आ. थोरात विरुद्ध विखे पा. हा जुमला की थेट हमला.! झालीच लढाई तर काय होईल, भाजपा थोरातांना धार्जीन फक्त विखेंचे व्यक्तीवैर.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा दक्षिण नगरला पराभव झाल्यानंतर त्याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी संगमनेर मतदारसंघात आपले रणशिंगण फुंकले आहे. संगमनेर मतदारसंघातुन भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. जो दक्षिण नगरला पराभव झाला त्याची सल आज ही मनात असावी. त्यामुळे, नगरजिल्ह्यातील कुठल्याही विधानसभेवर दावा न करता फक्त संगमनेर विधानसभा लक्ष केले आणि पक्षाची मजबुत बांधणी सुरू केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मतदारसंघात बारकाईने लक्ष घातले आहे. मोठ्या ग्रामपंचायत ताब्यात घेऊन ५०० कोटींचा निधी देऊन पक्षातील कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ देण्याचा प्रयत्न करून हा मतदारसंघ आता चुरशीचा केला आहे. मात्र, आ.थोरात यांना पराभूत करणे इतके सोपे नाही. कारण, गेली आठ पंचवार्षिक त्यांना पराभव करणारा उमेदवार तर सोडा साधी टक्कर देणारा नेता देखील तयार झाला नाही. त्यामुळे, आजवर आ.बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे पाटील यांचे पडद्यामागचे राजकारण आता खऱ्या पडद्यावर पहायला मिळणार का? थोरात विरुद्ध विखे अशी समोरासमोर लढत होणार का? की फक्त निव्वळ चर्चेला उधाण येऊन ही दोघे पुन्हा आपली डाळ शिजवणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
खरंतर, नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत आ. बाळासाहेब थोरात यांनी दक्षिणेत तळ ठोकले आणि खा. निलेश लंके यांना विजयी केले. या विजयी सभेत आ. थोरात यांनी विखे पाटलांवर जहरी टिका केली. ते म्हणाले होते की, या विजय नंतर आता थांबणार नाही. दुःखणं दुर करायचं असेल तर ऑपरेशन पुर्ण करावं लागेल. या पुढे विधानसभेसाठी शिर्डीला आमचा उमेदवार तयार आहे. जिल्ह्यातील पुढाऱ्यांना आव्हान केले की पक्ष कुठला ही असला तरी चालेल एकत्र या आणि ही राजकारणातील "किड" काढुन टाका अशी टिका आ. थोरात यांनी विखे पाटलांवर केली. त्यानंतर, ना. विखे पाटील हे शांत बसतील का? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यानंतर विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात अगदी बारकाईने लक्ष घातले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ कानामागे टाकले. मात्र, संगमनेर लक्ष केले. संगमनेरातील भाजप कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ दिले. प्रशासकीय स्तरावरील सर्व कामे ना. विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात बसुन प्रशासनला समोर घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवले. शासकीय लाभ मिळवून दिल्यानंतर भलेभले कार्यक्रम विखे यांनी संगमनेरात घेतले. त्याला गर्दी देखील तितकीच झाल्याचे सर्वांनी पाहिले आहे.
दरम्यान, राहता मतदारसंघाला जोडली जाणारी २६ गावे सोडुन देखील आ. थोरात यांचे वर्षानुवर्षे वर्चस्व असणाऱ्या गावांवर ना. विखे पाटलांनी पकड केली आहे. निमोण, तळेगाव, निळवंडे, मालुंजे, सोनेवाडी, डीग्रस, वडगावपान, सोनोशी, कासारे, मिरपुर, कौठे कमळेश्वर, कौठे धांदरफळ, हिवरगाव पावसा, सावर चोळ, जवळेबाळेश्वर, घारगाव, खांबे, सावरगाव घुले, कर्जुले पठार या गावांमध्ये साधा उमेदवार मिळत नव्हता ती गावे आता विखे पाटील यांच्या ताब्यात आहे. गावागावात विखे पाटलांचा पॅनल उभा होताना दिसत आहे. याच तालुक्यात ना. विखे पाटील यांनी ५०० कोटींचा निधी देऊन आपले राजकीय पाय घट्ट रोवले आहे. गावांना जोडल्या जाणाऱ्या पुलापासुन ते वाडी वस्तीवरील रस्ते, छोटे-छोटे बंधारे, महिला बचतगटांना गावा-गावात लाखो रुपयांचे वस्तु वाटप केली. पालकमंत्री असल्याने जिल्हा नियोजनाचा निधी दिला. वयोश्री योजनेचा हजारो वयस्कर नागरिकांना लाभ दिला. संगमनेर तालुक्यात जनता दरबार ठेऊन जनतेचे प्रश्न सोडवले. त्यामुळे, खुद्द डॉ. सुजय विखे पाटील हेच उमेदवार दिले तर कडवी झुंज संगमनेरात नक्की पाहायला मिळेल. नाहीतर संगमनेरातील विरोधक म्हणजे कोणतं वासरू कोणत्या गाईला पितय तेच समजायला तयार नाही. त्यामुळे, कालच ना. विखे पाटील यांनी गोपनीय बैठक बोलवली आहे. यातुन ते पुढील व्युव्हरचना आखतील असे वाटते आहे.
भाजपा वरिष्ठांची चुपी
आजतागायत संगमनेरच्या विधानसभा मतदारसंघावर वरिष्ठ भाजपने मौन बाळगले आहे. आ. थोरात यांच्या विरोधात विखे पाटील वगळता साधा "ब्र" शब्द देखील वरिष्ठ भाजपाने काढलेला पाहायला मिळाला नाही. उलटं चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी आ.थोरातांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे. तर नाशिक पदवीधरला भाजपने आ. सत्यजीत तांबे यांना निवडणुकीत अप्रत्यक्ष मदत केली. त्यानंतर आ. सत्यजीत तांबे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्ताचे ट्विट अगदी बोलके होते. मागील पाच वर्षात चाणक्य समजल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना संगमनेरात साधे डोकुन देखील पाहायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे, वरिष्ठ भाजपची संगमनेर तालुक्यात मिलीभगत असल्याचे नेहमी बोले जाते. त्यामुळे, यावेळी संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजप डॉ. सुजय विखे पाटील यांचा विचार करील का? यावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. युतीच्या पक्षाच्या वाटाघाटीत ही जागा दुसऱ्या पक्षाला बहाल करून आ. थोरात यांना अगदी सोपी निवडणुक करणार हे येत्या काही दिवसातच कळेल. मात्र, यावेळी गुजरात वरुन पक्षनिरीक्षक पाठवुन त्यांनी संगमनेरात तळ ठोकला आहे. भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा यांच्याकडून ही व्युहरचना आखली जात आहे अशी चर्चा होत आहे. परंतु ती किती यशस्वी होईल हा येणारा काळच ठरवेल.