इंस्टाग्रामवर पटवलेली प्रियसी संगमनेरला येईना म्हणून त्याने आजोबांचा खून केला.! विकृत लव स्टोरी.! आरोपी अटक.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   आरोपीचे झारखंड येथील एका मुलीवर इन्स्टाग्रामवर प्रेम जडले, ती इकडे येण्यास नाही म्हटल्यावर या तरुणाने झारखंड येथील मुलीला व तिच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी गावातील वृद्धाचा छोट्या कुदळीने निघृन खुन केला. ही घटना झोळे येथे सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी घडली होती. यात साहेबराव भिकाजी उनवणे (रा. झोळे, ता. संगमनेर) हा वृद्ध मयत झाला होता. त्याचा खुन करणारा सराईत गुन्हेगार भुषण कांताराम वाळे (रा. झोळे, ता. संगमनेर) या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. या आरोपीचा मागमूस घेण्यासाठी  पोलीस उपधीक्षक यांचे पथक, तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. त्यात त्यांना यश आले आहे. या आरोपीवर यापुर्वी देखील गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत साहेबराव उनवणे हे गावातील कष्टाळू व्यक्तीमत्व होते. ते छोट्याशा चहाच्या दुकानावर व शेतीवर आपला उदरनिर्वाह करत होते. ते गावातील चौकातच राहत असल्याने गावातील सर्वांसोबत त्यांची ओळख होती. ते गेली अनेक वर्षांपासून घरासमोर असणाऱ्या पत्र्याच्या शेड मध्ये रात्रीच्या वेळी झोपत होते. त्यांचा अचानक   सोमवार दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी पहाटेच्या दरम्यान शेडमध्ये झोपलेल्या अवस्थेतच मृतदेह आढळून आला. यावेळी मयत साहेबराव उनवणे यांच्या डोक्यात कुदळीने दोन घाव केले. सर्वजण साखर झोपेत असताना अंधारचा फायदा घेऊन हा खुन केला होता. त्यानंतर घराच्या मागील दरवाजाला चिट्ठी लिहुन दुसऱ्यावर संशय व्यक्त व्हावा म्हणुन आरोपी फरार झाला होता. हा खून केवळ विकृत बुद्धीने केल्याचा संशय पोलिसांना पाहिल्यापासून होता. मात्र, त्यांच्याकडे सबळ पुरावे नव्हते. काही संशयीत गोष्टी हाती येताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कसा उलगडला हा तपास

आरोपी भुषण वाळे हा दि. 5 ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळी एका चहाच्या दुकानावर आढळून आला. तो झोळे गावातील सीसीटीव्ही मध्ये न येता थेट टोलनाक्याजवळील एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये आढळून आल्याने त्याच्यावर संशय निर्माण झाला. गावातील रस्त्याने न जाता तो पाटाच्या रस्त्याने टोलनाका परिसरात आला. तो रात्रीच्या वेळी दिसुन आला तिथेच पोलिसांना त्याच्यावर अधिक संशय निर्माण झाला. कारण यापूर्वी देखील त्याची गुन्हेगार प्रवृत्ती असल्याने त्यांनी आरोपी भुषण वाळेवर अगदी करडी नजर ठेवली. तो दिवसभर काय करतो, कुठे जातो, केव्हा घरी येतो याचे सर्व बारकावे गोळा केले. त्याचे सर्व सुक्ष्म पुरावे गोळा करून योग्यवेळी त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्याला खाकी दाखवली असता तो पोपटासारखा बोलु लागला. त्याने कबुली दिली की, त्याचे काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर  झारखंड येथील एका मुलीवर प्रेम जडले. हाय, बाय चॅटिंग सुरू झाली. त्यानंतर आरोपी भुषण वाळे याने या मुलीला काही पैसे पाठवले. ते पैसे देऊनही झारखंड मधील मुलीचे वडील लग्नासाठी तयार झाले नाही. आपण प्रेम केले पैसे ही दिले. मात्र, लग्न होत नसल्याने आपल्याला अडसर ठरणाऱ्या झारखंड येथील मुलीच्या आई वडीलांचा काटा काढण्यासाठी भुषण वाळे याने एक चाल खेळली. त्याने आपल्या गावातीलच चौकात असणाऱ्या वृद्ध व्यक्ती शोधला साहेबराव उनवणे यांच्यावर लक्ष ठेवले. साहेबराव उनवणे हे घरासमोरील शेड मध्ये झोपेत असल्याने सर्वजण घरात साखर झोपेत होते. याचा फायदा भुषण वाळे याने उचलला आणि छोट्याशा कुदळीने साहेबराव उनवणे यांच्या डोक्यात घाव घातले. आणि प्रियसीच्या कुटुंबाचा काटा काढण्यासाठी झारखंड येथील मुलीच्या आई वडीलांचे चिट्ठीत हिंदीत नाव लिहले व दरवाजाला अडकवली. मात्र, या सापळ्यामध्ये तोच अडकला पोलिसांनी सुता पासुन स्वर्ग गाठून आरोपी भुषण वाळे याच्या मुसक्या आवळल्या.

नेमकी काय घडले होते.!

 दि. 5 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 ते पहाटे 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. यात साहेबराव भिमाजी उनवणे (वय 77,रा. झोळे, ता. संगमनेर) यांनी संध्याकाळी नेहमी प्रमाणे जेवण केले व झोपण्यासाठी घरा समोरील शेड मध्ये गेले होते. पलंगावर आपले कपडे घेऊन ते निवांत झोपी गेले होते. घरातील सर्व लोक देखील झोपेत होते. मात्र, जेव्हा सकाळी उठले तेव्हा साहेबराव उनवणे यांच्या डोक्यावर टणक वस्तूचा घाव दिसला. ते मयत व्यक्तीच्या सुनेने पाहिल्यानंतर ओरडत घरात पळत आली. सर्वांना झोपेतून उठवले व सांगितले की, मामांच्या डोक्यातुन रक्त आले आहे ते काही बोलत नाही. असे सांगितल्याने कुटुंबातील सर्वजण घरासमोरील शेडमध्ये पळत आले. जेव्हा मयत व्यक्तीच्या मुलाने पाहिले असता ते संपुर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते असे प्रथमदर्शी दिसले. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचमाना आणि पीएम करण्याची प्रोसिजर पार पाडली होती. त्यानंतर पोलिसांनी लोकेशन, सीसीटिव्ही, काही संशयीत गोष्टी, विचारपूस आणि टेक्निकल पुराव्यांची जुळवाजुळव केली आणि या गुन्ह्याची उकल केली आहे.

या पथकाने गुन्ह्याची उकल केली.!

सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक  मा. दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय, राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शन लाभले. गुन्हा तपासात व उघड आणण्यात पीएसआय सातपुते, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, पीएसआय धाकराव स्थानिक गुन्हे शाखा, राहुल सारबंदे राहुल डोके उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर, तसेच स्थानिक गुन्हे शाखा  यांचेकडील पी.एस.आय तुषार धाकराव, पो कॉ. सागर ससाणे,पो काॅ. अमृत आढाव तसेच सायबर सेल कडील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनाड,पो का प्रशांत राठोड, पो काॅ. प्रमोद जाधव यांचा सहभाग होता. सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख,पोलीस हवालदार शिवाजी डमाळे,पोलीस हवालदार अमित महाजन, पोलीस हवालदार सहाणे, पोलीस शिपाई बाबासाहेब शिरसाट, पोलीस शिपाई सचिन सोनवणे सर्व नेमणूक संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हे करत आहे...