शेजारी महिला शेतात शौचालयास गेली म्हणून तिची धारधार शस्त्राने हत्या, खुनाचा गुन्हा, मालकासह तिघांना अटक.!
सार्वभौम(संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे शेतात शौचालयाला का येतात या कारणावरून दोन गटात किरकोळ वाद झाला. छोट्या वादाचे रूपांतर मोठ्या वादात होऊन धारधार शस्रने महिलेच्या डावे बाजुस खुपसुन हत्या केल्याची धक्कादायक घटना काल मंगळवार दि. 10 जुन 2025 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आज बुधवार दि.11 जुन रोजी उपचारादरम्यान डॉक्टरांनी मयत घोषीत केले आहे. रुपाली ज्ञानदेव वाघ (रा. कर्जुले पठार, ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी मुरलीधर रामकृष्ण पडवळ,विक्रम मुरलीधर पडवळ, अलका विक्रम पडवळ (तिघे रा.कर्जुले पठार, ता. संगमनेर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत रुपाली वाघ हे कर्जुले पठार येथे शेतीवरील मोल मजुरीवर उदरनिर्वाह करत होते. त्यांचे मोठे कुटुंब एकत्र राहत होते. आरोपी मुरलीधर पडवळ व मयत रुपाली वाघ हे एकाच गावात राहत असुन त्यांची वस्ती काही अंतरावर होती. मयत रुपाली वाघ यांच्या शेजारी आरोपी मुरलीधर पडवळ यांचे पडीत शेत होते. मयत रुपाली वाघ यांच्या घरी शौचालय नसल्याने ते आरोपी मुरलीधर पडवळ यांच्या शेतात अधुन मधुन शौचालयासाठी जात होतात. मंगळवार दि.10 जुन 2025 रोजी रात्री 6:30 वा. सुमारास रुपाली ह्या शौचालयासाठी या पडीत शेतात जातात. तेव्हा तेथे मुरलीधर पडवळ यांचा मुलगा विक्रम पडवळ हा या महिलेला हटकवतो. तुम्ही आमच्या शेतात शौचालयासाठी का जाता? असे म्हणुन वाईट शिवीगाळ करतो. दोघांमध्ये तिथे किरकोळ बाचाबाची होते.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मयत रुपाली वाघ व दिर, नणंद असे कुटुंबातील चौघे जण आरोपी विक्रम पडवळ याच्या घरी समजावून सांगण्यासाठी गेले असता. तेथे घरा बाहेरच त्यांनी मयत रुपाली वाघ यांच्या कुटुंबाला वाईट वाईट शिवीगाळ सुरू करून दमदाटी करू लागले. त्यावेळी मयत रुपाली वाघ यांच्या कुटुंबाने सांगितले की, आमची चुक झाली आहे. आम्ही सर्व लोक तुमची माफी मागतो. असे सांगत असताना आरोपी मुरलीधर पडवळ म्हणाले की, तुम्ही फार माजले आहे, आता तुम्हाला दाखवतोच"असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच आरोपी विक्रम पडवळ म्हणाला की, आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही. असे म्हणुन त्याने घरात जाऊन एक धारदार चाकू घेऊन बाहेर आला. आरोपी अलका पडवळ हिने मयत रुपाली वाघ हिचे हात धरले. व विक्रम पडवळ याने त्याच्या हातामधील चाकू रुपाली वाघ हिच्या पोटात डाव्या बाजूस घुपसला. मध्ये सोडवण्यासाठी गेलेल्या मोनिका हिच्या देखील कंबरेला चाकूचे वार झाले.
दरम्यान, रुपाली वाघ ही संपूर्ण रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडली. तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तीला आज बुधवार दि. 11 जुन 2025 रोजी रात्री 12:30 वाजता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. त्यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ, अलका विक्रम पडवळ (तिघे रा.कर्जुले पठार, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्ह्यासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आज कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.