लहामटे साहेब.! खबरदार माझ्या बापावर बोलात तर..! तुम्हाला आमदार केलं याची जाण ठेवा.! सोनाली भांगरेंना अश्रु अनावर.!
सार्वभौम (अकोले)-
गरज सरो आणि वैद्य मरो.! अशा प्रकारची विकृत मानसिकता लहामटे यांनी माझ्या भांगरे कुटुंबाच्या बाबतीत ठेवली आहे. ज्या स्व. अशोकराव भांगरे साहेबांमुळे ते २०१९ मध्ये आमदार झाले. त्याची जाण सुद्धा या मानसाला राहिली नाही. नको ठेऊ रे बाबा जण.! पण किमान त्यांच्या विषयी वाईट तर बोलु नको. ते हयात असते तर वाट्टेल ती टिका करा, पण किमान आमचा बाप गेलाय पण माणूस म्हणून तुमच्यातील माणूस जिवंत ठेवा. तिकडे अजित दादा आर.आर. पाटलांच्या मुलांवर नको तसे घाणेरडे बोलत आहेत आणि इकडे त्यांचे उमेदवार आमच्या वडिलांवर, माझ्या भावावर, माझ्या आईवर, आमच्या व्यवसायावर बोलत आहे. किती निच पातळीचे राजकारण आहे हे. माझ्या वडिलांनी १९८० ते २०१९ पर्यंत राजकारण केले. पण, इतकी निच पातळी कधी सोडली नाही. त्यामुळे, साहेब तुमच्या पाया पडते. पण, आमच्या वैयक्तीक आयुष्याचे खोटे पंचनामे करू नका. आम्ही देखील ते करु शकतो. मात्र, एखाद्या पदासाठी आणि सत्तेसाठी इतक्या निच पातळीवर जाण्याची आमची संस्कृती नाही. अशा प्रकारचे मत सोनाली अशोकराव भांगरे यांनी व्यक्त केले.
खरंतर अकोले तालुक्याच्या राजकारणाला असंस्कृतपणाचा गंध कधीच नव्हता. मात्र, ज्यांना आपण शहाणे सुरते म्हणत होतो. तेच आता असभ्यतेच्या भाषा बोलु लागले आहेत. म्हणजे, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वान नाही पण गुण लागला. अशीच स्थिती विनय सावंत साहेब यांची झाली आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी स्व. अशोकराव भांगरे यांचा प्रचार केला आहे. उभी हयात त्यांना पप्पा वाईट वाटले नाही, त्यांचे व्यवसाय दिसले नाही, अमित आणि माझी आई वाईट दिसली नाही. अन आता अचानक आम्ही इतके वाईट झालो. की, आमदार झालेला व्यक्ती भेटला, त्यांच्याशी उठबस सुरु झाली आणि आम्ही अचानक नालायक दिसु लागलो. कालपर्यंत वैचारिक आणि संवैधानिक भाषा बोलणारे हेच सावंत साहेब आज भाजपाच्या आमदारासाठी घसा फाडताना दिसतात हे तालुक्याच्या जनतेला रुचत नाही.
मला चांगले आठवते. २००४ साली मी इयत्ता ६ वीत असताना माझे पप्पा निवडणुक लढवत होते. मी दिवसरात्र त्यांचा प्रचार करत असे. त्यानंतर २०१४ पर्यंत मी माईक हाती घेऊन गाड्यांमध्ये प्रचार केला आहे. मोठमोठ्या सभांमध्ये माझे तोडके मोडके शब्द जनतेसमोर मांडले आहे. यावेळी अनेक मोठ्या मानसांच्या सभा मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आणि कानाने ऐकल्या आहेत. पण, २०२४ मध्ये जो प्रचार मी पाहते आहे. तो मला बिल्कुल सहन होत नाही. इतकी निच पातळी, वैयक्तीक टार्गेट करणे, कौटुंबिक हल्ले हे मला असहाय्य झाले असते. माझा बाप असता तर यांची मजाल होती का? आमच्यावर बोलण्याची. पण, माझ्या वडिलांना तालुक्यातील जनता लोकनेते म्हणत होते. ही जनतेने दिलेली उपाधी आहे. त्यामुळे, आता ही जनताच येत्या २० तारखेेला ठरवेल इतका उन्माद करणार्यांचे काय करायचे.! बोलताना देखील इतके अंत:करण जड होते. की, बाप नसल्याने काय होते, लोक कशी गिधाडाप्रमाणे लोचके तोडतात याची कल्पना कधी केली नव्हती ती आज होऊ लागली आहे. पण, येणारा काळ याचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.
मला इतके वाटते. की, एखाद्या जनावराला देखील जीव लावला, त्याला नकळत मदत केली. तरी तो जाणिव ठेवतो, उपकार विसरत नाही. पण, डॉ. किरण लहामटे हे त्याहून निर्दयी निघाले. २०१९ मध्ये जर माझे पप्पा स्व. अशोकराव भांगरे यांनी एकास ऐक केली नसती. तर, हे जो मिजास गाजवत आहे. तो गाजविला असता का? पण, पप्पांनी यांना डोक्यावर घेतलं आणि आता हे कानात घाण करु लागले आहेत. इतकी तळतळ होते. की, त्याला शब्दच नाही. या मानसाने निवडणुक करावी, मते मागावी, विकासावर बोलावे पण उठ सुट माझ्या हयात नसलेल्या बापावर आणि आमच्या वैयक्तीक आयुष्यावर बोलत आहे. किती ही निच पातळी, त्याला काही मर्यादा असतात की नाही? असे म्हणतात की माणूस गेल्यानंतर त्याच्याशी वैर रहात नाही. पण, लहामटेंच्या मनात किती वैर भरलेले आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. सापाला दुध पाजावे आणि त्याने दुध पाजणार्यालाच डंख मारावा अशी गत यांच्याबाबत झाली आहे. पण, अनिती फार काळ चालत नाही. देव बघतो आहे, येत्या १० दिवसानंतर यांचा पुर्ण बाजार उठलेला असेल. असे म्हणतात की, भगवान के पास देर है.! लेकीन अंधेर नाही.! १९८० ते २०२४ इतका मोठा काळ आम्ही संयम ठेवला आहे, संघर्ष कायम ठेवला आहे. आता शंभर टक्के ही मायबाप जनता आम्हाला न्याय देणार आहे.
लहामटे साहेब कायम आमच्या व्यवसायावर बोलतात. तो आमचा पिढीजात व्यवसाय आहे. स्व. यशवंतराव भांगरे या अकोले तालुक्याचे १९६२, १९७२ आणि १९७७ अशा तीन वेळा आमदार राहिले आहे. त्याआधी आणि त्यानंतर देखील आमचे हॉटेल होते. या हॉटेलांमध्ये तुमची उभी हयात जाईल इतका रोजगार तुम्ही देऊ शकत नाही. इतक्या कुटुंबाचे पोट तेथे भरते आहे. तुमच्या ५० एकरच्या एमआयडीसीच्या गाजरापेक्षा आम्ही प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. स्वत:ला समाजासाठी काही करता आले नाही आणि दुसरे करतात तर त्यांना नावे ठेवणे, त्यांच्या चौकशा लावणे, त्यांना टार्गेट करणे यापेक्षा दुसरे काही जमत नाही. ज्याने चहाची टपरी टाकली नाही, फक्त शासनाचा निधी आणून त्यातून ठेकेदारांकडून मलिदा वसुल केला. त्याला रोजगार आणि व्यवसाय काय कळणार आहे? त्यांना आत्या पैशांची चटक लागली आहे, त्यामुळे लोकांवर कौटुंबिक हल्ले करायचे, बदनाम करायचे आणि मयत झालेल्या माणसांवर देखील टिका करुन सत्ता मिळवायची अशी धारणा असणारी माणसे म्हणजे, मढ्यावरच्या टाळुवरील लोणी चाटणारी माणसेच म्हणावी लागतील.