे, अहिल्यानगर पोलीस अधिक्षक यात लक्ष घालतील अशी अनेक पोलिस कर्मचार्‍यांना अपेक्षा आहे.