शिक्षकाने विद्यार्थीनीची छेडछाड केली, पालकांनी दिला यथेच्छ चोप.! पैसा घ्या पण गुन्हा नका...
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील शेणीत परिसरात एका शिक्षकाने विद्यार्थीनीचे छेडछाड केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. जेव्हा हा प्रकार पीडित विद्यार्थीनीने पालकांना सांगितला तेव्हा पालकांनी मास्तर गेटमध्ये धरला आणि त्याला यथेच्छ चोप दिला. त्यानंतर गावगाड्यातील चोमडी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी शिक्षकांची बाजू घेऊन माफीनामा करुन गाव पातळीवर प्रश्न मिटविला. मात्र, पीडित मुलीचे पालक ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला, त्यांना आर्थिक अमिष दाखविण्यात आले. इतकेच काय.! उलट पीडित मुलीच्या पालकांच्या मनात भिती घालुन दिली, मिसगाईड करण्यात आले. आता गावगाड्यात रहायचे म्हणून पालक हतबल झाले आणि त्यांनी जड अंत:करणाने माघार घेतली. मात्र, या घटनेची चर्चा तालुक्यात मोठ्या चवीने चघळली जात आहे. तर, दुसरीकडे आदिवासी भागात अशा पद्धतीने पीडितांची तोंडे दाबली जात असतील तर येथील विद्यार्थी सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, एका शिक्षकाने काही विद्यार्थी रविवारी परिक्षेसाठी एका केंद्रावर नेले होते. ज्या मुलीची छेडछाड झाली त्या मुलीचे पेपर होता की नव्हता. मात्र तरी देखील ह्या महोदयांनी तिला सोबत नेल्याचे बोलले जाते. मुळात ती ज्या मैत्रीणीसोबत जाणार होती. ती देखील गेली नाही. तरी देखील पीडित मुलीस सोबत नेण्याचे कारण काय? त्यानंतर या शिक्षकाने संबंधित मुलीची संधी साधून छेडछाड केली आणि आपण धुतल्या तांदळासारखे असल्याचे दाखवून तो शांत राहिला.
दरम्यान, छेडछाड झाल्यानंतर पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. तिला शाळेत जा म्हटले तरी तर जात नव्हती. त्यामुळे तिच्या घरच्यांना थोडा संशय आला. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी तिला विश्वासात घेतले. तिच्याशी मैत्रीणीसारख्या गप्पा मारल्या. तेव्हा तिने घडलेला प्रकार कथन केला. शिक्षकाच्या असल्या कृतीमुळे पालकांना फार वाईट वाटले, त्यानंतर त्यांनी शिक्षकांना विचारणा केली. मात्र, त्याच्याकडून स्वत:चे समर्थन झाले. त्यानंतर मात्र, पालकांनी या महोदयास यथेच्छ चोप दिला.
दरम्यान, याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे म्हणून पालकांनी पुढचे पाऊल उचलले. मात्र, गावातील काही पुढारी एकत्र आले आणि त्यांनी पीडित मुलीच्या पालकांना विनंती केली. त्यांनी शिक्षकांच्या वतीने अर्थपुर्ण तडजोड करण्याची आमिष दाखविले. मात्र, आपल्या लेकरावर अन्याय झाला ही भावना त्यांना गप्प बसू देत नव्हती. पण, करणार काय.! गावगाड्यापुढे अन्याय गिळावा लागला. आम्ही पुढे सर्व मॅनेज केले आहे असे म्हटल्यावर सामान्य कुटुंबातील पीडित मुलीचे पालक करणार तरी काय? त्यांनी आर्थिक अमिष दाखविले असता पालक म्हणाले आम्हला काही नको, जे द्यायचे ते शाळेला द्या असे म्हणून शिक्षक महोदायांचा जाहिर माफीनामा झाला आणि छेडछाडीवर पडदा पडला.
दरम्यान, आदिवासी भागात विद्यार्थीनिंसोबत फार भयानक वागणूक केली जाते. मात्र, झाकली मुठ सव्वा लाखाची. करणार काय.! प्रशासन सहकार्य करणार नाही, गावपुढारी तिथवर पोहचू देणार नाही, अन्याय होऊन तो सहन करण्यापलिकडे पर्याय नसतो. मात्र, पालकांनी हे लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यांबाबत कोणतीही समस्या असेल तर पोलीस ठाण्यात त्याची दखल घेणे हे अनिवार्य असते. विशेष म्हणजे पीडित व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवले जाते. त्यामुळे, अशा घटनांना कोणी पाठीशी घालु नये आणि कोणी अन्याय सहन करुन घेऊ नये.
आश्रमशाळा तपासण्यासाठी शासनाने एक समिती नेमली होती. त्यात महिला पोलीस अधिकारी देखील होते. मात्र, या समितीच्या माध्यामातून एका देखील शाळेवर कारवाई झाली नाही. प्रकरणे अशीच दडपली गेली. आज पोलीस अधिक्षक राकेश ओला, सीईओ आशिष येरेकर किंवा जिल्हाधिकारी या घटनेची दखल घेणार आहे की नाही? की अशा प्रकारे शिक्षकांनी विद्यार्थीनिंची छेडछाड काढायची अन गाव पुढार्यांनी ते मॅटर मिटवायचे. हे असेच चालु राहिले तर अकोले तालुक्यात बदलापूर होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे, स्थानिक पातळीवर राजूर पोलीस आणि गटशिक्षण अधिकारी व बिडीओ यांनी या गोष्टीची दखल घेणे गरजेचे असल्याचे सामाजिक संघटनांनी मत व्यक्त केले आहे.