संगमनेरचे विरोधक म्हणजे एकात एक नाही अन बापात लेक नाही, आ. थोरात त्यांना टपली मारुन बाजुला सारतात.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली. तेव्हापासुन डॉ. सुजय विखे पाटील यांनी ह्या मतदारसंघाचे लक्ष वेधले. ज्या निलेश लंकेनी त्यांचा पराभव केला त्यांना इतका विरोध नसावा तितका विरोध आ. थोरात याना केला. कारण, राहत्यात जाऊन गणेश कारखाना ताब्यात घेतला. शिर्डी संस्थांची सोसायटी ताब्यात घेतली. त्यानंतर, ज्या राहता नगरपालिकेवर नगराध्यक्षपद पिपाडा यांनी घेतले त्यांना मांडीला-मांडी लाऊन भाषणे ठोकली. इतकेच काय! नगर दक्षिण मध्ये आ. थोरात यांनी व्युहरचना आखुन सुजय विखे यांचा पराभव केला. त्यामुळे, आता पर्यंत आ. थोरातांचा राजकीय प्रवासाचा आलेख हा चढत्या क्रमाचा असुन विखे पाटील कुटुंबाचा राजकीय प्रवासाचा आलेख हा खाली येताना सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे, पराभवाची सल आ. थोराताना पराभूत करूनच करावी असा चंग विखें कुटुंबाने बांधला असला तरी आजतागायत त्यांचे प्रयत्न निष्फळ झाले आहे. मागील वेळेस पाण्याचा मुद्दा हाती घेऊन तळेगाव, साकुर पठारभागात टिका केली. मात्र, पाण्यानेच विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फिरून ६१ हजार ८५३ मतांनी आ. थोरतांना विजयी केले. तर युतीचा धर्म पाळून जिल्ह्यात १२-० करण्यासाठी पुढे आलेले विखें पाटलांची पीछेहाट झाल्याची संपूर्ण जिल्ह्याने पाहीले.
ज्या ज्या वेळी विखें पाटील यांनी संगमनेरात लक्ष घातले त्यावेळी त्यांच्या हाती काही लागले नाही. बाजार समितीमध्ये एकास-एक उमेदवार दिला होता. अठराच्या अठरा जागी आ. थोरात यांनी बाजी मारून विखे पाटील गटाला चारीमुंड्या चितपट केले होते. आ.थोरातांनी विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून अठरा जागेवर विजय मिळवुन भाजप पुरस्कृत पॅनलचा सुपडासाफ केला होता. सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विरोधकांनी नांगी टाकली. विरोधकांनी निवडणूक न लढवता सेटलमेंट करण्यास इच्छा दर्शवली व चर्चेतुन तडजोडी अंती एक तज्ञ संचालक घेण्यास आपले भाग्यच मानू लागले. विरोधकांनी कारखान्याची आपली विरोधाची तलवार म्यान करीत निवडणुक बिनविरोध सोडून दिली. आजपर्यंत एकही संचालक निवडून आला नाही, एक येतो तो पदरात पाडुन घेऊ असे विरोधकांनी ठरविले. त्यामुळे, विरोधकांनी आपले सहा अर्ज माघारी घेतले. त्यानंतर सौ.जयश्री शिंदे यांनी बैठकीत तज्ञ संचालक म्हणुन गुलाल उधळला. मात्र, सौ. जयश्री शिंदे यांना ते संचालक पद दिले नाही. त्यामुळे, आ. थोरात हे विरोधकांच्या डोक्यात अगदी सहज टपली मारून राजकारण करतात हेच वास्तव आहे. त्यामुळे, संगमनेरात विरोधकांना सहकारी साखर कारखाना निवडणूकीत साधा उमेदवार मिळाला का? नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. मागील वेळेस जिल्हा परिषदेला आ. विखे पाटील व आ. थोरात हे काँग्रेस मध्येच असताना दोघांचे जोर्वे गटातील तिकीटावरून वाद झाले. यामध्ये काँग्रेसचे चिन्ह विखें पाटील यांनी आणले. तेथे आ. थोरात यांनी अपक्ष उमेदवार उभे केले. तेथे देखील विखें पाटील गटाच्या उमेदवाराचा पराभव करून आ. थोरतांनी वर्चस्व राखले. त्यामुळे, संगमनेरातील विरोधकांना अनेक वेळेस विखे पाटील यांनी ताकत देऊन आजमावून पाहिले खरे. मात्र, हाती काही लागले नाही. येथील विरोधक म्हणजे एकात एक नाही आणि बापात लेक नाही अशीच गत वारंवार पाहायला मिळाली आहे.
२०१९ ला संगमनेर विधासभेला सर्व विरोधक एकत्र करण्याचा प्रयत्न आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. वारंवार बैठका घेतल्या डझनभर लोक निवडणुकीसाठी इच्छुक होते. शिवसेनेकडुन साहेबराव नवले यांना उमेदवारी मिळाली. आ. थोरात याना पाडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे,आ. राधाकृष्ण विखें पाटील, खा.सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखें यांनी कंबर कसली. मात्र, "सौ-शेर" एक "सव्वा-शेर" अशी परिस्थिती संगमनेरात दिसुन आली. आ. बाळासाहेब थोरात प्रचंड मतांनी विजयी झाले. त्यानंतर साहेबराव नवले जनतेत कधी दिसले नाही. त्यामुळे, प्रत्येक विधानसभेला चेहरा बदलतो पण, मत बदलत नाही हा इतिहास १९८५ पासुन सुरूच आहे. आजपर्यंत एकाही उमेदवाराला जनतेने स्वीकारले नाही. कारण, निवडणुक आली की फक्त वलग्ना करतात. त्यानंतर बुळगा विरोध पाहायला मिळतो.
खरंतर, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संगमनेरातीलच होते. त्यांना देखील इथे लक्ष घालण्याचे स्वारस्य वाटले नाही. दिल्लीतले भाजप कार्यकर्ते कौतुक करत बसले.पण, गल्लीतल्या भाजपची वाताहत होत आहे. सगळीकडे परिवर्तन होत होते. मोठं मोठ्या शहरात भाजपचा झेंडा फडकत होता तर सर्वत्र महायुतीची ताकत वाढत असताना संगमनेरात विरोधकांची ताकत पाहायला मिळाली नाही. केवळ एक नगरसेवक, एक पंचायत समिती सदस्य येथे भाजपचा पाहायला मिळाला. त्यामुळे, निवडणुक आली की बैठका घेतात, मोर्चे बांधणी करतात, हरवण्याची भाषा करतात. निव्वळ वलग्ना करून फडफड करतात. त्यामुळे, वास्तव सांगायचे ठरले तर संगमनेर मधील विरोधकांची अवस्था म्हणजे "दोनहाना, पण पुढारी म्हणा" अशीच झाली आहे.