निवडणुकीच्या काळात संगमनेरात ४२ लाख रुपये, गुजरात कनेक्शन उघड, आचारसंहीता लागू असताना पैशांची थप्पी, चौघांची चौकशी सुरू.!
सार्वभौम संगमनेर:-
निवडणुकीची आचारसंहीता सुरू असताना संगमनेर शहरात ४२ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली आहे. ही रक्कम हवाल्याची असल्याचे पोलिसांनी सांगितले असले. तरी, याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात गुरजरात येथील व्यापार्यांचा हात असून काही लोक संगमनेर येथील असल्याचे समोर आले आहे. शासनाचा कर चुकविण्यासाठी हा उपद्यव्याप केल्याचे प्रथमदर्शनी वाटत असले. तरी ही रक्कम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर आली नाही ना? याची चौकशी सध्या सुरु आहे. ही कारवाई आज दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी संगमनेर येथील पार्श्वनाथ गल्लीतील सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली होती. की, संगमनेर येथे एका सोन्याच्या दुकानाच्या जवळ लाखो रुपये बेकायदेशीर येत आहेत. त्यांनी तत्काळ पथक तयार केले आणि संगमनेर येथे रवाना केले. त्यानंतर काही साध्या वेशात तर काही वर्दीवर असणार्या पोलिसांना सापळा रचण्याचे आदेश दिले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आणि ठरल्यावेळी संगमनेर शहरातील पार्श्वनाथ गल्लीतील सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर दोन व्यक्ती आले. त्यांच्याकडे काही बॅगा भरलेल्या होत्या. पोलिसांनी योग्य वेळ साधली आणि दोघावर झडप मारली.
दरम्यान, यात मुकेशकुमार रमेशभाई पटेल (वय ३६, रा. पार्श्वथान गल्ली, संगमनेर मुळ रा. गोठवा, गुजरात), धवलकुमार जसवंतभाई पटेल (वय ३२, रा. पार्श्वथान गल्ली, संगमनेर, मुळ गाव ठलोेटा, गुजरात) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सांगितले. की, ही रक्कम हवाल्याची आहे. तर याचा मालक हा भावेश रामाभाई पटेल (रा. पार्श्वथान गल्ली, संगमनेर) व आशिष सुभाष वर्मा (रा. अहिल्यानगर) ही दोघे आहेत. त्यानंतर पोलिसांंनी यात प्रकरणात संशयीत असणार्यांना ताब्यात घेतले आहे. ही रक्कम कोठून आली, त्याचा मालक आणखी कोण आहे, येथे आणखी किती वेळा हवाला झाला आहे. हा उद्योग किती दिवसांपासून सुरू आहे. ४२ लाख १५ हजार रुपये कोठून आले आणि त्याचा काय विनियोग होणार होता. या सर्व गोष्टींचा तपास आता सुरू झाला आहे. या सर्व रकमेचा हिशोब द्यावा लागणार आहे. अन्यथा या प्रकरणात चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात खोक्यांचे चर्चा रंगली आहे. गुवाहटी ते गोवा आणि कर्णाटकहून महाराष्ट्र असा प्रवास अनेकांना ज्ञात आहे. त्यामुळे, काही झालं तर सत्ता हस्तगत करण्यासाठी येणार्या निवडणुकीत फार अर्थपुर्ण घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आज ४२ लाख १५ हजार रक्कम म्हणजे जवळपास अर्धा कोटी रुपये संगमनेरात मिळून आले आहे. यात गुजरातच्या दोघांची नावे आहेत. त्यामुळे, आचारसंहिती असताना देखील इतकी मोठी रक्कम मिळून येते ही गोष्ट तशी धक्कादायक आहे. मात्र, या पैशांचा हिशोब ज्यांच्याकडे पैसे मिळूून आले त्यांना द्यावा लागणार आहे. अन्यथा या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. संगमनेर शहरात अनेक दुकानांमध्ये हवाला रक्कम ट्रान्जेक्शन फार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे बोलले जाते. ही सर्व बाब वर्दीला माहित नाही असे काही नाही. मात्र, झाकली मुठ सव्वा लाखाची या म्हणीप्रमाणे हाताची घडी तोंडवर बोट.! आता मात्र अचारसंहीतेत ही रक्कम सापडल्याने संगमनेरात खळबळ उडाली आहे.