थोरातांची पिचड साहेबांना भेट, म्हणे दिर्घायुष्य लाभो.! अन डॉ. लहामटे म्हणतात, तुम्ही मरु नका, माझा विकास बघायला थांबा.!
सार्वभौम (अकोले)-
विरोध असावा, पण त्या विरोधाला देखील काही परिसिमा असावी, टिका करावी. मात्र, त्या टिकेला शब्दांची बंधने असावी आणि एखाद्याचे वाईट चिंतावे. मात्र, त्या चिंतन्याला देखील नैतिकता आणि माणुसकी असावी. यातील एका देखील तत्व डॉ. किरण लहामटे यांनी मधुकर पिचड साहेब यांच्यावर टिका करताना पाळल्याचे दिसत नाही. पिचड साहेब मृत्युशी झुंज देत असताना गावोगावी प्रार्थना होत आहे. अनेक कट्टर विरोधक त्यांना भेटून जात आहेत आणि अशात आपल्या अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणतात, पिचड साहेब.! तुम्ही मरु नका. मी अकोल्याचा कसा विकास करतोय तो पाहण्यासाठी तुम्ही थांबले पाहिजे. म्हणजे, हा प्रकार अक्षरश: अमानवीय आणि निर्दयी आहे. तुम्ही विकास केला म्हणजे अकोले तालुक्याचा नानजिंग किंवा कॅलिफॉर्निया केला नाही. की, ज्याचे क्षणा क्षणाच्या श्वासांशी युद्ध चालु आहे. त्यामुळे, साहेब.! थोडे जमिनीवर या. माणसाकडे माणूस म्हणून पहा, विकास म्हणजे सर्वस्व नाही. आज भाजपात असणार्या पिचड साहेबांना भेटण्यासाठी कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात गेले, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे आणि खुद्दा पवार साहेबांनी देखील चौकशी केली आहे. त्यामुळे, विरोध आणि माणुसकी यातला अंतर ओळखायला शिका. कामे केली म्हणजे लोकांनी वर्गनी काढून त्यासाठीच निवडून दिले होते. पिचडांना उपरोधात्मक बोलण्यासाठी बिल्कुल नाही...!!
खरंतर पिचड साहेबांनी विकास केला की नाही हा प्रश्नच गौण आहे. मात्र, त्यांच्या जिवणाशी अनेकांच्या भावना जुडल्या आहेत. ते असणे म्हणजे तालुक्याची अस्मिता आहे. त्यांनी कोणाचा विकास पहायला थांबावा अन म्हणून त्यांनी जगावे इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आलेली नाही. पण, अनेकांच्या काळजाचा ठाव घेणारे आणि लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या व्यक्तीमत्वावर या तालुक्याचे राजकारणापलिकडे प्रेम आहे. म्हणून त्यांनी जगावे अशी सामान्य मानसांची धारणा आहे. पिचड साहेबांची उभी हयात राजकारण आणि समाजकारणात गेली. मात्र, त्यांनी कधी कोणाच्या मृत्युवर उपहासात्मक टिप्पणी केली नाही. कधी द्वेषाचे राजकारण केले नाही. निवडणुक संपली की विरोधक देखील आपलाच अशा प्रकारचे राजकारण त्यांनी केले. तेच खाली बाळासाहेब थोरात यांनी देखील केले. मात्र, अकोल्यात तर आजकाल वेगळाच पायंडा पडू पहात आहे. फक्त तुझ्यापेक्षा मी कसा काम करतोय हे पाहण्यासाठी तुझे जगणे गरजेचे आहे असे म्हणणारे देखील महाभाग या तालुक्यात आहे हेच अनेकांच्या मनाला खटकणारे आहे.
सन १९७७ पासून पिचड आणि भांगरे परिवार राजकारणात विरोधात आहे. १९८० पासून भांगरे आणि पिचड यांचे राजकीय द्वंद्व आहे. मात्र, अशोकराव मयत झालेल्याचे समजले आणि बरे नसताना देखील अंगावर पांघरुन घेऊन सगळ्यात पहिल्यांदा हेच मधुकर पिचड त्यांच्या घरी पोहचले होते. विरोधक असला तरी त्याला संधी द्यायची, वेळप्रसंगी त्याच्या पाठीशी उभे रहायचे ही वैचारिक निती पिचडांनी उभी हयात जोपासली. अशोकराव यांना एकदा सभापती तर एकदा जिल्हा परिषदेवर सदस्य केले. त्यानंतर देखील अनेक वेळा म्हणजे १९८० ते २०१४ ते एकमेकांच्या विरोधात राहिले. पण कधी एकमेकांच्या वैचारिक मर्यादा सोडल्या नाही. इथे मात्र विरोधक म्हणजे त्याला जगायचा अधिकारच नाही. निवडणुका आल्या की त्यांचे मागचे पुढचे उणे धुणे काढायचे. कधी पिचडांची दुसरी बायको आणि संपत्ती तर कधी अमित भांगरे यांचे हॉटेल आणि परवानग्या यावर बोट ठेवायचे. ही तर भाजपाची रणनिती आहे. अर्थात डॉ. लहामटे हे मुळता संघवादी आहे. त्यात चुकून २०१९ ला पुरोगामी विचारांत प्रवेश झाला. पण, दुर्दैवाने पुन्हा दादांसोबत भाजपाच्या वळचणीत जाऊन वान नव्हे पण गुण उदयास आला. त्यामुळे, चौकशा आणि धमक्या यांनी पाच वर्षात उच्छाद मांडला होता. आता येणार्या काळात मतदारांनी ठरवायचे आहे. हा उन्माद गाडायचा की अंगवळणी पाडून घ्यायचा.!!
खरंतर अनेकांना वाटेल. की, पिचड साहेबांवर अकोले तालुका इतका प्रेम का करतो आहे. तर, येथे आदिवासी जागा आरक्षित असून देखील येथील बहुजन समाजास त्यांनी कधी दुय्यम दर्जा दिला नाही. मधुभाऊ नवले, दशरथ सावंत, भाऊसाहेब हांडे, बी. जे. देशमुख, जालिंदर वाकचौरे यांसारख्या व्यक्तींनी त्यांच्या विरोधात गेली अनेक दिवस काम केले. शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून शिवाजीराजे धुमाळ यांनी प्रचंड आक्रमक होऊन अनेक सभा गाजविल्या आहेत. सिताराम पा. गायकर यांनी देखील त्यांच्या विरोधात काम केले आहे. मात्र, विरोध हा राजकारणात तात्विक असतो. तो आयुष्यभर बांडगुळ म्हणून संभाळाचा नसतो. म्हणून तर पिचड साहेबांनी प्रत्येकाला संधी दिली. उभे आयुष्य विरोधत घालविणार्या सावंत यांनी १९९५ साली मधुकर पिचड यांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक केले होते. पिचड साहेबांवर तोफ डागविणारे शिवाजी धुमाळ आज साहेबांचे अगदी जवळचे स्नेही आहेत. १९९५ आणि २०२२ मध्ये मधुकर पिचड यांच्या विरोधात काम करणार्या गायकर साहेबांना देखील पिचडांनी संधी दिली आणि आज साहेब आजारी असताना कैलास वाकचौरे आणि ते साहेबांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत आहेत. अन आमदार मात्र, म्हणतात तुम्ही जाऊ नका. मी काय कामे करतो ते पाहण्यासाठी तुम्ही थांबले पाहिजे.
उशिरा सुचू लागले शहाणपण.!
खरंतर अकोले तालुका हा फार भावनिक आहे. भिक भागून खाऊ पण आपला स्वाभिमान आणि मातृत्वाची भावना कधी पायंदळी तुडविणार नाही. विशेषत: मृत्युशी झुंज देणार्या व्यक्तीबाबत तर वैर कधीच धरणार नाही. मात्र, डॉ. लहामटे यांनी या संस्कृतीला काळे फासण्याचे काम केले आहे. अशी टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे. एकेकाळी पिचड साहेबांना काळे फासण्याचा प्रयत्न झाला. काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तरी देखील त्यांनी कधी गुन्हे दाखल केले नाही. जसे भाऊसाहेब वाकचौरे यांनी गद्दारी केल्यानंतर अमर कतारी यांच्यासह अनेकांवर केले होते. हे सामाजिक भान, राजकीय समज पिचडांनी कायम बाळगली. दुर्दैवाने अजित दादांसह त्यांच्या आमदारांना देखील सामा. नैतिकता राहिली नाही असे दिसते आहे. अगदी दादांनी देखील आर.आर.पाटील यांच्याबाबत म्हणले. की, सिंचन घोटाळ्यात आबांनी माझा केसांनी गळा कापला. माणूस जाऊन नऊ वर्षे लोटली अन आता निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तुम्हाला शहानपण सुचू लागले आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही आपल्या काकांच्या पाठीत कसा खंजित खुपसला आणि तुमच्या आमदारांनी देखील कशी गद्दारी केली. हेच आता जनता दाखवूून देणार आहे. कॉ. डॉ. अजित नवले म्हणाले आमदारांनी देखील सव्वा लाख लोकांच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. ते अगदी खरं आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटू लागल्या आहेत. तर याच आमदारांनी तिरंगा रॅली काढली तेव्हा काही गावांमध्ये माणूस मयत झालेला आणि हे महाशय गावोगावी डिजे घेऊन फिरत होते. त्यामुळे, अनेकांच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया काही व्यक्तींनी दिली. त्यामुळे, आपल्या आनंदात कोणाचे तरी दु:ख आहे हेच आमदार विसरुन जातात. तुमची मानसे मरुद्या किंवा जगूद्या. पण, आम्हाला आमचा आनंद साजरा करुद्या ही प्रवृत्ती फार चुकीची असल्याच्या भावना एका देशमुख मतदाराने व्यक्त केली आहे.
पिचडांच्या ऑफिसमधून मोदी, शहा, फडणविस हद्दपार.!
राष्ट्रवादी कॉंग्रेसची निष्ठा सोडून विकासाच्या अजेंड्याखाली पिचड पिता-पुत्र भाजपात गेले. भाजपाने त्यांना राष्ट्रीय मंत्री वैगरे असे बिन पगारी अन फुल अधिकारी अशी पदे जाहिर केली. मात्र, जेव्हा मा.मंत्री मधुकर पिचड साहेबांना खरोखरचे राज्यपाल पद देण्याची वेळ आली किंवा वैभव पिचड यांना विधानसभेचे तिकीट देण्याची वेळ आली. तर, हात वर केले. अखेरच्या क्षणापर्यंत वैभव पिचड यांनी पक्षाशी निष्ठा दाखवून अपेक्षा ठेवली. मात्र, आता महायुती झाली आणि डॉ.लहामटे यांना तिकीट जाहिर झाले. त्यामुळे, वैभव पिचड यांच्या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदरणीय देवेंद्र फडणविस, अमित शहा आणि अन्य भाजपाच्या नेत्यांचे फोटो हद्दपार करण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील त्यांनी भाजपा सोडल्याचे जाहिर केले नाही. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील अपक्ष भरला असून पक्ष आणि महायुती विरोधात भुमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे, येत्या चार तारखेला काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमित भांगरे छत्रपती नाहीत.!
खरंतर, काल अमित भांगरे यांच्या सभेत ज्येष्ठ नेते दशरथ सावंत साहेब यांनी जे काही वक्तव्य केले. ते त्यांच्या वयाला आणि कर्तुत्वाला न शोभणारे आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी करणे हे अयोग्यच आहे. छत्रपती म्हणून तर नाहीच नाही. मावळे म्हणून लढा आणि जिंका. काय कोथळे बाहेर काढायचे ते काढा. पण, शिवरायांशिवाय कोणी छत्रपती नाही हे पुन्हा एखाद्या सभेत नमुद करा. वयोवृद्ध व्यक्तींच्या वक्तव्याने काय होते हे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे झालेल्या सभेने दाखवून दिले. विखे पाटलांना प्रचंड समर्थन असताना सगळे वातावरण एका क्षणात बदलुन गेले. त्यामुळे, येथील सहकारी संस्था, महापुरुष व तालुक्याच्या अस्मिता असणार्या व्यक्तींवर बोलताना हजारदा विचार करा. अन्यथा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही. हे अमित भांगरे आणि आवेशात बोलणार्या प्रत्येकाना लक्षात घेतले पाहिजे.