उन्माद कार्यकर्त्यांमुळे ना.विखे व आ. खताळ बदनाम.! दहशतमुक्त संगमनेर शब्दाचा विरोधाभास.! पोलीस चिनभिन.!
- ऍड. सागर शिंदे
सार्वभौम (संगमनेर) :-
निलेश राणे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून छात्रभारतीचे कार्यकर्ते ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे संगमनेरमध्ये निवेदन घेऊन गेले. अर्थात गैर काहीच नव्हते, पण काही उन्माद आणि कुख्यात वाळुतस्करांनी कार्यकर्त्यांवर हात उचलला. खरंतर यात दोषी कोण? तर ना. विखे पाटील यांचा यात तिळमात्र दोष नाही. कारण, त्यांच्यावर एका व्यक्तीने अचानक भंडारा उधळला होता, तरी त्यांनी गुन्हा नोंदवू नका, मारहाण करुन नका असे म्हणत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मग राहिला प्रश्न आ. अमोल खताळ यांचा, तर ते स्वत: सांगतात की मारु नका. अर्थात खताळ हे चळवळीतून पुढे आलेले आहे. विशेषत: अनिकेत घुले आणि आ. खताळ मित्र देखील आहे. मग प्रश्न निर्माण झाला कोठे? तर, ज्यांना वाळुचे धंदा करायचे आहे, बार चालवायचे आहे, नेत्यांचे पुढे पुढे करुन काळे धंदे करायचे आहे, ज्यांची पदे काढून घेतल्याने त्यांच्या मनात खदखद आहे अशा काही उन्माद व्यक्तींच्या चमचेगिरीतून हा प्रकार घडला आहे. मात्र, तीन दिवस उलटून देखील गुन्हा दाखल होत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. मुळात पोलीस प्रशासन पहिल्या दिवसापासून चुका करीत आल्यामुळे देखील हा वाद टोकाला गेल्याचा आरोप होताना दिसत आहे.
खरंतर आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, त्याच मार्गाने अनिकेत घुले आणि त्यांचे कार्यकर्ते ना. विखे पा. यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. अर्थात ना. विखे पा. यांची देखील त्यांना काहीच हरकत नव्हती. पण, एक-दोन कार्यकर्ते अचानक बादशाह झाले, आम्ही मर्द आहोत, तुमचे पुढे-पुढे करण्यासाठी आम्ही काहीही करु शकतो हे दाखविण्यासाठी त्यांनी मागून पुढे येत छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना गचांडून मारहाण करण्यास सुरुवात केली, गर्दीचा फायदा घेत मोबाईल काढून घेतले. आता हा मारहाण करणारे समशेर बहाद्दर कोण? तर तो मा. खा. सदाशिव लोखंडे यांचा वर्हाडी, नाचतोय कोणाच्या वरातीत तर विखे आणि खताळ यांच्या. त्यामुळे, हा अचानक इतका कसा दिवाना झाला? तर केवळ आपले काळे धंदे जोमात चालले पाहिजे. ज्याच्याकडे सत्ता, त्याचा भत्ता. अर्थात ही राज्यात आणि देशात चालु असलेली निती आहे. पण, चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांवर हात उचलताना यांनी हजारदा विचार करायला पाहिजे होता. कारण, वाळु चोरणे किंवा बार चालविण्याइतकी सोपी चळवळ चालविणे नव्हे. ती संवैधानिक चळवळ छात्रभारतीचे विद्यार्थी चालवितात.
खरंतर याच अनिकेत घुले यांनी यापुर्वी मा. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधिर तांबे यांच्या थेट घरांवर आंदोलने केली आहेत. त्यांच्याकडे देखील कदाचित अवैध धंदे करणारे कार्यकर्ते असतील. पण, त्यांनी अशा पद्धतीने कधी आंदोलकांवर हल्ले केले नाहीत. पण, काल जो प्रकार घडला तो संगमनेरच्या संस्कृतीला काळीमा फासणारा होता. निवडणुकीपुर्वी आ. खताळ यांच्या कार्यकर्त्यांचे एका बुक्कीत दात पाडले होते, त्यानंतर दहशतमुक्त संगमनेर असे म्हणत आ. अमोल खताळ निवडणुकीला सामोरे गेले होेते. मात्र, आमदार आणि नामदार यांच्या डोळ्यादेखत कार्यकर्त्यांनी तरुणांना मारहाण केली हा दहशतमुक्त संगमनेर या शब्दाचा विरोधाभास दिसुन आला. अर्थात यात आमदार आणि नामदार यांचा तिळमात्र संबंध नसला. तरी, ज्या पद्धतीचे कार्यकर्ते आपल्या सभोवताली आहेत, त्यांचे हेतू लक्षात घेऊन त्यांना घरीच बसविले पाहिजे. कारण, दिर्घकाळ राजकारण करायचे असेल तर सामान्य जनतेला असली गुंडागर्दी पटलेली नाही, त्याचे भविष्यात विपरित परिणाम होतात. त्यामुळे, असल्या चेल्याचपाट्या कार्यकर्त्यांपासून आपण दुर राहिले पाहिजे किंवा त्यांना दुर ठेवले पाहिजे असे सामान्य जनतेला वाटते आहे.
गोपनिय विभाग काय करतोय?
खरंतर संगमनेरमध्ये मंत्री येणार होते याची कल्पना गोपनिय विभागाला होती का? अन होती तर ते काय निव्वळ मलिदे खात होते का? असा प्रश्न पडतो. ना. विखे पा. येणार आणि छात्रभारती आंदोलन करणार, तेथे वादात्मक परिस्थिती निर्माण होणार हे अनेकांना माहित होते. मात्र, गोपनिय विभागाला हा बाब का कळली नाही? मुळात गेस्ट हाऊसला देखील घोषणाबाजी झाली होती तेव्हाच पोलिसांनी प्रिव्हेन्टीव्ह ऍक्शन का घेतली नाही? आमदार आणि नामदार बदनाम करण्यात यांना मोलाचा वाटा उचलायचा होता का? विशेषत: गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे, वारंवार विकृती निर्माण करणारे यांच्यावर पोलीस प्रिव्हेन्टीव्ह ऍक्शन का करत नाही? हे बार चालवितात म्हणून की वाळुतस्कर आहे म्हणून? मलिद्यापोटी त्यांना गदारोळ चालतो पण कारवाईला हात धजत नाही हे दुर्दैव आहे. वर्दीच्या डोळ्यासमोर तस्करांकडून हल्ले होतात आणि कारवाई होत नाही. मग पोलीस करतात काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
मुद्देमाल मिळुन देखील गुन्हा दाखल नाही.!
खरंतर पोलीस निरीक्षक देशमुख स्वत: सांगत होते. की, ज्यांनी कार्यकर्त्यांचे मोबाईल गर्दीत काढून घेतले. ते ज्यांनी काढून घेतले ते माझ्याकडे आणून दिले आहेत. अर्थात एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याच्या ताब्यातून मोबाईल काढून घेणे, त्याला मारहाण करणे हा गुन्हाच आहे. त्यामुळे, कलम ३९२ नुसार अशा उन्माद कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण, दुर्दैवाने गुन्ह्यातील रिकव्हरी झाली पण गुन्हाच दाखल नाही. त्यामुळे, आमदार आणि नामदार यांना खुश करण्यासाठी ज्या चेल्याचपाट्यांनी लेकरांवर हात उचलला अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी. खरंतर चळवळीत काम करणे म्हणजे वाळु काढणे, सोशल मीडियावर पुढारी होते किंवा दारु विकण्याइतके सोपे नाही. त्यामुळे, पोलिसांनी यात कठोर भुमिका घेतली पाहिजे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये. ही थापड आमदार-नामदार यांनी मारली असतील तरी हरकत नव्हती. पण, राजकीय अपेक्षा ठेवून, स्वत:चे काळे धंदे जोमात चालविण्यासाठी जो अट्टाहास आज केला. तो भविष्यात देखील अशा विकृत मानसांकडून होऊ शकतो. त्यामुळे, कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.