संगमनेर (सार्वभौम) :-
संगमनेर शहरातील वाडेकर गल्ली येथे पती पत्नीने गळफास घेऊन आपल्या जीवन यात्रेला पुर्ण विराम दिला आहे. ही धक्कादायक घटना आज मंगळवार दि.3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी घडली. यामध्ये गणेश मच्छिंद्र वाडेकर (वय ५५,रा. वाडेकर गल्ली,ता. संगमनेर) गौरी गणेश वाडेकर (वय ५०, रा.वाडेकर गल्ली, ता. संगमनेर) असे मयत व्यक्तींचे नाव आहे. आठ दिवसांपूर्वी याच कुटुंबातील २१ वर्षीय तरुण मुलगा श्रीराज याने पुणे येथे गळफास घेतला होता. तर दोन वर्षांपूर्वी याच घरात १६ वर्षीय तरुण श्रेयस याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे, संपूर्ण कुटुंब गळफासाने आपली जीवन यात्रा संपवल्याने संगमनेर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांच्या मृत्यू प्रकरणी सध्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद सुरू आहे. यात तीन मुले आणि एक मुलगी अशा चौघांमुळे या कुटुंबांने आत्महत्या केल्याचे समोर येऊ लागले आहे. तर, आठ दिवसांपुर्वी या दाम्पत्याच्या मुलाने आत्महत्या केली ती आत्महत्या की घातपात असा प्रश्न यांनी उपस्थित केला होता. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही अशी देखील त्यांची भावना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या दाम्पत्याला न्याय मिळतो का? यकाडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरात वाडेकर वस्ती येथे गणेश वाडेकर व गौरी वाडेकर असे पती पत्नी एकत्र कुटुंब राहत होते. ते शासकीय सेवेत रुजू होते. गणेश वाडेकर हे नगरपालिकेत तर गौरी वाडेकर हे आरोग्य विभागात होते. यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांना श्रीराज व श्रेयस असे दोन मुले होते. ते शिक्षण घेत होते. मोठा मुलगा श्रीराज हा उच्च शिक्षण घेण्यासाठी पुणे येथे गेला होता. तर श्रेयस हा संगमनेर शहरातच शिक्षण घेत होता. दिड वर्षांपुर्वी १६ वर्षीय श्रेयस या तरुणाने संगमनेर शहरातच वाडेकर गल्ली येथे राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्या दुःखातून वाडेकर कुटुंब सावरत होते.
दरम्यान, हे दुःख पचवत नाही तेच आठ दिवसांपूर्वी पुणे येथे शिक्षण घेणारा श्रीराज या २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे, या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील दोन्ही ही मुलांनी गळफास घेतल्याने आई वडिलांना या दुःखातून सावरता आले नसावे. त्याचा दशक्रिया विधी ही झाला नाही तेच आई वडिलांनी देखील टोकाचे पाऊल उचलले. आज तीन वाजण्याच्या दरम्यान गणेश वाडेकर व गौरी वाडेकर यांनी घरातील छताच्या फॅनला दोन वेगवेगळ्या रूम मध्ये गळफास घेऊन आपल्या जीवन यात्रेला पूर्णविराम दिला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले तो पर्यंत फार विलंब झाला होता. दोघांचा ही श्वास रोखला होता. या घटनेने संगमनेर शहर हादरून गेले आहे.
दरम्यान, या घटनेने संपुर्ण संगमनेर तालुका हदरला आहे. नेमके एकाच कुटंबातील चौघांनी आत्महत्या करावी आणि ती ही गळफास घेऊन ही किती मोठी शोकांतिका आहे. विशेष म्हणजे दोघेही दाम्पत्य सरकारी नोकरीत होते, त्यामुळे आर्थिक अडचण नसावी मात्र कदाचिक कौटुंबिक कलह किंवा मानसिक अस्थैर्य यामुळे संपुर्ण कुटुंबाने संपून घेणे ही मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. केवळ आत्मिक घुसमट मोकळी न होणे किंवा मित्र परिवार किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर चर्चा न केल्याने माणसे अस्थिर होतात. त्यामुळे, दु:खे कुरुप होण्यापुर्वी बोलले पाहिजे, चर्चा केली पाहिजे, दु:खांना वाट मोकळी केली पाहिजे, अन्यथा अशा प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ येते अशा प्रकारचे मत समुपदेशक यांनी व्यक्त केले आहे.