बाप रे.! अकोल्यात 1 कोटी 1 लाख रुपयांचे गुटखा, कोतुळ, अकोले, समशेरपूर येथील 12 आरोपी अटक, सर्वात मोठी कारवाई.!

 

सार्वभौम (अकोले) :-

                 अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात एका पत्र्याच्या शेड मध्ये पोलीस अधीक्षक  यांच्या पथकाने छापा टाकला. यात हिरा पान मसाला 110 पोते, रॉयल 717 सुगंधी तंबाखु 50 पोते असा 1 कोटी 1 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज रविवार दि. 13 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास केली. यामध्ये शोहेब शाबीद काझी (रा. कोतुळ, ता. अकोले), शाहीद हुसेन लतीफ पटेल (रा.कोतुळ, ता.अकोले), मतीन शबीर शेख (रा. कोतुळ,ता. अकोले), शहा नवाज जावेद काझी (रा. कोतुळ,ता. अकोले), परवेज युनूस शेख (रा. कोतुळ, ता. अकोले), साद अनवर तांबोळी (रा. अकोले), अतीक अनवर शेख (रा. समशेरपुर, ता. अकोले), शाहरुख जावेद काझी (रा. कोतुळ, ता. अकोले), सादिक पठाण (रा. अकोले), अमोल शरद जाधव (रा. अकोले), जुबेर युनुस शेख (रा. कोतुळ, ता. अकोले), इम्रान रौफ शेख (रा. कोतुळ, ता. अकोले)  यांस आरोपी करण्यात असुन ही दमदार कामगिरी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली आहे.

                     दरम्यान, अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा सापडणे ही फार धक्कादायक बाब आहे, याच ठिकाणाहून अकोले तालुक्यातील सर्व ग्रामीण भाग आणि वाडी वस्तीवर हा गुटखा आणि सुगंधी तंबाखू पुरविली जात होती. ही माहिती प्रोबेशनरी पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर खाडे यांनी पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी शोयेब काझी याच्या पत्र्याच्या शेडमध्ये कोट्यावधी रुपयांचा गुटखा मिळून आला. ही तंबाखू संगमनेर पठारभाग आणि अकोले तालुक्यातील मुळा परिसर अशा विविध ठिकाणी पुरविली जात होती. तसेच समशेरपूर, देवठाण, राजूर विभागात देखील सप्लाय होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून 1 कोटी 1 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई खाडे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय राजेंद्र वाघ, पोलीस कर्मचारी शंकर चौधरी, दिगंबर कारखीले, अजय साठे, दिनेश मोरे, आरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, सुनील दिघे, अमोल कांबळे, मल्लिकार्जुन बनकर, जाधव आणि दहिफळे या पथकाने केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, अकोल्यामध्ये दुर्गमभाग मोठ्याप्रमाणात आहे. तसेच पुणे व नाशिक जिल्ह्याची हद्द जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचे केंद्र अकोले झाले आहे. खेडेगावातील डोंगराच्या कुशीत एखादी खोली पाहतात. त्यामध्ये, गांजा, गुटखा, एम. डी. असे नशासाठी लागणारे मादक पदार्थ विक्रीसाठी आणले जातात. यामधून कोठ्यावधी रुपयांची उलाढाल करतात. आता हा सर्व प्रकार पोलिसांना माहीत नसावा का?  जिल्हातील विशेष पथक येऊन अकोल्यात गुटखा पकडते. मंग अकोले पोलीस करते तरी काय? त्यामुळे, येथील पोलिसांचे देखील हात मलिद्याने बरबटलेले असुन ते अवैध धंद्याना पाठीशी घालताना दिसते. कारण, आज ही दुकान तेथे तंबाखु आणि टपरी तेथे गुटखा अशी परिस्थिती दिसत आहे. मात्र, अकोले पोलीस ठाण्यातून एकही कारवाई झाली नाही? याचे देखील आश्चर्य वाटते आहे. मात्र, काही का होईना अशा गुटखा किंगवर कारवाईला मुहूर्त लागला हे महत्वाचे आहे.

           दरम्यान, विशेष पथकात संतोष खाडे यांनी एन्ट्री मारली . तेव्हापासून जिल्ह्यात अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणून टाकले आहे. त्यांनी छोट्या माश्यांकडे लक्ष केंद्रीत न करता. मोठे मासे गळाला लावले. यामधून जिल्ह्यात चालणारे अवैधधंदे समोर आले आहे. संगमनेरचा मटका, गोमांस, कोपरगावला जुगार अड्डे, नेवासा, पारनेर, पाथर्डी, श्रीरामपूर, श्रीगोंदा येथे वाळूवर कारवाई केल्यानंतर आज अकोले येथे सुगंधी तंबाखु, गुटखा यावर कोट्यवधी रुपयांची कारवाई केली आहे. प्रत्येक कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना आरोपी केले आहे. त्यामुळे, पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नावाचा अवैध धंदे करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला. असुन सोशल मीडीयावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खरंतर, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत होते. तेव्हा ते कोणाच्या एक रुपयाला देखील मिंधे नव्हते. त्यामुळे, अवैधधंद्यांनी अकोले-संगमनेरात आपला गाशा गुंडाळून बिळात लपले होते. त्यानंतर पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढले होते. आज पुन्हा पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे या नावाने गोरखधंद्यांमध्ये "डर" निर्माण केले.