हनुमान जयंतीत चाकू, फायटर आणि गलवरी, दोन गटात तुंबळ हाणामारी, पोलीस बंदोबस्त कुचकामी, 11 जणांवर गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :-

                   हनुमान जयंती निमित्त मानाच्या रथाला सलामी देत असताना भैरवनाथ ढोलताशा पथक आणुन ते मध्येच वाजवण्यास सुरवात केली. त्यामुळे, हनुमानजयंती उत्सव समिती व ढोलताशा पथक यांच्यामध्ये तुफान राडा झाला. ढोलताशा पथकातील मुलांनी हनुमान जयंतीतील सदस्यांना तुमच्या बापाचा उत्सव आहे काय? असे बोलून शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यास सुरवात केली. यामध्ये एकाने फायटरने तर एकाने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर एकाने गलवरीच्या सहाय्याने डोक्यात खडा मारला, या वादात अडीच तोळ्यांची सोन्याची चैन गहाळ झाली. काहींनी लथाबुक्यांनी, काठीने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि.11 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजता ते शनिवार दि.12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:30 वा. ते पुन्हा दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कमलाकर विश्वनाथ भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आरोपी विनायक पुंडलिक गारूडकर, सौरभ रमेश उमर्जी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, शाम मधुकर नालकर, सोनु गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयुर जाधव उर्फ पप्पु, राहुल शशिकांत नेहुलकर, एक अल्पवयीन(सर्व रा. संगमनेर शहर, ता. संगमनेर) असे अकरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहे.

             याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरात श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समिती हे दरवर्षी हनुमान जयंतीचे आयोजन करतात. सालाबादप्रमाणे ह्या वर्षी देखील श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 11 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान हनुमान जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सलामीचे वादन चालु असताना काही तरुणांनी भैरवनाथ ढोलताशा पथक आणुन ते वाजवण्यास सुरवात केली. त्यावेळी तेथे ऍड. गिरीश मेंन्द्रे यांनी भैरवनाथ ढोल पथकातील तरुणांना सांगितले की, तुम्ही ही सलामी होऊद्या. मंग तुमचे वादन करा. असे सांगितल्याने त्याचा राग येऊन तुमच्या बापाचा उत्सव आहे काय?असे म्हणुन शिवीगाळ करून धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्यानंतर हनुमान उत्सव समितीचे सदस्य सोडवण्यासाठी गेल्यावर आरोपी विनायक गरूडकर याने योगीराज परदेशी याची गचंडी धरून पोटात लाथ मारली. आरोपी सौरभ उमर्जी याने धक्काबुकी करून खिशातून चाकू काढुन चेतन तारे याना मारण्याचा प्रयत्न केला. तर आरोपी अमोल क्षीरसागर याने फिर्यादिस अरेरावीची भाषा करून उद्या सकाळी तुम्ही चौकातून रथ कसे काढता तेच बघतो अशी धमकी दिली. आरोपी सोनु नालकर याने हनुमान जयंती उत्सव समितीच्या सदस्यांना जिवंत सोडू नका याना मारून टाका असा दम दिला. आरोपी शेखर सोसे याने हातातील फायटर किशोर उर्फ शुभम चंद्रकांत लाहमगे याच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला परंतु ते हुकवल्याने खांद्याला लागले.

           दरम्यान, दुसऱ्या दिवशी याचा वादाची किनार लागली. दि.12 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास श्री. हनुमान जयंती रथ मिरवणूक चालू असताना आरोपी विनायक गरूडकर,शुभम परदेशी,ओंकार ननवरे,मयुर जाधव यांनी वाद्य आडवे लावून मिरवणुकीचा रथ थांबुन लोकांच्या भावना दुखावून लोकांमध्ये असंतोषनिर्माण होऊनसामाजिक परिस्थिती चिघळेल. या गैरउद्देशानेश्री. हनुमान जयंती रथ अडवून आरोपी राहुल नेहुलकर यानेआमच्या पथकाला वाद्य वाजवू दिल्याशिवाय रथ पुढे जाऊ देणार नाही. असे म्हणुन समितीचे सदस्य त्यास समजवण्यासाठी गेले असता विनायक गरूडकर यांनी वाईट शिवीगाळ केली. आरोपी मयुर जाधव याने हातातील ढोल वाजवण्याच्या काठीने ज्ञानेश्वर थोरातयांची गचंडी धरून तोंडावर व डोक्यावर काठीने फटके मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चैन धरून ओढली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दि. 12 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता चंद्रशेखर चौक येथे मिरवणूक संपवून रथ परत आल्यानंतर चेतन विलास तारे यास एका अल्पवयीन मुलाने गलोरीने डोक्यात दगड मारून दुखापत केली.व समितीच्या वेगवेगळ्या विश्वस्तांना मारहाण करून धार्मिक उत्सवात विघ्न निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवन्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार हनुमान जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष कमलाकर विश्वनाथ भालेकर यांनी दिली आहे. यावरून विनायक पुंडलिक गारूडकर, सौरभ रमेश उमर्जी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, शाम मधुकर नालकर, सोनु गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयुर जाधव उर्फ पप्पु, राहुल शशिकांत नेहुलकर, एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. संगमनेर शहर, ता. संगमनेर) असे अकरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहे. 

खरंतर, संगमनेर शहरात सार्वजनिक उत्सव, महापुरुषांची जयंती, तालुक्यातील विविध मोहत्सव यामध्ये प्रचंड वाद-विवाद निर्माण होत आहे. हे सर्व वाद पोलिसांसमोरच चालू असतात आणि पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने वाद टोकाला जात असल्याचे समोर येत आहे. इतकेच काय! शांतता कमिटीच्या बैठकीत देखील वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, संगमनेर शहरात वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. जसे पोलीस निरीक्षक देशमुख आले तसे कायदा सुव्यवस्थेचे धिंदडे निघाले. चोरी, घरफोडी, चैन स्नॅचिंग,गोहत्या, गांजा, मोटार सायकल चोरी ह्या घटना दिवसेंदिवस वाढल्या. मात्र, त्यापेक्षा ही अधिक सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. कारण, हिंदू मुस्लिम वादापेक्षाही राजकीय किनार असलेले वाद पोलिसांसमोरच घडत आहेत. आणि पोलीस हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन पाहत आहे. आशा वेळी स्वतः पोलिसांनी फिर्यादी होऊन किंवा दोन्ही गटांना समज देने अपेक्षित आहे. मात्र, तसे घडताना दिसत नाही. त्यामुळे, संगमनेर शहर पोलिसांवर सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.