अगस्ति कारखान्यात आता आणखी दोन हार्वेस्टर, अकोल्याच्या तरुणांचे क्रांतीकारी पाऊल.! २०० मजुरांचे काम एकटे मशिन करणार.!
सार्वभौम विशेष :-
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मजूर मिळत नाहीत. तरी देखील अगस्ति सहकारी साखर कारखान्यात आजवर हजारांपेक्षा जास्त कामगार येतात आणि चार लाख टन ऊस तोडणी करुन गळीत हंगाम पार पाडतात. ही कसरत सिताराम पा. गायकर यांची असली. तरी, दिवसेंदिवस मजुरांची संख्या कमी होत चालली आहे. तरुण पिढी ऊस तोडणीपेक्षा कंपनीत नोकरी किंवा अभ्यास करुन वेगळी स्वप्न पाहु लागली आहेत. त्यामुळे, मनुष्यबळ कमी झाल्याने ऊसतोडीचा प्रश्न प्रत्येक गळीत हंगामाला निर्माण होत आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यातील चार तरुणांनी मिळून दोन हार्वेस्टर मशिन घेतले आहेत. त्याची प्रत्येकी किंमत ही दिड कोटी आहे. हे मशिन प्रतिदिन २५० ते ३०० टन ऊस तोडते. यात कारखान्याचा आर्थिक सहभाग नसला तरी त्यामुळे, अगस्ति कारखान्याला फार मोठे सहकार्य होणार आहे. कारखान्याने यंदा चार हार्वेस्टर मशिन सांगितले असून ते शक्यतो गेटकेनसाठी वापरण्यात येणार आहे. नंतर कार्यक्षेत्रात वापरण्यात येणार असल्याची माहिती एमडी सुधीर कापडणीस यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने फार मोठा आहे. त्यात अकोले हा सर्वात मोठा आणि दुर्गम तालुका आहे. येथे डोंगर दरी, सह्याद्रीची पर्वतरांग आणि वातावरण यामुळे ऊस उत्पादन कमी होते. जमिनींचे विभाजन, नापिक शेती आणि भाजीपाला यामुळे ऊसाला अधिक फटका बसला आहे. तरी देखील दोन ते अडिच लाख टन ऊस कार्यक्षेत्रात असतो. अर्थात ही गोळाबेरीज कारखान्याच्या नफ्याला परवडणारी नाही. तरी देखील गेटकेनच्या भरोशावर कारखाना तग धरून आहे. कारखाना टिकला पाहिजे असे म्हणणारे शंभरजण असेल तर त्यात ऊस लागवड करणारे अवघे दहा शेतकरी आहेत. तर काही जाणिवपुर्वक बाहेर ऊस देतात. कधी राजकारण आडवे येते, तर कधी कारखाना बंद पडणार अशा प्रकारची टिमकी वाजविणार्यांमुळे शेतकरी दोलायमान होतात. परिणामी त्याचा कळत नकळत कारखान्याला तोटा होत आहे. अशात संचालक मंडळ मात्र कसोशीने प्रयत्न करीत आहे. कधी स्वत:वर कर्ज काढणे तर कधी कर्जासाठी बँकेंच्या पायर्या झिजविणे. इतक्या संघर्षात देखील कारखाना ताठ मानेने उभा आहे.
अर्थात अगस्ति महाराजांच्या कृपेने सिताराम पा. गायकर साहेब यांच्यासारखा धडपड करणारा व्यक्ती तेथे आहे. तोवर या भाग्यलक्ष्मीचा आवाज कधीच बंद होणार नाही अशी शेतकर्यांची धारणा आहे. त्यास आता एक एक चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहे. दिर्घमुदतीच्या कर्जाचा संघर्ष संपल्यानंतर आता अकोले तालुक्यातील बबलु नवले (नवलेवाडी) पप्पू भालेराव (अकोले) या दोन तरुणांनी दिड कोटींचे हार्वेस्टर मशिन घेतले आहे. तर देवठाण येथील पप्पू हासे व संदिप बोडके यांनी देखील हेच हार्वेस्टर मशिन घेतले आहे. नविन तरुण पिढी ऊस तोडणीसाठी येत नाहीत. त्यामुळे, मजूर मिळणे अवघड झाले आहे. अशात हे हार्वेस्टर मशिन कारखान्यांसाठी एक वरदान ठरले आहे. हे मशिन एक दिवसात ५ ते ६ एकर ऊस तोडू शकते. त्यामुळे, मनुष्यबळ कमी आणि त्याची जागा हार्वेस्टर घेणार आहे.
हार्वेस्टरने काय होणार आहे.!
ऊस तोडणारे हार्वेस्टर हे १ दिवसात ३०० टन ऊस सरासरी तोडते. ताशी १० टन अशा पद्धतीने ऊसतोडणी होते. १ टन ऊस तोडण्यासाठी फक्त दोन ते तीन लिटर डिझेल लागते. १ दिवसात ५ ते ६ एकर ऊसतोडणी हार्वेस्टर करु शकते. १ मजुरांच्या टोळीत ८ ते ९ खटारगाड्या असतात त्या १५ टन ऊस तोडतात. हे एक हार्वेस्टर १८ ते २० टोळ्यांचे काम एकटे करते. माणसापेक्षा १८ पटीने जास्त काम हे करते. कारखान्यात गेटकेनसह अन्य ९० टोळ्या कारखान्यात लागत होत्या. मात्र, यंदा त्या कमी होणार आहेत. तर बाहेरचे दोन आणि तालुक्यातील दोन असे चार हार्वेस्टर झाल्याने रोज ५०० ते ६०० पेक्षा जास्त टन ऊस कारखान्यात येणार आहे.
शुगरकेन हार्वेस्टर कसे काम करते.!
शुगरकेन हार्वेस्टर जेव्हा शेतात जाते, तेव्हा जो खाली पडलेला ऊस आहे. तो उभा करते तो कट करुन थेट ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत टाकला जातो. या ट्रॉलीत किमान चार टन ऊस बसतो. एरव्ही ऊसाचे वाढे मजूर घेऊन जातात. पण, हार्वेस्टर पाचट आणि वाढे यांचा चुरा करून शेतात पसरुन देते. त्यामुळे, शेतात जैविक खत तयार होते. यासाठी शेतकर्यांना साडेचार किंवा पाच फुटाची सरीमध्ये लागवड करावी लागते. जेव्हा मजूर ऊसतोड करतात तेव्हा बर्यापैकी ऊस वरतून काटतात. त्यामुळे, शेतकर्यांचे नुकसान होते. मात्र, हार्वेस्टर हे तळापासून व्यवस्थित ऊस काटते. त्यामुळे, शेतकर्यांचे नुकसान होत नाही. शुगरची रिकव्हरी याने चांगली होते. शेतकर्यांना वाढे पाहिजे असल्यास ते देखील काढता येतात. निघालेला ऊस लगेच ट्रॉलीत आणि थेट कारखान्यात असे फक्त चार-दोन माणसे यासाठी लागतात.
गेटकेनसाठी हार्वेस्टर महत्वाचे.!
अहिल्यानगर जिल्ह्यात सद्यस्थितीत १८० हार्वेस्टर आहेत. मात्र, कोणत्याही कारखान्याचे वैयक्तीक नाही. शेतकर्यांनी घेऊन कारखान्यांसोबत करार केलेला आहे. अकोले तालुक्यात मात्र एकही हार्वेस्टर नव्हते. आता दोन झाले आहेत. यापुर्वी विरगाव, कळस, आगार गटात हार्वेस्टरचा प्रयोग केला होता. पण, हार्वेस्टर मालकांनी दुसर्या कारखान्यांकडे जाणे पसंत केले. आता आपल्याकडे कन्नड, नेवासा, अकोले आणि देवठाण येथील असे चार हार्वेस्टर आहेत. आपण नेवासा, गंगापूर, राहुरी, वैजापूर, निफाड आणि नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून गेटकेनाचा ऊस आणणार आहोत. येथे मोठमोठे क्षेत्र असल्याने या हार्वेस्टरचा वापर आपल्याला करता येणार आहे. यामुळे ९० टोळ्या आपल्या गेटकेनमध्ये चालतात त्यातील अगदी थोड्याच लागू शकतात असे मत कारखान्याचे संचालक विकासराव शेेेटे पा. यांनी व्यक्त केले.
अकोल्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडू देऊ नये.
अगस्ति कारखान्याची फार वाईट आवस्था असताना देखील अगस्ति महाराजांच्या कृपेने आजवर राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील सर्वांनी फार मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळे, कडू काळात देखील कारखाना चालु राहिला. आता एनसीडीसीच्या मार्फत जे काही दिर्घमुदतीचे कर्ज मिळाले आहे, त्याने फार मदत झाली आहे. कारखाना चालविताना मनुष्यबळ हा फार मोठा घटक आहे. गेल्या काही दिवसांपासून तथा निवडणुकीच्या काळात कारखान्याची फार मोठी बदनामी झाली. त्यामुळे, मजूर मिळणे कठीण झाले होते. आता आपल्या तालुक्यातील तरुणांनी हे हार्वेस्टर घेऊन आमचे काम सोपे केले आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे. की, आपल्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड करा. जेव्हा गेटकेन कमी होऊन कार्यक्षेत्रात ऊस वाढेल ती खर्या अर्थाने अगस्तिला नवसंजिवणी ठरेल. म्हणून आपली भाग्यलक्ष्मी म्हणजे अकोले तालुक्यातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो आपण मोडू देऊ नये.
- सिताराम पा. गायकर साहेब
चेअरमन - अगस्ति सह. सा. कारखाना