देऊळ फोडणारे अकोले-संगमनेरचे चोरटे जेरबंद.! 26 लाख 12 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, सोनाराला वर्दीकडून सु-धीर, अर्थपुर्ण तडजोडीतून प्रकरण केले बधीर.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

               संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील मंदिरात जाऊन देवीचा मुकुट,नथ, मनीमंगळसुत्र, नेकलेस, कंबरपट्टा,गळ्यातील मंचली, चांदीची चैन,डिव्हीआर असे  24 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल  चोरट्यांनी चोरला होता. त्यामुळे, काकडवाडीचे गावकरी हे आक्रमक झाले होते. त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन तपासाला वेग दिला. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळताच  हिवरगाव पावसा येथील आरोपी सुयोग अशोक दवंगे याच्या टोळीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याला पकडण्यासाठी सापळा रचला असता सर्व घटनेचा उलगडा झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि घडलेला घटनाक्रम समोर आला. 

        या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुयोग अशोक दवंगे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर),संदीप किसन साबळे (रा.पाचपट्टवाडी, ता. अकोले), संदीप निवृत्ती गोडे (रा. सोमठाणे, ता. अकोले), अनिकेत अनिल कदम (रा. टिटवाळा, ता. कल्याण), दिपक विलास पाटेकर (रा. टिटवाळा,ता. कल्याण) आशा सहा जणांना अटक केली असुन त्यांच्याकडून 26 लाख 12 हजार 900 रुपयांचे मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना आज न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खरंतर, या कारवाईमुळे खाकीचे एकीकडे कौतुक होत असले तरी चोरीचे वारंवार सोने घेणारा सोनाराला खाकीने अभय दिला आहे का? कारण, नाशिक येथुन घरी येताच या सोनाराला खाकितील कर्मचाऱ्यांनी स्कॉर्पिओ गाडीत उचलले. गाडीत फिरवले घटनेचा सर्व उलगडा झाला खरा. मात्र, या टोळीला वारंवार चोरीचे सोने पचवणाऱ्या या सोनाराला आरोपी का केले नाही? की खाकितील कर्मचारी मोठ्या मलिद्याने बरबटलेले आहे. असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ नागरिकांना पडला आहे.

             याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या पाच दिवसांपूर्वी काकडवाडी येथील देवीच्या मंदिरावर चोरी झाली होती. दि. 8 मार्च 2025 रोजी रात्री 10 वाजता मंदिराचे दरवाजे बंद करून कुलूप लावले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता काकड आरती करण्यासाठी आलेल्या नितीन झुरुळे याला मंदिराचे कुलुप दिसुन आले नाही. तो आत मध्ये गाभाऱ्यात गेला असता हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीचे सोन्याचे दागिने, चांदीचा मुकुट असा लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली होती. घटना घडल्याची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तात्काळ सावळेराम कोंडाजी झुरळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुरनं 116/2025 बिएनएस 331 (4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

             

घडलेला प्रकार हा गंभीर स्वरुपाचा व भाविकांच्या भावना तीव्र करणारा असल्याने सदर बाबत  पोलीस अधिक्षक  राकेश ओला यांनी सखोल तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर तात्काळ विशेष तपास पथक तयार करुन अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला. मंदिरा पासुन काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तसेच गोपनिय बातमीच्या आधारे हिवरगाव गावातील सुयोग दवंगे त्याचे साथीदारांसह मिळुन सदरची चोरी केल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने त्यावर करडी नजर ठेवली. सुयोग दवंगे व साथीदारांनी चोरी करून हा मुद्देमाल विकण्यासाठी एका तरुणाच्या मध्यस्थीने काळ्यारंगाची पोलो कार एम. एच.04 एच.एफ.1661 संगमनेर येथुन लोणी मार्गे अहिल्यानगर येथे जात असताना सापळा रचून त्यांना लोणीत पकडण्यात आले. यामध्ये सुयोग अशोक दवंगे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर),संदीप किसन साबळे (रा.पाचपट्टवाडी, ता. अकोले), संदीप निवृत्ती गोडे (रा. सोमठाणे, ता. अकोले), अनिकेत अनिल कदम (रा. टिटवाळा, ता. कल्याण), दिपक विलास पाटेकर (रा. टिटवाळा,ता. कल्याण) या सर्वांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 119 ग्रॅम सोने तर 1 हजार 665 ग्रॅम चांदी असे एकुण 26 लाख 12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यानंतर वरील आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

          दरम्यान, संगमनेर शहरात चोरीचे सोने घेणारे सोनार हे खाकीकडुन आरोपी होताना कधी दिसत नाही. सुशिक्षित राहून "सुधर"ल्याचे आव आणतात खरे मात्र, चोरांना "मै"हुना अशीच वागणूक देताना दिसत आहे. या सोनराला घरापासून काही कर्मचाऱ्यांनी स्कॉर्पिओ गाडीत उचलले होते. पण, पुढे काय झाले हे न बोलेल बरे.! कारण, मोठा मलिदा घेऊन या सोनाराला नामानिराळे सोडण्यात आल्याची चर्चा संगमनेरात जोरदार सुरु आहे. आता या सोनाराकडे लाखो रुपयांचे चोरीचे सोने व बनावट नोटा असल्याची देखील चर्चा शहरात रंगत आहे. काही दिवसांपूर्वी गुंजाळवाडी भागात एक तरुण बनावट नोटा करत असल्याचे मशीन पकडण्यात आले. बनावट नोटा करणारा हा तरुण व सोनार यांच्यातील धागेदोरे बाहेर येणे आवश्यक असताना खाकिडूनचं या सोनराला अभय मिळत असल्याचे बोले जात आहे. आता या टोळीचा खरा मोरक्या सर्वाना मोठा मलिदा देणारा हा सोनार असल्याची चर्चा संपूर्ण गावभर होत आहे. त्यामुळे, इतकी मोठी कारवाई होऊन सुद्धा त्याला अर्थपूर्ण तडजोडीचे गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.