आ. अमोल खताळांना मंत्रीपदाचे संकेत, अलोट गर्दी पाहून एकनाथ शिंदे खुश, थोरात व तांबे यांच्यावर निशाणा.!

   

सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :- 

सन १९७८ साली भाऊसाहेब थोरात आणि त्यानंतर सन १९८५ ते २०२४ पर्यंत मा. आ. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात तालुक्यावर आपले निर्विवाद वर्चस्व गाजविले आहे. मात्र, कॉंग्रेसच्या या अभेद्य बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे काम आ. अमोल खताळ यांनी केले. खताळ हे नाव फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादीत राहिले नाही. तर, दिल्लीत देखील ते परिचित झाले आहे. खताळ यांची लोकप्रियता फक्त निवडून येण्यापुरती नाही. तर हातात कोणताही साखर कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही, दुधसंघ नाही किंवा घरी धनदौलत नाही. तरी देखील २० हजारांच्या जवळपास सामान्य जनता एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी संगमनेरात येते ही गोष्ट उपमुख्यमंत्री यांना जास्त भावली. त्यामुळे त्यांनी जनतेसमोर सांगितले. की, अमोल खताळ हे पुर्वी फक्त जायंन्ट किलर होते, आता त्यांना सुपर जायंन्ट किलर करायचे आहे असे म्हणत शिंदे यांनी अमोल खताळ यांना थेट मंत्री करणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे, किमान राज्यमंत्री पदी आ. अमोल खताळ यांची वर्णी लागण्याची शक्यता बोलली जात आहे. या यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन अमोल खताळ पा. यांच्या टिमसह विखे. पा. यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद रहाणे, प्रशांत कांबळे, सुजित क्षिरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतल्याचे पहायला मिळाले. 

विखे पा. यांनी शब्द पाळला.!

अमोल खताळ हे नवीन व्यक्ती होते. त्यांनी अचानक उमेदवारी दिली गेली होती. खर्‍या अर्थाने याचे श्रेय्य ना. राधाकृष्ण विखे पा. यांना जाते. खताळ यांच्या हाती एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबान दिला आणि मोठ्या मताधिक्याने खताळ निवडून आले. विखेपाटील यांनी मला शब्द दिला होता. की, खताळ यांना निवडून आणायची जबाबदारी घेतो. त्यांनी जो शब्द दिला तो पाळला. आज ते लंडन येथे गेले आहेत. मात्र, त्यांच्यामुळे खताळ यांना आपला विजय सुखकर गेला आहे. त्यांचे मानावे तितके आभार कमी आहे असे शिंदे म्हणाले. यावेळी विखे. पा. यांना आयडॉल ऑफ इंडिया हा पुरस्कार लंडनमध्ये मिळाला त्याबद्दल शिंदे यांनी अभिनंदन देखील केले. 

वारकर्‍यांचा अपमान खपून घेणार नाही.!

संगमनेर तालुक्यात गेल्या आठवड्यात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किर्तन बंद पाडले आणि त्यांच्यावर हल्ला केल्याची आरोप झाला. ही गोष्ट आम्ही हिंदुत्ववादी कधीच खपवून घेऊ शकत नाही. कॉंग्रेसच्या काळात दोन साधुंची हत्या केली तेव्हा हे लोक कोठे होते? त्यामुळे, महायुतीच्या काळात वारकर्‍यांच्या केसाला देखील धक्का लावायची हिंमत करु नये. आमचे हिंदुत्व टिशर्ट आणि बनियान सारखे नाही ते कधीही काढले आणि कधीही घातले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे हिंदुत्ववादी आहोत. त्यामुळे, येथील संत परंपरेवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही अशी तंबी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

सभेतून काय मिळाले.!

आ. अमोल खताळ यांनी त्यांच्या भाषणातून पोटतिडकीने काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम मार्गी लागले, महिलांसाठी तसेच बालकांसाठी एक सुसच्च रुग्णालय मंजुर करण्याचे आदेश देण्यात आले, संगमनेर तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून येथे एमआयडीसी मंजूर केली जाणार आहे, संगमनेर शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून एक प्लॅन्ट दिला जाणार आहे त्याच प्रमाणे गेल्या १० वर्षात संगमनेर तालुक्यात जो काही भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी देखील करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्या.!

महाविजय साजरा करीत असताना आभार यात्रा म्हणून एकनाथ शिंदे संगमनेरमध्ये आले होते. मात्र, त्यासाठी त्यांनी नुकत्याच तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त शोधला. संगमनेरात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे, जे-जे विकासात्मक महत्वाचे मुद्दे होते ते शिंदे यांनी घेतले. त्या दृष्टीकोणातून एमआयडीसी, रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, आरटीओ कार्यालय यांच्यासह आमोल खताळ यांना सुपर जायंन्ट किलर करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण होणार असून शहरातील व तालुक्यातील अनेक कामे मार्गी लागले तर त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांना होऊ शकतो या दृष्टीकोणातून आजची प्रचंड मोठी सभा पार पडली.

अकोल्यानंतर संगमनेरातही लाठीचार्ज

अकोले तालुक्यात एकनाथ शिंदे यांची सभा होती. तेव्हा आ. डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांच्या आताताईपणामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता. दुर्दैवाने आज संगमनेरमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा असताना सभेच्या पुर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे, कार्यकर्त्यांचे कपडे गळेपर्यंत त्यांना मारहाण झाली. तर, माराच्या भितीपोटी एकच पळापळ झाली. सभा चालु असतानाच राज्यातील मोठ्या चॅनलांवर लाठीचार्जच्या बातम्या झळकताना दिसून आल्या. त्यामुळे, कार्यक्रम चांगले होतात, मात्र पोलिस नेहमीच लाठीचार्ज करत असल्यामुळे चांगल्या सभेला गालबोट लागल्याचे चित्र दिसत असते. दुर्दैवाने अकोले आणि संगमनेर अशा दोन्ही ठिकाणी लाठीचार्ज होऊन पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद असल्याचे निदर्शनास आले नाही.

   दरम्यान, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आ. सत्यजीत तांबे यांचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, आ.थोरात तुम्ही भाच्याला आमदार केलं. पण एकनाथ शिंदे साहेब यांनी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केलं. त्यामुळे, आ.अमोल खताळ हे काय साधे नाही. त्यांनी घराणेशाहीच्या कानाखाली काढलेला जाळ आहे. एका सर्वसामान्य घराण्यातील मुलगा आमदार झाल्याने आ. थोरात हे वैफल्यग्रस्त झाले आहे. आ. थोरातांनी इथं खरंच विकास केला आहे का? त्यांनी बहिणीला नगराध्यक्ष केलं म्हणजे विकास झाला का? मेव्हण्याला आमदार केलं म्हणजे विकास झाला का? जावयाला चेअरमन केलं म्हणजे विकास झाला का? स्वतः चेअरमन झाले म्हणजे विकास होतो का? इथं तालुक्यातील जनता थेंबा-थेंबासाठी तरफडली. मात्र, माझा आणि माझा जनतेचा विकास झाला म्हणजे तालुक्याचा विकास होत असतो का अशी टीका शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आ. थोरात साहेब यांच्यावर केली. त्या पुढे बोलल्या की, आजच्या सभेतील एक कॅमेरा सगळीकडे फिरवा. इथं येणारा प्रत्येकजण स्वाभिमानी आहे. इथं येणारा व्यक्ती हा कारखण्यावरील कर्मचारी नाही. कुठल्या संस्थेवरील नाही. इथं येणारा कार्यकर्ता हा स्वाभिमानी असुन एकनाथ शिंदे साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.