डॉ. सुजय विखेंच्या व्यासपिठाहून थोरातांच्या मुलीवर निच पातळीची टिका, संगमनेरात गाड्या फोडल्या आणि जाळपोळ, राडा सुरुच, विखेंना अटक करा...!
सार्वभौम (संगमनेर) -:
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु येथे भाजपची युवा संकल्प सभा डॉ.सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांची जीभ घसरली. वसंतराव देशमुख यांचे अध्यक्ष भाषण सुरू असताना काँग्रेसचे नेत्या जयश्री थोरात यांच्यावर टिका करत असताना ही जीभ घसरली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे पडसाद उमटले. त्यांनी धांदरफळ येथुन येणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची सात ते आठ गाड्या फोडुन जाळपोळ केली. त्यानंतर गाडीतुन उतरणाऱ्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना अकोले नाका परिसरातील पुलाखाली, खांडगाव दुध डेअरी समोर चिखली येथे घडली ही सर्व घटना आज शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर तालुका पोलीस ठाणे येथे ठिय्या आंदोलन करून अटक करा, अटक करा सुजय विखेंला अटक करा अशी घोषणाबाजी करून रस्ता रोको सुरू आहे.
दरम्यान, डॉ. सुजय विखे यांनी तळेगाव, साकूर, हिवरगाव पावसा आणि आज धांदरफळ येथे सभा आयोजित केली होती. जयश्री थोरात यांच्या सात लाख जनतेचा बाप या वाक्याहून सुरु झालेले राजकीय युद्ध आज अतिशय निच पातळीवर जाऊन पेटले. जयश्री ताईंविषयी गलिच्छ बोलत निच पातळीचे शब्दप्रयोग विखेंच्या व्यासपिठाहून झाले. त्यामुळे, बापाहून सुरु झालेले राजकीय वाकयुद्ध थेट घाणेरड्या वक्तव्यावर जाऊन पोहचले. अध्यक्ष बोलण्यात इतके मग्न झाले होते. की, आपण बोलतोय काय, आपलं वय काय, आपली पातळी काय, आपले व्यासपिठ काय याचे देखील भान राहिले नव्हते. त्यांचे हे वाक्य उपस्थित जनसमुदायाच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले. राजकारण करावे, पण ते इतक्या निच पातळीने करावे ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. त्यामुळे, विखेंनी जे काही राजकीय स्थैर्य संगमनेरात मिळविले होते. त्यावर आता पाणी फिरले आहे.
तरी अध्यक्ष ऐकायला तयार नव्हते.!
एखाद्या भर सभेत पब्लिक पाहिली म्हणजे काहीही बकायचे असली विकृत राजनिती धांदरफळच्या सभेत पहायला मिळाली. सभेचे अध्यक्ष असलेले देशमुख यांनी टिका करताना आपल्या नातीच्या वयाच्या मुलीस असे खालच्या पातळीवर जाऊन बोलणे हे शोभते का? असा प्रश्न उपस्थित होत असला. तरी, या महाशयांना सभेत बोलतानाच थांबविण्यात आले होते. मात्र, अति उत्साही आणि घाणेरड्या शब्दांनी रंगलेल्या सभेत अध्यक्ष महोदयांची जीभ पुर्णत: घसरुन गेली होती. अर्थात ते जयश्री थोरात यांच्याबाबत घसरले तेव्हाच जाणकार व्यक्तींनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला होता. नशिब.! अध्यक्ष त्यावर बळबळ का होईना थांबले, नाहीतर त्यांनी संगमनेरच्या संस्कृतीची लक्तरं वेशिवर टांगली असती. अध्यक्ष देशमुख यांच्या वक्तव्याचे पडसाद संगमनेरात थेट जाळपोळ आणि फोडाफोडीत पहायला मिळाले.
पोलिसांचा फौजफाटा तैनात
संगमनेर शहर आणि ग्रामीण येथे गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक, पोलीस उपाधिक्षक यांनी सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना ताडीने शहरात बोलावूून घेतले. शहरात पोलीस पेट्रोलिंग लावण्यात आली, त्यामुळे, शहरात अधिकची घातक घटना टळली. तरी देखील काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याने संगमनेर तालुक्यात आणि शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच पळापळ पहायला मिळाली होती.
लोकांचे प्रचंड हाल झाले.!
दरम्यान, धांदरफळ येथून शहर आणि अन्य गावांकडे येणाऱ्या गाड्यांची चिखली येथे तोडफोड आणि जाळपोळ सुरु झाली. हे अन्य वाहन चालकांनी पाहिल्यानंतर त्यांनी गाडीत बसवून आणलेल्या व्यक्तींना मध्येच उतरुन दिले. वाहन चालकांनी कोठे शॉटकर्ट तर कोठे पळकुटी भुमीका घेतली. रात्र झालेली होती, गाडीत महिला, बारीक मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती देखील होते. मात्र वाहन चालकांनी त्यांना मध्येच उतरुन दिले. कारण, त्यांना गाडी जाळणे आणि फोडणे यापासून बचाव करायचा होता. त्यामुळे ते पळून गेले. त्यानंतर मात्र सभेला गेलेल्या महिला व माणसांनी पायी प्रवास सुरु केला. 10 ते 12 किलोमिटर लोक पायी चालत घरी गेले. त्यामुळे, मी तुमच्यासाठी आलोय, तुमचे दु:ख दुर करायला आलोय असे म्हणणाऱ्यांमुळे किती त्रास सहन करावा लागला याची अनुभुती सभेला गेलेल्या लोकांनी घेतली. त्यामुळे, विखे पाटलांच्या विरोधात प्रचंड भयान वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
जे झाले त्याचा निषेध, गुन्हा नोंदवा - डॉ. विखे
वसंतराव देशमुख आणि भाजपा यांचा काही एक संबंध नाही. ते कायम येथील विरोधक राहिले आहे. त्यांनी आमदार थोरात साहेबांच्या विरोधात निवडणुक लढविलेली आहे. ते त्या गटातील ज्येष्ठ नेते आणि विरोधक असल्यामुळे स्टेजवर होते. त्यांनी यापुर्वी देखील वादग्रस्त विधाने केली आहेत आणि त्याहून वादही झाले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. वसंतराव देशमुख यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. पण, ज्यांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्या, दगडफेक केली, जाळपोळ केली, शिविगाळ, दमदाटी आणि मारहाण केली अशा लोकांवर देखील कायदेशीर गुन्हा दाखल केला पहिजे. इतक्या गलिच्छा शब्दांचा वापर झाला असेल तर कार्यकर्ते आक्रमक होणे स्वभाविक आहे. पण, आमच्या गाड्यांमधील महिला खाली उतरवून त्या गाड्या फोडणे ही दहशत नाही तर काय आहे? हे देखील योग्य नाही. आम्ही आमचे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत होतो. मात्र, वसंतराव देशमुख कोठून आले आणि त्यांनी बेताल वक्तव्य केले हे निषेध करण्याजोगे आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
संगमनेर तालुका पेटला.!
वसंत देशमुख यांच्या बेताल वक्तव्यानंतर संगमनेर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. चिखली येथे दगडफेक, जाळपोळ आणि गाड्या फोडणे हे प्रकार पहायला मिळाले. तर, जवळे, खांडगाव, कोर्ट गल्ली संगमनेर, घुलेवाडी येथे देखील आंदोलने आणि निषेध व्यक्त केल्याचे पहायला मिळाले. घुलेवाडी परिसरात नाशिक हायवे बंद करण्यात आला होता. तर, हजाऱ पाचशे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात बसून गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. तर, तालुक्यात विविध गावांमध्ये उद्यापासून निषेध म्हणून वेगवेगळे प्रकारे आंदोलने पहायला मिळणार आहे.
वसंत देशमुखवर काय कारवाई.!
डॉ. सुजय विखे यांच्या व्यासपिठावर धांदरफळ येथे झालेल्या सभेत नेहमी वादात असणार्या वसंत देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. तर, देशमुख यांच्यावर लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य (विनयभंग) आणि प्रक्षोभित तथा अक्षेपहार्य वक्तव्य केल्याप्रकरणी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो. तर, यात डॉ. सुजय विखे, अमोल खताळ आणि अन्य आयोजकांवर गुन्हे नोंदवून अटक करा अशी मागणी करीत थोरात समर्थकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. जेव्हा देशमुख याने हे बेताल वक्तव्य केले, त्यानंतर तो घरी देखील गेला नाही. पोलीस घरी गेले तर याचाच टांगा पलटी होऊन घोडे फरार झाल्याचे पहायला मिळाले. पोलिसांनी शोधून सुद्धा तो सापडला नाही. तर, उलटपक्षी डॉ. सुजय विखे म्हणाले ज्यांनी ज्यांनी गाड्या फोडल्या, गाड्या जाळल्या, दहशत माजविली अशा सर्वांवर कायदेशिर गुन्हा दाखल करावा. आम्ही देशमुख यांच्या वक्तव्याचो निषेध करतो. जशी त्यांच्यावर कारवाई करावी तशी तोडफोड करणाऱ्यांवर देखील व्हावी.