आरोपीकडून दिड कोटी रुपये रक्कम ऑनलाईन लाच स्विकारली, एलसीबीच्या पीएसआयसह तीन कर्मचारी निलंबीत, गुन्हा दाखल होणार.!
सार्वभौम (अ.नगर) :-
एका प्रकरणात गुन्हा दाखल करु नये म्हणून खुद्द स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचार्यांनी चक्क १ कोटी ५० लाख रूपयांची लाच ऑनलाईन स्वरुपात घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना जेव्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना समजली असता त्याची सखोल चौकशी करण्यात आली. यात पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव, पोलीस हेडकॉनस्टेबल मनोहर सिताराम गोसावी, पोलीस हेडकॉनस्टेबल बापुसाहेब रावसाहेब फोलाणे व पोलीस हेडकॉनस्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे अशा तिघांना तताडीने निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील अधिकचा तपास पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे हे करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या घटनेतील फिर्यादी यांनी ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स कंपनी शिर्डी यांच्याकडे मुळ रकमेला चांगला परतावा मिळतो म्हणून ८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, पैसा घेऊन हे लोक पसार झाले. या संदर्भात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे या घटनेचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे. हा तपास सुरू असताना यातील आरोपी भुपेंद्र राजाराम सावळे (रा. नांदुर्खी रोड, शिर्डी) याच्याकडे गुंतवणुकीबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले. की, शेअर मार्केट चढ उतारामध्ये मोठ्या प्रमाणात घाटा झाल्यामुळे गुंतवणुकदारांचे पैसे परत करु शकलो नाही. तसेच त्याच्याकडे जनतेच्या ठेवी आणि परतावा याबाबत माहिती विचारली असता तो म्हणाला. की,
दि. 15 जानेवारी 2025 रोजी मी व माझे दोन भाऊ तसेच काही मित्र मिळून आम्ही फॉर्च्युनर गाडीत नाशिकला जात होतो. तेव्हा राहाता तालुक्यातील लोणी जवळ असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय तुषार धाकराव व त्याच्या सोबतच्या तीन पोलीस कर्मचारी आम्हाला आडवे झाले. ते म्हणाले, तुझ्याकडे कोणतेही आरबीआय चे लायसन्स नसतांना तू जनतेकडून पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतो, म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो. तेव्हा आरोपी म्हणाला की, माझ्यावर कोणतीही कारवाई करु नका, मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही, मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्हयात अडकवून नका. पण या पोलिसांनी हा विषय फार ताणला, त्यावर पीएसआय व त्यांचे सोबतचे कर्मचारी म्हणाले. की, तुला जर यातुन सुटायचे असेल तर तु आम्हाला १ कोटी ५० लाख रुपये रोख स्वरुपात दे.!
त्यावर आरोपी म्हणाला. की, साहेब.! माझ्याकडे रोख स्वरुपात पैसे नाहीत, मी नगद स्वरुपात पैसे देवु शकत नाही. त्यानंतर पीएसआय तुषार धाकराव व सोबतच्या पोलीसांनी आरोपीसह त्याच्या सोबत असणार्या सहकार्यांना अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आवारातील पार्कीगमध्ये आणले. तेथे थांबल्यावर पीएसआय तुषार धाकराव याने आरोपी याला ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपयांची मागणी केली. रोख नसली तरी चालेल, ऑनलाईन स्विकारण्याची मानसिकता यांनी दर्शवली. विनाकारण एखाद्या खोट्या गुन्हयात अडकण्यापेक्षा पीएसआय तुषार धाकराव यांनी सांगीतले प्रमाणे, त्यांनी दिलेल्या अकाउंटवर आरोपीने ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये ट्रान्सफर केले.
आता तब्बल सात महिन्यांनी हा विषय उघड झाला असता त्याची सखोल चौकशी केली. त्यात पीएसआय तुषार धाकराव व त्यांचे सोबतचे तीन पोलीस अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचे सकृतदर्शनी दिसुन आले आहे. त्यामुळे, आज दि. २१ जुलै २०२५ रोजी पोलीस अधीक्षक यांना अहवाल सादर करण्यात आला, त्यानुसार पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव, पोलीस कर्मचारी मनोहर सिताराम गोसावी, पो.हे.कॉ बापुसाहेब रावसाहेब फोलाणे व पो.हे.कॉ. गणेश प्रभाकर भिंगारदे (सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर) यांना शासन सेवेतुन निलंबीत केले आहे.