पत्नीच्या नरडीवर कुर्हाडीने घाव घालुन ठार केले, संगमनेरात घारगाव मधील घटना, आरोपी अटक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने गळ्यावर व डोक्यावर वार करून निघृनपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि.31 जुलै रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चंद्रकला दगडू खंदारे (रा. घारगाव,ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून दगडू लक्ष्मण खंदारे (रा. घारगाव, ता. संगमनेर) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आज न्यायालयापुढे हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दगडू लक्ष्मण खंदारे हे घारगाव येथील रहिवासी असुन त्यांचे छोटेसे कुटुंब आहे. ते शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना एक मुलगा व सुन देखील तेथेच घराशेजारीच राहतात. आरोपी दगडु खंदारे हे नेहमी चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नी बरोबर वाद करत होते. गावातील एका व्यक्ती बरोबर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी त्या व्यक्तीच्या घरी ते काठी घेऊन वाद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी दगडु खंदारे यांना मुलांनी समजावुन सांगितले होते. त्याचवेळी गावातील संशय असणाऱ्या व्यक्तीला देखील दगडु खंदारे हे दारूच्या नशेत संशय घेतात असे समजावुन सांगितले.
दरम्यान, बुधवार दि.30 जुलै 2025 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास दगडु खंदारे व कुटुंबातील सर्वजण जेवणासाठी एकत्र घरात बसले. जेवण झाल्यानंतर पुन्हा दगडु खंदारे हे पत्नीला अनैतिक संबंधाच्या कारणावरून शिवीगाळ करत असताना म्हणाले. की, तुझे आणि गावातील एका व्यक्तीचे अनैतीक संबंध आहे. तु त्याच्याकडे निघुन जा. असे म्हणुन शिवीगाळ करू लागले. त्यावेळी मुलाला देखील म्हणाले की, तुझ्या आईचे आणि गावातील एका व्यक्तीचे अनैतिक संबंध आहे. एकदिवस मी तुझ्या आईला नाहीतर संशयीत गावातील व्यक्तीला मारून टाकणार आहे. त्यानंतर दगडु खंदारे हे घराकडे जात असताना गायीची दोरी हातात घेऊन जात असताना मुलाने हटकावले ती दोरी पुन्हा गायीला लागणार आहे. ती तेथेच ठेवा असे मुलाने सांगितले. दगडु खंदारे यांनी त्याच ठिकाणी दोरी ठेऊन झोपण्यासाठी घराकडे पत्नीला शिवीगाळ करत गेले.
दरम्यान, आरोपी दगडु खंदारे हे झोपण्यासाठी शेतातील पत्र्याच्या खोलीमध्ये गेले. ते शांत झोपले की नाही हे पाहण्यासाठी मुलगा रात्री 1 वा. घराकडे गेला. जेव्हा मुलगा घरात शिरला तेव्हा आई चंद्रकला खंदारे ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्यावेळी वडील तेथे दिसले नाही. आईला उठवण्याचा प्रयत्न केला असता तिचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात दगडु लक्ष्मण खंदारे (रा. घारगाव,ता. संगमनेर) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडताच पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.