थोरात विरुद्ध विखे, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना तरी गणित बसेना.! प्रबळ उमेदवार द्या तर रंगत, नाहीतर निव्वळ हासू होईल.! संगमनेराती वास्तव राजकारण.!


- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :- 
                महाराष्ट्रातील विधानसभेचे बिगुल वाजले आहेत. काही ठिकाणी उमेदवाऱ्या जाहिर झाल्या आहेत तर काही ठिकाणी बाकी आहेत. अशात संगमनेर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी कोणाला असा प्रश्न राजकीय वर्तुळात सर्वांना पडला आहे. डॉ. सुजय विखे यांनी दंड थोपटले आहेत. मात्र, हा मतदारसंघ भाजपला, शिवसेना शिंदे गटाला की राष्ट्रवादी अजित पवार गटाला हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे. अद्याप उमेदवार जरी गुलदस्त्यात असला तरी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सद्या सोशल मिडीयावरून विखे-थोरात गटात एकमेकावर चिखलफेक सुरू झाली आहे. कधी थोरातांच्या कारखान्याला लागणारी 7 एकर जमीन घोटाळा दाखवला जातो तर कधी पाण्याच्या पूजेला गेल्यावर भाऊंना धक्का दिल्याचे दाखवले जाते. याउलट विखेंच्या कारखाण्यात 191 कोटींचा घोटाळा तर कधी आठवडे बाजारात पाणी घुसताना दाखवुन "सुजय पर्व"असे गाणे वाजवले जाते. यात एक मात्र खरे, निवडणुकीचे आणि उमेदवारीचे काहीही होवोत, या दोघांच्या सोशल मिडीयाच्या वादात मात्र यांनी केलेला विकास आणि घोटाळे दोन्ही चव्हाट्यावर येताना दिसत आहे. हे प्रस्तापित आज ना उद्या गोड होतील, कार्यकर्ते एकमेकांच्या जिवावर उठले नाही म्हणजे देव पावला..!!!
           
खरंतर, डॉ. सुजय विखे पाटील हे संगमनेर मतदारसंघासाठी इच्छुक असल्याने ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. त्यांनी जिल्ह्यातुन फक्त संगमनेर या मतदारसंघावर दावा केल्याने डॉ. सुजय विखें यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार संगमनेर मतदारसंघात भाजपला देखील मिळणार नाही हे देखील तितकेच खरे आहे. या तालुक्यातील अनेक गावांवर विखे पाटील कुटुंबाचे वर्चस्व आहे. विखें पा. हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी 500 कोटींपेक्षा जास्त निधी संगमनेर मध्ये वाटला. आ. थोरात समर्थक असणारे अनेक सरपंच गावातील पुढारी हे निधीसाठी तर कधी वैयक्तीक कामे घेऊन विखें पाटील यांच्याकडे गेल्याने ते देखील संपर्कात आहे. जरी डॉ. सुजय विखें याना उमेदवारी मिळाली नाही तरी भाजपचाच उमेदवार येथे आ. थोरात याना काटे की टक्कर देऊ शकतो असे अनेकांना वाटते. कारण, गेली पाच वर्षात विखें पाटील यांनी संगमनेरात भाजपचे पायमुळे घट्ट रोवली आहे. वयोश्री योजना, महिला बचतगटांना साहित्य वाटप, बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तु, जनता दरबार ठेऊन जनतेच्या प्रश्न हताळले. त्यामुळे, भाजपकडून डॉ. सुजय विखें पाटील, अमोल खताळ, राजेंद्र राहणे आणि एका बड्या उद्योजकाचे नाव ऐनवेळी समोर येऊ शकते. अमोल खताळ याना विखें पाटील यांचा वरदहस्त असल्याने त्यांनी आ. थोरात यांच्या समर्थक असणाऱ्या बड्या-बड्या नेत्यावर कारवाई केली. दंड ठोठावले, कारवाई करण्यास भाग पाडले. संजय गांधीच्या माध्यमातून तालुका पिंजून लोकांचे प्रश्न प्रशासनाकडुन सोडवले. त्यामुळे, डॉ. सुजय विखें यांच्यानंतर अमोल खताळ यांचे नाव जोर धरू लागले आहे. तर राजेंद्र राहणे हे अधिकारी असुन त्यांची नाळ अद्याप सर्वसमन्यांशी जुळलेली नाही. अनेक जणांनी त्यांना अद्याप पाहिलेले नाही. त्यामुळे, ते ऐनवेळी उमेदवारी करत असेल तर भाजप मधुनच त्यांना विरोध होऊ शकतो.
            दरम्यान, संगमनेर विधानसभा कोणाच्या पारड्यात जाते यावर विधानसभेचे सर्व गणित अवलंबून आहे. कारण, शिवसेना शिंदे गटाला हा मतदारसंघ सोडला तर एकतर्फी लढत होईल. कारण, लोकसभेला खा. सदाशिव लोखंडे यांना कोपरगाव, शिर्डी, नेवासा येथुन आघाडी होती. मात्र, संगमनेरात ते पिछाडीवर पडले आणि लोकसभेला पराभूत झाले. त्यामुळे, येथे शिंदे गटाची किंचितही ताकद नाही. त्यांचे आपापसातील वाद वारंवार होऊन अनेक वेळेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. ऐनवेळी पदाधिकारी बदलले, त्यांच्याकडे विधानसभेच्या रेसमध्ये चेहरा नाही. लोखंडे यांच्यासारखे आयात उमेदवार करून येथे त्याचे कार्ड चालणार नाही. या मतदारसंघात पक्ष निरीक्षक पाठवून चाचपणी केली नसल्याचे देखील बोले जाते. त्यामुळे, या मतदारसंघात शिंदे शिवसेना गटाचा उमेदवार कोण? असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो.
             दरम्यान, याउलट परिस्थिती आहे ती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची. बुथ कमिटी नाही पक्षाचा तालुका अध्यक्ष कोण? शहर अध्यक्ष कोण? हाच प्रश्न संगमनेरकरांना पडला आहे. पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार हे फक्त कागदावर आणि नामधारी आहे. त्यांच्या तालुका अध्यक्षाला 2014 साली फक्त अडीच हजारांच्या आसपास मतदान मिळाले होते. त्यामुळे, राष्ट्रवादी अजित पवार गट येथे उमेदवार उभा करून आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नाही हे देखील तितकेच खरे आहे. जुनी राष्ट्रवादीतील पदाधिकारी हे भाजपा पक्षात दिसत असल्याने येथील राष्ट्रवादी ही विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट हा मजबुत आहे. ते कोपरगाव, पारनेर, अकोले, नगर येथे ताकद लावतील संगमनेर मतदारसंघावर ते दावा करून हसु करून घेणार नाही असे राजकीय जाणकारांना वाटते. एकंदर येणाऱ्या काही दिवसात आता चित्र क्लेअर होणार आहे. मात्र, बाळासाहेब थोरात यांना टक्कर देण्यासाठी प्रबळ उमेदवार असेल तर निवडणुकीत रंग भरणार आहे. अन्यथा अपवाद वगळता यापुर्वी सारख्या एकअंगी निवडणुका पहायला मिळू शकतात. यात सर्वात महत्वाचे म्हणजे यात भाजपा आणि विशेष म्हणजे विखे पाटील किती रस घेतात की येरे माझ्या मागल्या हिच भुमिका बजावतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.