पिचड, मेंगाळ, लहामटे, तळपाडे चौघांनी गद्दारी पत्करली.! बंडखोरी करुन आखाड्यात.! आमदार झाल्यासारख वाटतंय, पण होणार नाही.!
सार्वभौम (अकोले)-
विधानसभा आली की प्रत्येकाला आमदार झाल्यासारखं वाटतय, त्यामुळे आपला पक्ष, आपला नेते, आपली निष्ठा, आपली जनता, आपला विकास, आपली विचार धारा, आपले पुरोगामित्व सगळं धाब्यावर बसविले जाते. काही झालं तरी चालेल. पण, उमेदवारी करायची, निवडणुक लढवायची असा चंग उमेदवार बांधतात. तसेच अकोले तालुक्यात पहायला मिळत आहे. मा. आ. वैभव पिचड हे २०१९ मध्ये भाजपमध्ये गेले होते. २०२४ ला तिकीट मिळाले नाही. आता बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली आहे. मारुती मेंगाळ हे शिवसेनेत होते असे म्हणतात, त्यांचा पक्ष निच्छित नाही. कारण, ते जेथे गेले तेथे त्यांनी सत्तेसाठी सगळ्यांना कोलुन दिले हे आपण पंचायत समितीत पाहिले आहे. मात्र, ते स्वत:ला शिवसैनिक म्हणत होते. त्यांनी देखील बंडखोरी करुन निवडणुक रिंगण आखले आहे. डॉ. किरण लहामटे यांनी कधी अजित दादा तर कधी शरद पवार आणि शरद पवार ते आजित दादा असा प्रवास सर्वश्रुत आहे. त्यामुळे, लोक त्यांना त्यांच्याच व्यासपिठाहून गद्दार म्हणतात, तर मधुकर तळपाडे यांनी देखील शिवसेनेशी गद्दारी केली असून महाविकास आघाडी धर्म पाळला नाही. त्यामुळे, चारही उमेदवारांनी गद्दारीचे निशाण हाती घेऊन बंडखोरी केल्याचे पहायला मिळत आहे. आज यांना आमदार झाल्यासारखे वाटत आहे. मात्र, निकालानंतर जनता ठरवणार आहे. की, खरा आमदार कोण.!!
अकोले तालुक्याने आदरणीय मधुकर पिचड साहेबांवर भरभरुन प्रेम केले आहे आणि आज देखील तालुका प्रेम करतो आहे. मात्र, २०१९ मध्ये वैभव पिचड यांनी जो निर्णय घेतला त्यानंतर तालुक्याचे सामाजिक वातावरण बिघडून गेले. २०२४ मध्ये अगदी तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी केली, अन्यथा त्यांनी पक्ष सोडला नसता. त्यामुळे, भाजपाने त्यांच्याशी गद्दारी केली की त्यांनी भाजपाशी गद्दारी केली. हा उद्याच्या संशोधनाचा भाग असू शकतो. पण काही झाले तरी त्यांनी युती धर्म पाळला नाही त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी निच्छित आहे. त्यांची बंडखोरी आता कोणाच्या पथ्यावर पडतो हे येणारा काळच ठरवू शकतो. मात्र, अकोेल तालुक्यासारख्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी आणि ती विजयापर्यंत नेणे हे अशक्य गोेष्ठ आहे. यात एक मात्र निच्छित.! पिचड साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत. ते निवडणुकीत रंगत आणणार आणि कोणाचातरी काटा करणार...
मारुती मेंगाळ हा तरुण नेता कायम तालुक्याच्या पटलावर चर्चेत राहीला आहे. विशेषत: पंचायत समिती आणि शिवसेनेशी गद्दारी, त्यानंतर डॉ. अजित नवले आणि मेंगाळ यांच्यातील शितयुद्ध, त्यानंतर सबंध ठाकर समाजाचे नेतृत्व करुन ९ ऑगस्ट हा आदिवासी दिन. अशा नाना प्रकारात चर्चेत असणारे मेंगाळ शरद पवार यांच्याकडून तिकीट मिळावा म्हणून खा. निलेश लंके यांच्यासह अनेक आमदारांच्या कार्यालयाच्या पायर्या झिजवत होता. मात्र झालं काय? सगळ्यांनी तोंडाला पानं पुसली. त्यानंतर असे वाटत होते. की, मेंगाळ हे भांगरे यांना सपोर्ट करतील. मात्र, तसे देखील झाले नाही. त्यांनी पुन्हा गद्दारीचा शिक्का स्वत:च्या माथी मारुन घेतला. आता केवळ ठाकर समाज म्हणून निवडून येणे अशक्य आहे. सर्व ठाकर समाज त्याच्या पाठीशी उभा नाही. त्यामुळे, ठाकर समाजाची मते मेंगाळ यांना पडणार म्हणजे ती गोठणार आहेत. त्याचा तोटा कोणाला होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
साहेब तुमच्यावर गद्दारीचा शिक्का आहे.! हे वाक्य कानावर पडले की पुणे येथील डॉ. लहामटे यांची बैठक आठवते. अर्थात साहेबांना राग आल्याचे पहायला मिळाले. मात्र, ती खर्या अर्थाने जनतेची प्रतिक्रिया आहे. अन जनता तुमच्यासाठी मायबाप असेल तर त्यांच्यावर रागविण्याचे पाप तुम्ही करु नये हे साधे आणि सरळ सामाजिक लॉजिक आहे. ज्या मायबाप जनतेने २०१९ ची गद्दारी सहन झाली नाही म्हणून तुम्हाला १ लाख १३ हजार ४१४ मतांनी निवडून दिले होते त्यांच्या भावनांचा तुम्ही २०२२ मध्ये काय आदर राखला? म्हणजे जालिंदर वाकचौरे नगरपंचायतीच्या निवडणुकीत म्हणाले होते. हौसाने केला पती अन त्याला झाली रगतपिती. यापेक्षा आमदारांच्या प्रती जनतेच्या मनातील भावना काही वेगळ्या नाहीत.
एक शहाणा सुरता माणूस आयपीएस अधिकारी राजकारणात येतो आणि समाज बदलु पाहतो. मात्र, दुर्दैवाने दोन वेळा पराभव झाला आणि त्यांनी थेट मुंबई गाठली. साहेब.! जनतेशी नाळ जुळायला फार वेळ लागतो. काल रोप उपटून आणले आणि आज लावले तरी ते मातीशी एकजीव होत नाही. मग तुम्ही आले, निवडणुक केली आणि निघून गेले. हे अकोले तालुक्यातील जनता कधीच स्विकारु शकत नाही. अन्यथा मधुकर तळपाडे साहेब कधीच आमदार झाले असते. त्यांनी यंदा मात्र शिवसेनेची शिट्टी वाजविली आहे. तसे तळपाडे साहेब गेल्या चार दोन वर्षापासून चांगले सक्रिय आहेत. त्यांनी शरद पवार यांच्याकडे जाऊन उमेदवारी मागितली होती. महाविकास आघाडीकडून मुलाखत देखील दिली होती. मात्र, बस्तान बसले नाही. आता अपक्ष उमेवार म्हणून ते किती मते घेतील हे त्यांनी चांगले माहित आहे. कारण, ते आयपीएस अधिकारी आहेत. मात्र, कधी नव्हे असा सक्षम उमेदवार आज त्यांच्यावर बंडखोरीची वेळ आली आहे. पण, बंडखोरी ही त्यांच्यासाठी फारशी अनुकूल नसल्याचे बोलले जात आहे.
अमित भांगरेंवर गद्दारीचा शिक्का नाही.!
स्व. अशोकराव भांगरे यांनी आदरणीय मधुकर पिचड साहेबांना विरोध म्हणून अनेक वेळा निवडणुका लढविल्या. मात्र, ती परंपरा अमित भांगरे यांनी चालविली नाही. २०२२ मध्ये जेव्हा अजित दादा हे शरद पवारांचा पक्ष घेऊन पळाले. तेव्हा नेत्यांनी कोणासोबत जायचे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा खुद्द भांगरे कुटुंबाने सांगितले होते, डॉ. लहामटे शरद पवारांसोबत थांबले तरी आम्ही पवार साहेबांसोबत राहू आणि नाही थांबले तरी पवार साहेबांसोबतच राहू, त्यामुळे, त्यांची मनस्थिती दोलायमान झाली नाही. मात्र, याच काळात डॉ. लहामटे यांनी दोन कोलांटउड्या खाल्ल्या. त्यामुळे, स्व. यशवंतराव भांगरे यांच्या पुण्यास्मरणाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठाहून पवार साहेबांच्या पायाशी नतमस्तक झालेले अमित भांगरे महारष्ट्राच्या राजकारणात विपक्ष परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा देखील स्थिरस्थावर होते. त्यामुळे, त्यांच्यावर अद्याप गद्दारीचा शिक्का पडलेला नाही.
पथवेंचा ट्रामपेट आणि भांगरेंची तुतारी
शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे हे आहेत. त्यांचे निवणुक चिन्ह तुतारी वाजविणारा पुरुष असे आहे. तर, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पांडुरंग पथवे यांचे चिन्ह आहे ट्रामपेट, त्यामुळे ही अमित भांगरे यांची डोकेदुखी ठरू शकते. कारण, सातारा येथील लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे आणि संजय गाडे यांच्यात लढत झाली. यात गाडे यांच्या ट्राम्पेटला ३५ हजार ३११ मते मिळाली होती. तर या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या ३ हजार २३५ मतांनी पराभव झाला होता. येथील कारण होते ते म्हणजे तुतारी आणि ट्राम्पेट हे सेम दिसणारे चिन्ह. त्यामुळे, अमित भांगरे यांना पांडुरंग पथवे यांची पुंगी त्रासदायक ठरु शकते.