संगमनेर तालुक्यात बोगस मुन्नाभाई एमबीबीएसला ठोकल्या बेड्या, कारखान्याच्या शेतकी कार्यालयात सुरु होता बनावट दवाखाना.!
सार्वभौम(संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथे बोगस डॉक्टरने संगमनेर सहकारी करखान्याच्या शेतकी विभाग गट ऑफिसमध्येच दवाखाना चालवलवुन पेशंट तपासत आल्याची धक्कादायक घटना रविवार दि.16 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. ही बाब प्रशासनाच्या कानावर गेली. त्यानंतर चौकशी केली असता या बोगस डॉक्टरकडे 4 नाव नसलेल्या व्हायल, 28 सिरींज प्रत्येकी 3 एम. एल,18 नाव नसलेल्या रिकाम्या व्हायल, डॉक्टर नाव असलेले व्हिजिटिंग कार्ड असे आढळुन आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. तयब बाबुभाई तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी इम्रान अब्दुल खान (रा. मुसेपुर, तहसील. रोसियाका,राजस्थान), भरत मधुकर वर्पे (रा. कनोली, ता. संगमनेर) यांच्यावर आश्वी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे. खरंतर, शेतकी विभाग गट ऑफिसमध्ये उसाच्या नोंदी, ऊस तोडणीच्या नोंदी, शेतकऱ्यांना उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना येथे बोगस डॉक्टरचा दवाखाना चालवत आहे. याकडे कारखान्यातील वरिष्ठांचे लक्ष नाही का? कर्मचाऱ्यांचे असे उद्योग सुरु असेल तर हे दुर्दैव आहे. कारखान्यातील चेअरमनने वेळीच लक्ष घालून गट ऑफिसमध्ये शेतकऱ्यांच्या विकासाचे केंद्र चालू आहे की अन्य उद्योग हे तपासणे आता गरजेचे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैद्यकीय अधिकारी डॉ. तयब तांबोळी यांना एका व्यक्तीने फोन केला की, आश्वी बु गावात एक इसम लोकांना आयुर्वेदिक औषधे सांगून इंजेक्शन देत आहे. तो संशयित वाटत असल्याने तरुण मुले त्याला घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जात आहेत. त्यावेळी तेथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शहनाज शेख यांनी चौकशी केली असता या बोगस डॉक्टरकडे 4 नाव नसलेल्या व्हायल, 28 सिरींज प्रत्येकी 3 एम. एल,18 नाव नसलेल्या रिकाम्या व्हायल, डॉक्टर नाव असलेले साई आयुर्वेद असे व्हिजिटिंग कार्ड आढळुन आले. आरोपी भरत वर्पे हा कारखान्याचा गट ऑफीस सांभाळणारा कर्मचारी त्याच्या सहाय्याने बोगस डॉक्टर हा आश्वीमध्ये आला.
दरम्यान, गट ऑफिसचा कर्मचारी भरत वर्पे हा त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना आयुर्वेद इंजेक्शन घेण्यासाठी बोलवत होता. बोगस डॉक्टरांना बोलवुन तो तेथील रुग्णांना कारखाण्याच्या गट ऑफिस मध्ये तपासत होता. मी तुम्हाला पेशंट देतो, तु संगमनेर शेतकी विभाग गट ऑफिस आश्वी बु येथे ये असे भरत वर्पे सांगुन बोगस डॉक्टरला घेऊन गट ऑफिसची मागची रूम रुग्णांसाठी देऊन तेथे ह्या बोगस डॉक्टरचा कारभार चालू होता. हे तेथील काही व्यक्तीने पाहिले. त्यानंतर या बोगस डॉक्टरचे सर्व बिंग फुटले. वैद्यकीय अधिकारी तयब तांबोळी यांनी तेथे येताच त्यांनी विचारले तु डॉक्टर आहे का?त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. डॉक्टराकीचे सर्टिफिकेट आहे का?त्यावर त्याने माझ्याकडे कुठल्याही प्रकारची डिग्री अथवा सर्टिफिकेट नाही असे उत्तर दिले. त्यानंतर गट ऑफिसमध्ये झडती घेतली असता तेथे 18 नाव नसलेल्या रिकाम्या व्हायल सापडल्या. तेथे पंचनामा करून सर्व साहित्य पोलीस ठाण्यात आणुन गुन्हा दाखल केला.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात बोगस डॉक्टर वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी न घेता. तसेच कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी न करता. बोगस डॉक्टरकीचे नाव लाऊन बेकायदेशीर पध्दतीने जनतेचे उपचार केल्याचे अनेक वेळेस संगमनेरात उघडकीस आले आहे. मात्र, यावेळी कळस गाठला आहे. कुठलीही डिग्री नसताना कारखान्याच्या शेतकरी गट ऑफिसमध्येच रुग्णांचा उपचार केल्याचा मोठा प्रताप घडला आहे. खरंतर, संगमनेरात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसुन वैद्यकीय शिक्षण नसताना ही बोगस डॉक्टर नाव लावुन तालुक्यात दवाखाने उघडत रुग्णांना उपचार करत आहेत. त्यामुळे, या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असुन चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वेळीच आशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, तक्रार आल्यानंतरच आरोग्य विभागाकडून कारवाईची पाऊले उचलली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.