आ.डॉ.लहामटेंच्या तोर्यामुळे अगस्ती कॉलेज पिचडांच्या ताब्यात.! निवडणुका आली की यांना जाग येते.!
सार्वभौम (अकोले) :-
सन २०२२ च्या एप्रिलमध्ये अकोले येथील अगस्ति कॉलेजच्या गेटवर आंदोलन झाले होते. प्राध्यापक भरतीत होणारा भ्रष्टाचार, घराणेशाही आणि संचालक नेमण्याहून पिचड कुटुंबाच्या विरोधात ठराविक उद्दीष्ट ठेवून सर्वपक्षिय लोक एकत्र आले होते. तेव्हा कॉलेजवर चार मुख्य विश्वस्त होते. त्यात स्व. मधुकर पिचड साहेब, मा.आ.वैभव पिचड, सिताराम पा. गायकर साहेब आणि गिरजाजी जाधव साहेब यात गायकर साहेब हे एकमात्र असे विश्वस्त होते. की, त्यांची विरोधी पक्षाची भुमिका त्या संस्थेत होती. तसेच संचालक म्हणून सोबत कचरु पाटील शेटे साहेब, स्व. विठ्ठलराव चासकर आणि बाळासाहेब भोर हे देखील होते. आता या चौघांनी राजिनामे द्यावे अशी मागणी आंदोलकांची अर्थात साडेतीन शहाण्यांची होती. यात एक साधी आणि सरळ गोष्ट होती की, जर विरोधीपक्षातील किंवा विरोधी मतांतरे असणार्यांनी राजिनामे दिले, तर ती संस्था एक हाती पिचड साहेबांच्या ताब्यात जाईल हे अगदी डोक्यात मेंदु नसलेला माणूस सुद्धा सांगू शकेल. पण, पिचड आणि अन्यत्र व्यक्तींचे राजिनामे मागण्याऐवजी यांनी गायकर साहेबासह चौघांचे राजिनामे घेतले आणि ते नेवून दिले. आता आयतं जांभूळ तोंडात पडतय म्हटल्यावर ते कोणाला नको आहे? पिचड साहेबांनी राजिनामे मंजूर करुन घेतले आणि आता घराणेशाही झाली अशा बोंबा मारताना आंदोलक दिसत आहेत. मग विषय पुन्हा ऐरणीवर आला कसा? तर, हेमलता पिचड ताई यांना विश्वस्त म्हणून घेताना तेथे विरोधक कोणी राहिलाच नाही. अर्थात तो डॉ. लहामटे आणि त्यांच्या समर्थकांनी ठेवलाच नाही.त्यावेळी गायकर साहेब त्यांचा राजिनामा आमदार महोदयांकडे देत होते, मात्र त्यांचा तोरा काही औरच होता. ते म्हणाले माझ्याकडे नको, नेवून द्या. आज पुर्णत: अगस्ति कॉलेजची संस्था पिचडांच्या ताब्यात जाण्यास जर कोणी जबाबदार असेल तर ते केवळ आमदार डॉ. किरण लहामटे आहेत असे तालुक्यातील जनता आणि सभासदांचे मत आहे.
काय करायला हवे होते?
आम्ही काय अशिक्षित माणसांशी चर्चा करु का? असे म्हणत आंदोलकांनी निवेदन घ्यायला आलेल्या व्यक्तींची अवहेलना केली होती. आता जनतेला प्रश्न पडतो, की आंदोलनात तीन चार डॉक्टर होते. हे तरी शिकलेले असतील.! मग त्यांना हे का समजले नाही. की, राजिनामे मागायचे तर विरोधकांचे मागायचे असतात, बरं आपले मागितले तर ते आपल्याच जवळ ठेवायचे असतात, जर ते संस्थेत दिले तर मंजूर होऊन ही संस्था विरोधकांच्या एकहाती ताब्यात जाईल. हे समजण्याइतके तरी यांचे शिक्षण होते ना? त्यामुळे, डॉ. किरण लहामटे हे त्या आंदोलनाचे अध्यक्ष होते, त्यांनी गायकर साहेब, शेटे पाटील, चासकर साहेब आणि भोर साहेब यांचे राजिनामे घेऊन स्वत:कडे ठेवायला हवे होते. त्यांनी तसे न करता ते राजिनामे संस्थेकडे पाठविले आणि ही अकोले तालुका एज्युकेशन संस्था एक हाता पिचड साहेबांच्या ताब्यात दिली.
कट्टर विरोधक, पक्का मित्र.!
निवडणुका आल्या की डॉ. लहामटे यांची काहीतरी नवी रणनिती आपल्याला पहायला मिळते. २०१९ मध्ये पिचड साहेबांची दुसरी बायको आणि बिगर आदिवासी मुद्दा काढून त्यांनी तालुक्यात रणकंद माजविले, त्याचे पुढे काय झाले? तर अद्याप त्याचा थांगपत्ता नाही. २०२४ मध्ये पिचड साहेब अखेरच्या घटका मोजत असताना बातम्या आल्या. की, पिचड साहेब तुम्ही मरु नका, मी काय विकास केला ते पहायला थांबा. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा डंका वाजला आणि डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत हात घातला आहे. गेली तीन वर्षे निद्रिस्त असलेले आंदोलक आता जागे झाले आणि अताएसोवर बोलु लागले. म्हणजे कट्टर पिचड विरोधक म्हणून पुढे आलेला चेहरा म्हणजे डॉ. लहामटे होय.! पण निवडणुक आल्यानंतरच का? अर्थात पिचडांना इतका विरोध करुन देखील २०२४ मध्ये डॉ. लहामटे यांना निवडून देण्यात वैभव पिचड यांनी फार मोलाची कामगिरी बजावली आहे. पिचड घराण्याला राजकीय दृष्ट्या नेस्तनाबुत करण्याचा विडा उचललेल्या लहामटेंना शक्य तितकी साथ देण्याचे काम २०२४ च्या अमदारकीत वैभव पिचड यांनी दिली आहे. मात्र, डॉ. लहामटे त्यांच्या मतावर ठाम आहेत. मी पराभूत झालो तरी चालेल पण मला पिचडांची साथ नको. हे महाशय मात्र पक्षाच्या धोरणासाठी, वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी आपल्या कट्टर विरोधकाला बळ देण्यात कोठेच कमी पडत नाही. ही गोष्ट बाकी पिचड यांची कौतुकास्पद आहे.
स्व.पिचड साहेबांनी केलेली ती अवहेलना योग्यच.!
दि. २८ एप्रिल २०२२ रोजी अगस्ती कॉलेजच्या गेटवर आंदोलनाला सामोरे जाताना चर्चेला बसण्याचे ठरले होते. तेव्हा आंदोलकांनी विश्वस्त, तसेच संचालकांची अवहेलना सुरु केली. आम्ही काय या दगडांशी चर्चा करायची का? जे घेतले ते संचालक अशिक्षित आहेत, त्यांचे योगदान काय? आम्ही चर्चा करायला तुमच्यापेक्षा अज्ञानी आहोत अशा प्रकारचे टोमणे मारणे सुरू केले. त्या दरम्यान गिरजाजी जाधव हे खाली आले आणि त्यांनी आरोपांचे खंडन केले नाही, पण त्यांच्यावर केलेल्या टिका टिप्पणीचा खेद व्यक्त करीत माईक घेऊन मनोगत व्यक्त केले. तेव्हा त्यांच्यावर काही व्यक्ती अगदी धावून गेली, त्यांच्या भोवती गराडा घालुन आंदोलक गोंधळ करु लागले आणि कळत नकळत त्यांना धाक्काधक्की देखील झाली. त्यावेळी त्यांना एकाने कवळी मारुन बाहेर ओढून आणले. तेव्हा जाधव म्हणत होते की माझ्याकडून चूक झाली असेल तर मी जाहिर माफी मागायला तयार आहे, गेली ४० ते ४५ वर्षे आम्ही चळवळीत घालविली त्याची किंम्मत काहीच नाही का? त्यांच्या भावनांची जरा देखील कदर झाली नाही. पिचड साहेब आजारी होते यात तिळमात्र शंका नाही, त्यामुळे ते चर्चेला येऊ शकले नाही. जर या आंदोलकांनी पहिल्या पत्रकार परिषदेपासून तर आंदोलनात निवेदन घेईपर्यंत कॉलेज आणि विश्वस्त तसेच संचालकांची इज्जत चव्हाट्यावर मांडली होती. तर, हे चर्चेला गेल्यानंतर यांची काय पुजा करणार होते का? तेव्हा चर्चेला गेल्यानंतर यांची देखील अवहेलनाच झाली. जशास तसे उत्तर मिळाले त्यात गैर काय? मात्र, या आदोलनात झाले काय? तर आमदारांचे अपयश आणि संस्था पिचडांच्या ताब्यात देण्यात सगळ्यांना यश आले.
क्रमश: भाग १