कुत्र्याहून वाद झाला त्यात ASI ने नऊ हजारांची लाच मागितली, पोलीस अधिकारी गजाआड, गुन्हा दाखल.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर): अदखल पात्र गुन्ह्यात नऊ हजार रुपयांची लाच घेताना आश्वि पोलीस ठाण्यातील पोलीस सहाय्यक फौजदार रविंद्र भानुदास भाग्यवान यास नगरच्या लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपधीक्षक अजित त्रिपुटे यांनी शनिवार दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी केली. याप्रकरणी भाग्यवान यास अटक करण्यात आली असुन त्याच्यावर आश्वि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचखोर भाग्यवान यांची संपत्ती, बँक खाते, घरझडती यासाठी पुढील प्रक्रीया सुरू केली आहे. तर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी तहसील कार्यलयातील लाचखोर लिपीकास चार वर्षांची शिक्षा लागली तरी देखील संगमनेरात लाच घेण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निमगाव जाळी येथे कुत्रे शेतात येते. त्यामुळे, शेताचे मोठे नुकसान होते. यावरून दोन कुटुंबात वाद झाले. किरकोळ वादाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात झाल्याने एकमेकांना दमबाजी करण्यात आली. त्यावरून एका संतप्त कुटुंबाने आश्वि पोलीस ठाणे गाठले. तेथे आपली कैफीयत संगीतली. त्यावरून आश्वि पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला पोलीस भाग्यवान यांनी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मंग काय भाग्यवान यांनी आपले रंग दाखवण्यास सुरू केले. तुझ्यावर कारवाई करायची आहे असे सांगण्यात आले.
दरम्यान, अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपी कारवाई होणार म्हणुन घाबरून गेला. त्याने आपला चुलत भावाला या विषयाची कल्पना दिली. त्याने तहसीलदार येथील प्रतिबंधात्मक कारवाई होऊ नये म्हणुन लाचखोर भाग्यवान यांस आपापसात मिटवण्यासाठी पैश्याची मागणी केली. आता किरकोळ वाद त्यात पैसे कशासाठी द्यायचे? मात्र,पोलीस सहाय्यक फौजदार भाग्यवान हे ऐकतील ते कसले? त्यांनी अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपीकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. मात्र, हे अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपीच्या चुलत भावाला खटकले त्याने थेट नगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर नगरचे पथक संगमनेरात दाखल झाले.
दरम्यान, तक्रारदार त्यांच्या मतावर ठाम होते. त्यामुळे, नगर लाचलुचपत विभागाने थेट आश्वि पोलीस ठाण्यात सापळा रचला. लाचखोर भाग्यवान हे ठाणे अंमलदार असल्याने त्यांनी अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपीला पोलीस ठाण्याच्या बाहेर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बोलावले. त्यांनी या आरोपीकडुन हा नही करून नऊ हजार रुपये घेत असल्याचे लाचलुचपत विभागाकडे रंगेहात पकडले. आज रात्री उशीरा पर्यंत सखोल चौकशी सुरू होती. यात आणखी कोण आहेत का? यांनी यापूर्वी कोणाकडे अशी मागणीकेली आहे का? यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे. आशा प्रकारची पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे, बाबासाहेब कराड, रविंद्र निमसे पो. कॉ. दशरथ लाड यांनी ही दमदार कामगिरी केली.
दरम्यान, महाराष्ट्रात महसुल विभाग हा लाचखोरीत अव्वल स्थानी तर नगर जिल्ह्यात देखील प्रथम क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ पोलीस खाते येते. नगर आणि नाशिक लाचलुचपत विभागाची कारवाई तपासली तर सर्वात जास्त ट्रॅप हे संगमनेर तालुक्यात झाले आहे. त्यात देखील महसुल अव्वल आणि पोलीस खाते द्वितीय स्थानावर आहे. त्यामुळे, यावर काही उपायोजना होणार आहे की नाही? असा प्रश्न अनेकदा पडतो आहे. पुर्वी पोलीस खात्यात ट्रॅप झाला की त्या पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी कंट्रोल (नियंत्रण कक्ष) जमा होत होता. त्याकाळी लखमी गौतम सारखे खमके अधिकारी होते. दुर्दैवाने आजकाल तसे होताना दिसत नाही. मोठ्या अर्थपुर्ण तडजोडीतून खुर्ची मिळत असते. दिलेला बॅकलॉक उकळण्यासाठी अधिकारी पोलीस ठाण्यात असणाऱ्या कलेक्टरच्या मानगुटीवर बसतात. त्यामुळे, शुल्लक कामांसाठी आव्वा च्या सव्वा मागणी होते आणि अशा वेळी कधी कधी चोर सोडून सन्याशाला फाशी दिली जाते. ही कधी न ब्रेक होणारी चेन आहे. याची पाळंमुळं थेट मंत्रालयात जातात त्यामुळे झाकली मुठ सव्वा लाखाची. मात्र हा भ्रष्टाचार कोठेतरी थांबला पाहिजे असे मत सामान्य मानसांनी व्यक्त केले आहे.