भांगरेंच्या व्यासपिठावर १७ शे ६० पुढारी.! पण वाच्चाळवीर अमितला बसवतील घरी.! आवरा तोंडाला, सावरा पराभवाला.!

सार्वभौम (अकोले)-

जसजशी विधानसभेची निवडणुक रंगात येऊ लागली आहे. तसतसे नेत्यांच्या अंगात येऊ लागले आहे. माईक हाती आला म्हणजे आवेशाच्या भरात आया बहिनींची आब्रु वेशीवर टांगायची, कधी उमेदवारांना महापुरुषांच्या रांगेत बसवायचे, तर कधी आरोप प्रत्यारोप करताना वैयक्तीक उणीधुणी काढायची. हे असले घाणेरडे राजकारण गेल्या पाच वर्षात अकोल्यात अधिक रुजू पाहत आहे. विशेषत: आमदार, भांगरे, देशमुख आणि सावंत यांच्याकडून हा प्रकार फारवेळा पहायला मिळाला आहे. यांच्यातील व्यक्तीगत मतभेद दहाव्यात आणि कारखान्यांच्या व्यासपिठावर किंवा लग्नात आर्शीवाद देताना देखील ऐकायला मिळाले आहे. मात्र, जसे संगमनेर येथे मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्रीताई यांच्याबद्दल अगदी गलिच्छ भाषेत बोलले गेले. तसे अकोल्यात होऊ नयेे. काल ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी अमित भांगरे यांचा उल्लेख छत्रपती म्हणून केला. त्यामुळे, खरोखर अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे, येणार्‍या काळात अमित भांगरे यांच्या व्यासपिठावर १७ शे ६० पुढारी असणार आहे. त्यांनी आवेशात भाषण करताना तोंडाला आवर घालणे अपेक्षित आहे. अन्यथा जसे विखे पा. यांची परिस्थिती झाली. तशी भांगरे यांची होण्यास वेळ लागणार नाही. तर डॉ. लहामटे यांनी कार्यकर्ते संभाळले नाही, विरोधकास आपले माणले नाही, राजकारणात लवचिक रहाता आले नाही. त्यामुळे, त्यांच्याकडे एक विशिष्ठ टिम सोडली तर नेतेच नाही. त्यामुळे, असा काही प्रसंग ओढावण्याची वेळ येईल अशी सुत्राम शक्यता नाही. असे सुज्ञ मतदारांचे मत आहे.

धरणात पाणी नाही तर मी काय मुतू काय? हे वाक्य म्हटलं की, अनेकांना दादा आठवतात. त्यांच्या वाक्याचा राजकारणावर काय परिणाम झाला हे त्यांनीच अनेकदा बोलुन दाखविले आहे. तसेच ज्या मुलांनी प्रेम केले, त्यांनी आम्हाला मुलींची नावे सांगा आम्ही तिला उचलुन आणतो हे वाक्य देखील भाजपाच्या नेत्याने बोलल्यानंतर किती मोठा वादंग झाला होता. त्यानंतर माफीनामा झाला आणि प्रकरणावर पडदा पडला. अशी एक दोन नव्हे.! हजारो उदा. या महाराष्ट्रात आणि देशात ऐकायला मिळाली आहे. इतकेच काय.! जात आणि धर्मावर देखील मते मागताना अनेक दंगली आणि वादळे निर्माण झाली आहेत. त्यामुळे, पुर्वी निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव होता, आता मात्र तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे, दुर्दैव असे की, लोकशाहीचा हा उत्सव आनंदाने साजरा करताना तो पोलीस बंदोबस्तात साजरा करावा लागतो, यापेक्षा मोठे दुर्वैव काय?

अर्थात सन १९८० च्या दशकापासून राजकारणात फार तणाव नव्हता. मात्र, नंतर नेत्यांमध्ये मतभेद वाढले, १९७७ प्रमाणे पुलोद सारखे सरकार बनविण्यासाठी पवारांनी पक्ष फोडले, तिच परंपरा नंतर पुढे चालु राहिली. ती २०२२ मध्ये देवेंद्र फडणविस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कुठवर आणुन ठेवली हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. परिणामी नेते फुटले आणि राजकीय अस्थिरता वाढली. ती स्थिर करण्यासाठी बोके, खोके, गुवाहटी आणि झाडी, डोंगर यात महाराष्ट्र इतका होरपळून गेला. की, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि बोटावर मोजता येतील इतकेच मंत्री त्यामुळे, सगळी खाती रामभरोसे होती. त्याचे उत्तम उदा. म्हणजे बीसीए, बीबीए यांचे प्रवेश आत्ता नोव्हेंबरच्या तोंडावर झाले आहे. म्हणजे पाच-सहा महिन्यात वार्षीक परिक्षा घेणार आहेत. का? असो.! हा आहे सावळा गोंधळ. गेली अडिच वर्षे उलटली, चिन्ह कोणाचे आणि पक्ष कोणाचा हे न्यायप्रविष्ठ आहे. तर, लोकशाही राज्यात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडिच वर्षे उलटून गेले तरी घेतल्या गेल्या नाहीत. येथे प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. हे सांगण्याचे कारण काय? तर सुज्ञ मतदार प्रचंड वैतागला आहे. तर, नेते देखील या अन्यायी व्यवस्थेला कंटाळले आहेत. म्हणून रागाच्या भरात वाट्टेल ते बोलुन सरकारवर राग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. दशरथ सावंत साहेब यांचे बोल चुकले असले. तरी, प्रचंड भ्रष्टाचार, हुकूमशही, दहशत आणि हम करे सो कायदा. अशा प्रकारची वृत्ती गेल्या अडिच वर्षात पहायला मिळाली आहे. त्यामुळे, अमित भांगरे या सह्याद्रीतील मावळ्याने भ्रष्टाचार, हुकूमशही, दहशत यांचा कोथळा बाहेर काढावा इतके वाक्य अपेक्षित होते. मात्र, छत्रपतींचा अपमान त्यांनी अपेक्षित नव्हता. हे तितकेच सत्य आहे.

आता तरी देखील त्यांचे वक्तव्य ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांना साजेसे वाटत नाही. त्यांच्या भावना जरी वेगळ्या असल्या तरी त्या भावनांचा भावार्थ वेगळा काढणार्‍यांनी अपभ्रंश करुन त्यांना अपेक्षित अन्वयार्थ लावला. त्यामुळे, निवडणुकीच्या काळात त्या शब्दांचे भांडवल केले नाही तर ते विरोधक कुठले.! अर्थात सावंत साहेब यांची काय ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आमदार आणि गायकर यांना आपल्या अजेंड्यावर घेऊन तोंडसुख घेतले आहे. त्यामुळे, काल ते सुपातून जात्यात सापडले आणि विरोधकांनी भुगा करायला सुरुवात केली. आता अमित भांगरे यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे. की, पुढच्याला ठेच मागचा शहाणा. संगमनेरात धांदरफळ येथे वसंत देशमुख बरळले आणि त्यानंतर विखे पाटलांच्या सभेवर पाणी फिरले. त्यामुळे, येणार्‍या काळात आपल्या व्यासपिठावर शेकडो वक्ते राहणार आहे. अकोले तालुक्यात भाषण सम्राट काही कमी नाहीत. त्यामुळे, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास होईल आणि त्याचा फटका बसले याची काळची घेतली पाहिजे.

वातावरण संपायला वेळ लागत नाही.!

डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर तालुक्यात तळगाव दिघे, साकूर, हिवरगाव पावसा आणि धांदरफळ तसेच आंभोरे अशा पाच ठिकाणी सभा घेतल्या. या सभेंना तोबा गर्दी जमली होती. काही झाले तरी परिवर्तन करायचे अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहत होती. अगदी अपराजित बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या यंत्रणेला हलविण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, धांदरफळ येथे एक सभा झाली आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दशरथ सावंत यांचे मित्र वसंत देशमुख यांची जीभ घसरली. (सावंत साहेब आणि देशमुख यांनी 1989 साली संगमनेर साखर कारखान्याच्या निवडणुका सोबत लढविल्या आहेत) त्या घटनेनंतर संपुर्ण निवडणुक विखे यंत्रणेच्या हातून निसटून गेली. त्यानंतर दगडफेक, जाळपोळ, मारामारी आणि अंतीमत: एकाच प्रकरणामुळे सात गुन्हे दाखल झाले. नंतर विखे यंत्रणेने देखील निवडणुक सोडून दिली. त्यामुळे, आज अकोल्यात शरद पवार म्हणून तसेच मविआ म्हणून वातावरण कायम टिकून आहे. उद्या वातावरण संपायला वेळ लागणार नाही. आता यातून काय घ्यायचे आणि काय नाही.! हे नेत्यांनी ठरवावे, राम कृष्णा हरी, सावरा तुतारी..!!

जात, धर्म आणि रंगावर निवडणुक नको.!

२५ जानेवारी २०२३ मध्ये शाहरुख खानचा पठाण चित्रपट आला होता. त्यात बेशर्म हे गाणं होतं. त्यात दिपीका पदुकोण या हिरोईनने भगवे कपडे घालुन डान्स केला होता. त्यावर अक्षेप घेणार्‍या नवनित राणा यांनी देखील भगवे वस्त्र परिधान करुन तसाच डान्स केला होता. मात्र, वस्त्र हे वस्त्र असते, भगवा हा रंग आहे. मात्र, जेव्हा त्याचा ध्वज तयार होतो किंवा प्रतिक तयार होते. तेव्हा त्याचा अनादर करूच नये. अन असे कोणी करत असेल तर तो शंभर टक्के मुर्खपणा म्हणावा लागले. त्याच्यावर कलम २९५ नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे. खरंतर प्रत्येक रंग ज्या-त्या समाजाचे प्रतिक आहे. जसे हिरवा, लाल, निळा, पिवळा अशी कित्तेक उदा. सांगता येतील. त्यामुळे, एखादी प्रिंट केलेली शॉल (जशी साईबाबांची असते), देशाचे दैवत राजे शिवछत्रपतींचा झेंडा किंवा धार्मिक झेंडा असेल, तिरंगा असेल यांचा अपमान झाला तर शंभर टक्के त्यावर भुमिका घेतली पाहिजे. उद्या बौद्ध निळ्यावर दावा करतील, मुस्लिम हिरव्यावर, धनगर पिवळा आणि आदिवासी बांधव किंवा कम्युनिस्ट लाल रंगावर दावा करतील. मग असे झाले तर कपडे घालणे देखील मुश्‍लिल होईल. त्यामुळे, डॉ. अजित नवले यांनी आपल्या हिंदुंची अस्मिता असणार्‍या भागव्याचा अपमान केलेला नाही. कारण, आमदार काय साधुसंत किंवा ह.भ.प नाहीत आणि वाळे काय पुजारी नाही. त्यामुळे, २०१९ मध्ये शिवसैनिकांना भुरळ घालण्याची युक्ती होती. तिच नंतर कायम झाली. त्यामुळे, पुरोगामी विचारांच्या नेत्यांनी तरी अकोले तालुक्याची निवडणुक जात, धर्म, लिंग, पंथ, परंपरा आणि रंग यावर घेऊन जाऊ नये. जे नवोदीत व अतिउत्साही तरुण कार्यकर्ते असती त्यांना देखील सुचना दिल्या पाहिजे. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची हत्या होणार नाही याची प्रत्येकाने नैतिक जबाबदारी म्हणून काळजी घ्यावी ही कळकळीची विनंती.