जे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पहात आहे ते आमदार होतील की नाही हा प्रश्न आहे. कारण, संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे आहे - डॉ. सुजय विखे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात राजकीय धुरळा उडाला आहे. महाविकास आघाडीचे सूत्र मा. आ.बाळासाहेब थोरात यांनी हाती घेऊन महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणुन ते पुढे येत आहे. तर दुसरीकडे माजी खा. सुजय विखें पाटील यांनी आ. थोरात यांना पडण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी तळेगाव, साकूर नंतर पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे सभा घेऊन जे मुख्यमंत्री होऊ पाहताय ते यावेळेस आमदार सुद्धा होणार नाही हे संगमनेरच्या जनतेने ठरवले आहे. हीच परिवर्तनाची नांदी आहे. त्यामुळे, सर्वजण महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहे. यावेळी आमदारांच्या गाडीतील लोक आणि कारखान्याचे कर्मचारी व त्यांच्या घरचे लोक देखील कमळाचे बटन दाबणार आहे. ही परिवर्तनाची सुरवात आहे असे बोलत शेरो शायरी करून आ. थोरात यांच्यावर टिकेची झोड उठवली. "दहशत के अंधेरे में यहाँ हर एक घरोंदा है, नाकामी और भ्रष्टाचार का, गले गले में यहॉं फंदा है, फिर नई सुबह की रहा देख रहा हर नौजवान परींदा है, अब संगमनेर वालो डरो मत, इसबार कमल खिलेगा,,,, क्योंकी टायगर अभी जिंदा है, टायगर अभी जिंदा है.!
डॉ. सुजय विखे पाटील पुढे बोलले की, संगमनेरमध्ये आलो की लोक मला मेसेज टाकतात आज काहीतरी नवीन होऊन जाऊद्या असे म्हणतात. पण, ज्या संगमनेर मधील लोक मला रोज नवं बोलायला सांगतात त्यांनी चाळीस वर्षे एकच टेप कसा ऐकला हेच मला कळलं नाही. चाळीस वर्षांपासून असणारे आमदार आणि त्यांच्या राजकन्या यांचे भाषणं ऐकले तर त्यामध्ये दोन वाक्य एक सारखे आहे. हा संगमनेर तालुका आमच कुटुंब आहे आमचा परिवार आहे. बाहेरचे लोक येऊन आपल्या कुटुंबात भांडण लावण्याचा प्रयत्न करतात. बाहेरचे लोक येऊन आपल्या अंगणात माती कालवताय यांना हद्दपार करा. असे दोन वाक्य चाळीस वर्षांपासून वडील बोलत होते, आता ताई बोलत आहे, हे सोडुन काही नाही. एक आठवड्यापासुन पाहतोय जेवढे गावं यांनी दत्तक घेतले त्या गावांना निधी मिळाला नाही. दत्तक घेतलेल्या गावांमध्ये सरपंच हे विखें पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडुन आले.
विखें पाटलांची गाडी सर्वसामान्यांसाठी मोकळी
संगमनेर तालुक्यातील नवीन व्यक्तीला आ. थोरातांच्या गाडीत बसायला जागा नाही. त्यांच्या कुटुंबाने बस अगोदरच भरलेली आहे. आ.थोरातांचे तालुक्याच्या गाडीचे प्रत्येक सीट घरामध्ये आहे. नातेवाईकांना, ठेकेदारांना, वाळूवल्याना ते सीट भेटतात. त्यांचे कारस्थान निस्तरता-निस्तरता आ. थोरतांची गाडी जाम झाली. त्यामुळे, आता तुम्ही त्या कुटुंबाच्या गाडी मध्ये चढु नका. तुम्हाला सगळ्यांना दत्तक घेण्यासाठी सुजय विखें आलेला आहे. आमची गाडी मोकळी आहे. आमच्या गाडी मध्ये ठेकेदार दिसणार नाही. वाळूवाला सापडणार नाही. आमच्या गाडीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा दिसेल. सर्वसामान्य सरपंच दिसेल.
"माझं बनुन रहा,आणि भीक मागुन खा"
संगमनेर तालुक्याचे आमदार एक वाक्य नेहमी वापरतात हा तालुका आमचे एक कुटुंब आहे. मात्र, एक वाक्य सांगत नाही की, "माझं बनुन रहा, आणि भीक मागुन खा" कार्यकर्ता दाबुन ठेवायचा ग्रामपंचायतच्या माध्यमातून, सोसायटीच्या माध्यमातून, सर्वसामान्याला चाळीस वर्षे दाबत आले. असे कुटुंबाचे नियोजन आहे. मात्र, आता या कुटुंबात दबावाला कोणी बळी पडणार नाही. त्यामुळे, ही गर्दी दिसते. कधी सुजय विखे यांनी गर्दीची तयारी केली नाही. घरातून बाहेर पडलो की आयोजकांना मी फोन करतो अरे बाबा किती गर्दी आहे. आतुन मंडप मोकळा आहे. अरे काळजी करू नको ही परिवर्तनाची नांदी आहे. मी येईपर्यंत संपुर्ण मंडप भरलेला दिसेल. लोक या कुटुंबाची दडपशाही आता उखडून टाकेल.अशी चौफेर टीका सुजय विखें यांनी आ. थोरातांवर केली.
दोन महसुल मंत्र्यांच्या संस्कृतीचा फरक
संगमनेरच्या महसुलमंत्र्यांचे संस्कृती काय एकही शासकीय जमीन उद्योगधंद्यासाठी नाही. तर फक्त स्वतःच्या संस्थेसाठी, स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक गावात गाईराण जमीन हे सरपंचाना हाताशी धरून स्वतःच्या घशात घातल्या. तर लोणी प्रवरेच्या महसुलमंत्र्यांची संस्कृती काय तर जवळपास ३५० कोटी रुपयांच्या जमीन ग्रामपंचायतींना विकासासाठी देऊ केल्या. ५०० एकर जमीनीवर आपल्या मुलांच्या रोजगारासाठी एमआयडीसी निर्माण केली. पुढचे २५ वर्षे तरुणांसाठी सुरक्षीत केले हे विखें पाटील महसुल मंत्र्यांची संस्कृती. संगमनेरच्या महसुलमंत्र्यांची संस्कृती काय तर "वाळु वाहा आणि तहसीलदारांनी पहा" हे वाळू वाहता वाहता लोक डंपरखाली आले रस्ते फुटले. वाळू वाल्यांची इतकी मुजोरी वाढली की, तलाठी, तहसीलदार यांच्या अंगावर गाड्या घातल्या. संगमनेरात वृद्ध माणसांचे डोल येत नाही. तहसील बाहेर बसलेले दलाल तीन हजार रुपये घेतात. तुमच्या संस्कृती मध्ये गोरगरीब जनतेला कसं संपवू शकतात हे इथल्या आमदार असलेल्या महसुल मंत्र्यांची संस्कृती आहे. सुजय विखें यांनी आ. थोरात यांच्या मुलीला "संस्कृती"ने उत्तर दिले.
तालुक्यातील पक्ष प्रवेश आ.थोरातांपुढे आव्हान.!
संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील साकुर परिसरातील ठाकरे गटातील सैनिकांनी माजी खा.सुजय विखें यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. यामध्ये माजी तालुका अध्यक्ष बाबासाहेब कुटे, गुलाब भोसले यांस सारखे कट्टर सैनिकांनी पक्ष प्रवेश केल्याने भाजपची ताकत पठारभागावर वाढली. यानंतर सावरगावतळ, चांदनपूरीच्या नागरिकांनी पक्षप्रवेश केला. त्यानंतर पुन्हा आता सुजय विखें पाटील यांनी मोठा गळ टाकला आहे. राजन दादा युवा मंचच्या माध्यमातून सामाजिक कामाचा वसा जपणारे राजन शिंदे हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा संगमनेर तालुक्यात जोर धरू लागली आहे. राजन शिंदे यांनी संगमनेर खुर्द गटासह तालुक्यातील नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याचे टँकर, सामन्य माणसांना हॉस्पिटलमध्ये आर्थिक मदत केली, शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला, गावागावातील शाळांची दुरुस्ती केली तर गरजूंना मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य वाटप केले. यामधून त्यांनी हजारो माणसे जोडले आता हेच सर्वजण भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, मोठा युवकांचा गट युवा संवाद यात्रेला धक्का देत भाजपात जाण्याची शक्यता आहे. यामुळे आ. थोरातांनपुढे पक्षप्रवेशाचे तरुणांचे मोठे आव्हान असणार आहे.