गायकर पा.आणि मधुभाऊ किंग मेकरच्या भुमिकेत.! बहुजन नेतृत्व आमदार ठरविणार. ही निवडणुक २०१९ प्रमाणे नाही तर काट्याची टक्कर असणार.!

  

सार्वभौम (अकोले) :- 

अकोले तालुका हा राखीव मतदार संघ आहे. राजुरपासून वर आदिवासी भागात ज्या त्या नेत्याचे त्याच्या त्याच्या परीने चांगला संपर्क आहे. मात्र, मुळा, प्रवरा, आणि आढळा पट्ट्यात यंदाचे किंग मेकर सिताराम पा. गायकर साहेब आणि मधुभाऊ नवले असणार आहे. अर्थात जेव्हा निवडणुका २०१९ प्रमाणे परिवर्तनवादी आणि भावनिक असतात. तेव्हा मतदार या नेत्यांचे देखील काही एकत नाही. मात्र, तुलनात्मक उमेदवार असतात तेव्हा मात्र बहुजन चेहरे म्हणून यांची भुमिका फार महत्वाची असते. त्यामुळे, डॉ. किरण लहामटे यांच्या निवडणुकीचीच नव्हे.! तर विजयाची धुरा देखील गायकर साहेबांवर असणार आहे. तर, अमित भांगरे यांच्या निवडणुकीत मधुभाऊ नवले यांची भुमिका एका दिपस्तभ आणि आधारवडासारखी असणार आहे. मात्र, हे नेते त्यांना किती विश्‍वासात घेतात आणि त्यांच्याकडून किती व कसे काम करुन घेतात हे फार महत्वाचे ठरणार आहे. यात कॉंग्रेस म्हणून बाळासाहेब थोरात हे पाठार भागावर किती लक्ष घालतात आणि मविआला हातभार लावतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल.

खरंतर डॉ. किरण लहामटे हे निवडून आले तेव्हा गायकर साहेब आणि त्यांची निष्ठावंत टिम पिचड साहेबांसोबत होती. मात्र, साहेब राष्ट्रवादीत आले आणि सगळ्यांनी पुन्हा इकडे उड्या मारल्या. पण, थोड्याच दिवसात आपण आगितून फुफाट्यात उड्या मारल्याची जाणिव सगळ्यांना झाली. कारण, डॉ. किरण लहामटे यांनी सगळ्यांना कोलुन दिले होते. अर्थात ज्यांनी २०१९ साली जीवाचं रान केलं त्यांना मुकी ... हाक ना बोंब अशी आवस्था केली. तर हे आयात कार्यकर्ते त्यांच्यासाठी तुच्छच होते. त्यामुळे, २०१९ ते २०२४ पर्यंत गायकर साहेबांच्या टिम मधील एक सुद्धा माणूस आमदारांच्या जवळ गेला नाही आणि त्यांनी स्वत: त्यांना जवळ केले नाही. त्यास अपवाद शरद चौधरी हे आहेत. कारण, ते देखील वादात्मक भुमिकेतून या गटातून बाहेर पडले आणि आमदारांना जाऊन मिळाले. त्यांना तालुकाध्यक्ष केले खरे. मात्र, त्यांना काय अधिकार आहे हे त्यांनाच माहित आहे.

अर्थात डॉ. किरण लहामटे यांनी प्रचंड कामे केली. हे कोणीच नाकारु शकत नाही. मात्र, ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्ता त्यांना संभाळता आला नाही. एक गेला की दुसरा कार्यकर्ता तयार होतो हा भाग वेगळा असला. तरी काल भाजपाचे झेंडे घेऊन पळणारे आज आमदारांच्या गळ्यातील ताईत आहेत आणि ज्यांनी आमदारांचे झेंडे खांद्यावर घेतले त्यांच्या गळ्याला निष्ठेच्या शिक्षेचा फास लागला आहे. त्यामुळे, नव्या कार्यकर्त्यांच्या आणि ठेकेदारांच्या जोरावर निवडणुक होत नसते हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतीषाची गरज नाही. मात्र, जसे २०१९ साली पिचड साहेबांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंधारात ठेवले होते. तसेच डॉ. लहामटे यांना अंधारात ठेवून हवेत सोडले आहे. ही निवडणुक फक्त विकासावर किंवा ठेकेदारांच्या नियोजनावर होणार नाही. तर, बुथवर सक्षम कार्यकर्ता असावा लागणार आहे. पक्ष आणि व्यक्तीनिष्ठा असणारा कार्यकर्ता असावा लागणार आहे. पैसे व मान सन्मान म्हणून कार्यकर्ता नको. तर निष्ठा आणि नैतिकता असणारा कार्यकर्ता कोठे दिसून येत नाही. थोडेसे कटू वाटेल पण सत्य आहे. की, आमदारांच्या सोबत राहून, त्यांची कामे घेऊन ठेकेदार अपप्रचार करीत आहे. धुसखोर कार्यकर्ता ऐनवेळी बंड करणार आहे. त्यामुळे, ऐनवेळी फार बिकट परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे पहायला मिळणार आहे.

यात सर्वात महत्वाचे म्हणजे, अजित दादा यांनी अकोल्यातील गुलाबी सभेत सिताराम पा. गायकर यांना चार वेळा आवाज देऊन या निवडणुकीची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली आहे. अर्थात गायकर यांचे स्वत:चे संघटन, नियोजन आणि शब्द पाळणारे मतदार आहेत. तालुक्यात अशी काही गावे आहेत. जेथे गायकर सोबत असेल तर निष्ठेचे बुथ लागणार आहे. त्यामुळे, जसे २०१९ साली डॉ. लहामटे यांच्या रथाचे सारथ्य स्व. अशोकराव भांगरे यांनी केले होते. तसे आता सिताराम पा. गायकर यांना करावे लागणार आहे. मात्र, त्यांचा देखील आमदार यंत्रणाने अनेकदा अपमान केला आहे. मात्र, तरी देखील कारखाना टिकविण्यासाठी दादा आणि आमदारांनी जी मदत केली आहे. त्याचे ऋण म्हणून गायकर साहेब डॉ. किरण लहामटे यांच्या विजयासाठी सर्वात महत्वाची भुमिका पार पाडतील असे तालुक्यातील सुज्ञ जनतेला वाटते आहे.

तर, महाविकास आघाडीत मधुभाऊ नवले हे असे एकमेव बहुजन नेतृत्व आहे. की, ज्यांच्याकडे फार मोठे संघटन आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणण्याची धमक आहे. एक बहुजन चेहरा, बाळासाहेब थोरात यांना मंत्री करण्यासाठी प्रयत्न, स्वत:ची व्होटबँक आणि पाठीशी असणारा दांडगा अनुभव हा महाविकास अघाडीच्या उमेदवारास पुरक असणार आहे. खरंतर अकोले विधानसभा ही जागा कॉंग्रेसला सुटावी असा अग्रह होता. अर्थात अकोले शहर आणि बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यात असणारा पठार भाग फक्त इतका जरी भाग विचारात घेतला. तरी, महाविकास अघाडीच्या उमेदवाराची भिती गायब होईल. त्यामुळे, महाविकास अघाडीचा उमेदवार अमित भांगरे जरी असले तरी ते नवले यांना कसे हताळतात. हे फार महत्वाचे आहे. कारण, ही निवडणुक आता निष्ठा वर्सेस गद्दारी, काका पुतण्यांचे राजकीय वैर, पक्ष फुटून देखील शरद पवार, उद्धव ठाकरे हे किती जिद्दीने निवडणुकीला सामोरे जात आहे. तर, दुसरीकडे पक्ष फोडाफोडी, ईडी, सीबीआय, चौकशी, जेलच्या धमक्या, गद्दारी, घोटाळे, बेरोजगारी आणि अशा अनेक मुद्द्यांवर होणार आहे. त्यामुळे, बारामतीचा प्रचंड विकास करुन देखील अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना भराभव पत्कारावा लागला, नगर शहरासह दक्षिनेचा विकास करून देखील डॉ. सुजय विखे यांच्या पदरात भराव पडला आणि २००९ साली खासदार निधी म्हणजे काय हे दाखवून देणार्‍या खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी गाव तेथे निधी देऊन देखील गद्दारीचे फळ काय असते हे जनतेने त्यांना दाखवून दिले होते. त्यामुळे, मी याव केलं, मी त्याव केलं असे म्हणणार्‍यांनी सर्वांना सोबत घेऊन चालले तर ही निवडणुक सोपी जाणार आहे. अन्यथा निकाल हाती आल्यानंतर पश्‍चाताप करणे निव्वळ निष्फळ ठरेल हे उमेदवारांनी लक्षात ठेवले पाहिजे. मग तो उमेदवार कोणीही आणि कोणत्याही पक्षाचा असो..!!

कैलास वाकचौरे पडद्याआडचे कलाकार.!

सन १९९५ साली माजी मंत्री मधुकर पिचड साहेब यांना सगळे नेते सोडून गेले होते. तेव्हा वाकचौरे हे उमदे नेतृत्व होते. त्यांनी त्यांच्या संघटन कौशल्याची चुनूक दाखवून साहेबांचा विजय खेचून आणला. त्यानंतर त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये मोलाची भुमिका बजावली. इतकेच काय.! अकोले नगर पंचायतीच्या निवडणुकीत देखील कैलास वाकचौरे यांचा जलवा पहायला मिळाला होता. वाकचौरे हे भाषण करत नाहीत, कोणावर टिका टिप्पण्णी करीत नाहीत, कोणला अंगावर घेत नाहीत आणि कोणाच्या अंगावर देखील जात नाही. मात्र, त्यांच्या टप्प्यात आले की ते करेक्ट कार्यक्रम करतात. त्यांची सुत्र ही भावभर फिरतात आणि ते मात्र जाग्यावर बसून यंत्रणा हताळतात. अर्थात ही पद्धत अजित दादांना देखील माहित असेल. त्यामुळे, अजित दादांनी तीन वेळा कैलास वाकचौरे यांचे नाव घेऊन डॉ. लहामटे यांच्या निवडणुकीच्या रथाचे सारथ्य करण्याचे नकळत सुचना केल्या आहेत. त्यामुळे, आता कैलास वाकचौरे काय भुमिका घेतात, गेली दोन अडिच वर्षे डॉ. लहामटे यांनी वाकचौरे यांना अदखलपात्र केले होते. त्यामुळे, वाकचौरे किती दखलपात्र काम करतात हे फार महत्वाचे ठरणार आहे. 

डॉ. अजित नवलेंची निर्णायक भुमिका.!

राज्यात महाविकास आघाडीत जागावाटप करताना मार्क्सवादी पक्षाने अकोले तालुक्याची जागा पहिल्या क्रमांकाने मागितली आहे. अर्थात मार्क्सवादी पक्षाची येथे विजयी मते नसली तरी आघाडीत त्यांचे  सिट लागेल इतके सामर्थ्य देखील त्यांच्यात आहे हे नाकारुन चालणार नाही. कारण, येथे भाड्याने आणि पेट्रोल पाणी देऊन आलेले कार्यकर्ते नसतात. तर, हजारो कार्यकर्ते अनवाणी पायांनी लाल बावट्याच्या नावाखाली लोक तालुक्याच्या दिशेने चालते होतात. येथे १६ हजार पेक्षा जास्त मते यांच्या उमेदवारास होते. तर, अकोल्याची निवडणुक ४ हजार, २२ शे तर कधी सातशे मतांवर विजयी ठरली आहे. त्यामुळे, यांच्या मतांची किंमत आता नव्याने सांगायला नको. त्यामुळे, मार्क्सवादी म्हणून डॉ. अजित नवले काय भुमिका घेतात हे फार महत्वाचे आहे. त्यांनी जर उमेदवार उभा केला तर तो कोणाचातरी काटा करेल किंवा तो सगळ्यांचा काटा काढू शकतो. त्यामुळे, डॉ. अजित नवले यांची भुमिका फार निर्णायक ठरणार आहे.

ऐन निवडणुकीत मेंगाळ गायब.!

शुन्यातून राजकीय विश्‍व निर्माण करणारा नेता म्हणजे मारुती मेंगाळ होय. पंचायत समिती उपसभापती झाल्यानंतर गावोगावी फिरुन त्यांनी आपण आमदार होण्यास देखील पात्र आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. कधी डिजेंची रांग लावून आदिवासी दिन तर कधी प्रत्येकाचे दहावे, मौयती, लग्न आणि वाढदिवस करीत त्यांनी तालुका पिंजला. दुर्दैवाने महायुती आणि महाविकास आघाडी झाली आणि अनेकांना संधी मिळाली नाही. आपण आ. दौलत दरोडा, खा. निलेश लंके यांच्यासह अनेकांच्या संपर्कात आहोत आणि आपण तिकीट आणून आमदार होणार अशी त्यांची व्युव्हरचना होती. मात्र, ज्याचे त्याचे ज्याला त्याला पडले आहे. त्यामुळे, पाच वर्षे तालुक्याच्या काना कोपर्‍यात फिरलेल्या मारुतीला तिकीट भेटले नाही. मात्र, जागा वाटप होईपर्यंत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे, तालुक्यात वारंवार पांढर्‍याशुभ्र कपड्यात दिसणारे मेंगाळ ऐन निवडणुकीत गायब झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, मेंगाळ यांचे देखील मित्र परिवार आणि ठाकर समाजाची मते बर्‍यापैकी आहेत. ते देखील येणार्‍या काळात निर्णायक ठरु शकतात.