धुणं धुताना भर दिवसा बिबट्याने महिलेच्या नरडीचा घोट घेतला, विद्यार्थीनी, चिमुकली अन आता महिलेची शिकार.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे वर्पे वस्तीवर कपडे धुत असताना महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये ४२ वर्षीय महिलेच्या मानेवर व डोक्यावर दात लागल्याने ती जागीच ठार झाली. ही सर्व धक्कादायक घटना आज बुधवार दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. यामध्ये संगीता शिवाजी वर्पे (रा. निमगाव टेंभी, ता. संगमनेर) ही मयत झाली आहे. या घटनेमुळे निमगाव टेंभी परिसरात शोककळा पसरली आहे. याच परिसरात एका विद्यार्थीनीवर बिबट्याने हल्ला केला होता. तर एक महिन्यापुर्वी दिड वर्षांच्या चिमुरडीच्या गळ्याचा रक्ताचा घोट घेतला होता आज पुन्हा ही घटना घडल्याने संपूर्ण परिसर बिबट्यांच्या भितीने हादरून गेले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निमगाव टेंभी गावात वर्पे वस्ती आहे. तेथे हे छोटेसे कुटुंब राहते. मयत संगीता व पती शिवाजी यांना दोन मुले आहेत. ते शेती करून दुग्ध व्यवसाय करतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दररोज प्रमाणे आज देखील काम सुरू होते. सकाळी गायांना चारा-पाणी केले. त्यानंतर स्वयंपाक करून मुलांना डबा करून दिला. सर्वजण आपल्या आपल्या कामावर गेले. त्यांनी पुन्हा गायांचा चारा पाणी केला.
दरम्यान, घरातील सर्व कामे आवरून ती महिला कपडे धुण्यासाठी घराच्या समोर असलेले नळावर गेल्या. तेथे आजूबाजूला शेती आहे. झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात आहे. वस्तीच्या कडेला मका व गिनीगवताची शेती आहे. तेथेच हा बिबट्या दबा धरून बसला होता. त्याची चाहुल कोणाला ही लागली नाही. मयत संगीता या त्यांच्या कामात व्यस्त होत्या. त्याने या महिलेला एकटीच असल्याचे पाहिले आणि आपला डाव साधला. घरा शेजारी गिनींगवतातून आला आणि मयत संगीतावर झडप मारली. मागे फिरून पाहण्यासाठी देखील वेळ दिला नाही तेच बिबट्याने महिलेवर पाठीमागून हल्ला करत तिच्या डोक्याला धरून ओढीत गिनींगवतात नेले. हा सर्व प्रकार वस्तीवरील माणसांनी पाहीला.
दरम्यान, वस्तीवरील माणसांनी आरडा ओरड केली. गिनींगवत मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने आतमध्ये जाण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती. गिनींगवतातून बिबट्याचा व महिलेचा आवाज येत होता. त्यानंतर एका माणसाने ट्रॅक्टर घेतला व आवाजाच्या दिशेने गिनींगवतात नेला. त्यानंतर बिबट्यापासुन या महिलेची सुटका केली. मात्र, तोपर्यंत ४२ वर्षीय महिलेने जीव गमावला होता. या महिलेला डॉक्टरांनी मयत घोषीत केले. खरंतर, निमगाव टेंभी, देवगाव, हिवरगाव पावसा, रायते, पिंपरणे, जाखुरी, वाघापूर या भागात दिवसा देखील बिबटे दिसत आहे. त्यामुळे, वनविभागाने येथे जनजागृती करायला हवी. मोकाट कुत्र्यांपेक्षा आता बिबट्यांची संख्या अधिक झाली आहे. त्यामुळे दिवसा ढवळ्या देखील बिबटे आता दिसत आहे. वनविभागाने पिंजऱ्यांसाठी अडवणूक करण्याचे टाळावे. ग्रामपंचायतचे पत्र व्यवहार अन मगच पिंजरा भेटेल. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर अनेकांनी नाराजी दाखवली आहे.
संगमनेर तालुक्यात बिबट्यांनी आता हैदोस घातला आहे. भर दिवसा गावात प्रवेश करणे, वाडी वस्तीत घुसून मानसे व जनावरे यांच्यावर हल्ले करणे. हा फार मोठा अतिरेख होऊ लागला आहे. यात वन विभाग मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असून आम्ही काय करु शकतो अशा प्रकारची उत्तरे देत आहेत. त्यामुळे, अजून आता भर दिवसा बिबट्या शहरात फिरावा अशी इच्छा वन विभागाची आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागल आहे. तसेच नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. मात्र, सकाळीच लोक दुध घालण्यासाठी येतात, त्यांना रोज बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे, वेळीच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.