बाप रे.! शेअर मार्केटमध्ये तिघांचे चार कोटी बुडाले.! ट्रेडर्स पैसे हारुन पळाला, बसा तोंड झोडत, गुन्हा दाखल.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

 दोन दिवसात १० टक्के परतावा देतो असे सांगून तिघांना शेअर मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये पैसे गुुंतविण्याचा विश्‍वास एका व्यक्तीने दिला होता. कोट्यावधी रुपये गुंतविल्यानंतर पहिल्यांदा लाखो रुपये आले खरे. मात्र, पैशाची चांगलीच चटक लागली.  पैसा कमविण्याच्या नादात या तिघांनी तब्बल ३ कोटी ६८ लाख ७ हजार ७५० रुपये आरोपीच्या घशात घातले. मात्र, जसजसे पैसे संपत गेले. तसतसे व्यवहार ब्लॅक होत गेले. आरोपीने बँकेचे चेक दिल्यामुळे या तिघांना पैसे येण्याचा विश्‍वास होता. मात्र, कोट्यावधी रुपये हारल्यानंतर आरोपी अचानक गायब झाला. फोन न उचलणे, पैसे मागिल्यानंतर टाळाटाळ करणे आणि आता कायमचा आऊट ऑफ कव्हरेज झाल्यानंतर तिघांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी कुशादेव बेझबुराह (रा. जनपुर, दिल्ली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दत्तात्रय शंकर पवार (रा. सायखिंडी, ता. संगमनेर) याची कुशाबासोबत ओळख झाली होती. तेव्हा कुशादेव म्हणाला की मी ट्रेडिंग व्यवसाय करतो. त्यात मला चांगले ज्ञान आहे. जर तुम्ही १० ते १५ लाखांची गुंतवणुक केली. तर, दोन दिवसात १० टक्के परतावा मिळून देतो असे म्हणून त्याने पवार यांना ऑफर दिली. मात्र, सुखासुखी सुरू असलेेल्या गाडीची कानखीळ काढायला नको म्हणून पवार यांनी त्यास नकार दिला. मात्र, कुशादेव त्यांना वारंवार फोन करीत होता, पैसे लावण्यास मजबुर करीत होता. तो जेव्हा-जेव्हा भेटत होता, तेव्हा-तेव्हा ट्रेडिंगमध्ये कसा पैसा कमविला जातो हे मोबाईलमध्ये दाखवत होता. मात्र, तरी देखील पवार त्याच्या बोलण्यावर भाळले नाही. मात्र, वारंवार फोन करणे, ट्रेडिंग विषयी सांगणे, विश्‍वासाने बोलणे, मोठे होण्याची अमिष दाखविणे हे प्रकार आरोपीकडून जाणीवपुर्वक होत गेले.

दरम्यान, आरोपी कुशादेव याने पवार यांना सांगितले. की, तुम्ही जितकी रक्कम मला देणार आहे, त्या रकमेचे चेक मी तुम्हास देतो. तेव्हा पवार यांना विश्‍वास आला, की जरी ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा मिळाला नाही. तरी याचे चेक आपल्याकडे आहे. त्यामुळे, यात पैसे गुंतवून पाहू. म्हणून त्यांनी आरोपी कुशादेव याच्या फेडरल बँकेच्या खात्यावर १५ लाख रुपये वर्ग केले. त्यानंतर पुन्हा १० लाख रुपये काही दिवसांनी वर्ग केले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी पुन्हा १० लाख वर्ग केले. या दरम्यान, जसजसे पैसे ट्रेडिंगमधून निघत गेले, तसतसे पवार यांनी आरोपीच्या खात्यावर वर्ग केले. जेव्हा लाखो रुपये आल्याची खात्री झाली तेव्हा पवार यांना विश्‍वास पटावा म्हणून आरोपी कुशादेव याने पवार यांच्या खात्यावर ३ लाख, नंतर ५६ हजार आणि त्यानंतर १० लाख टाकले. तेव्हा खर्‍या अर्थाने पवार यांना पैसा येत असल्याचा विश्‍वास आला.

दरम्यान, पैशाची चटक लागल्यानंतर पवार यांना देखील मोह आवरला नाही. जसजस त्यांना पैसा येत होता तसतसे ते ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करीत गेले. काल लाखो रुपयांची रक्कम आता कोटीच्या घरात गेली होती. पवार यांनी आरोपीच्या खात्यावर १ कोटी १२ लाख आणि रोख २५ लाख असे १ कोटी ३७ लाख रुपये गुंतवणुक केली होती. त्यापैकी फक्त ५३ लाख रुपये पवार यांना मिळाले आहेत. जसा व्यवहार बंद झाला आणि कुशादेव ट्रेडिंगमध्ये हरला तेव्हापासून यांच्यात वाद सुरू होते. जानेवारी २०२३ पर्यंत कुशादेव यांच्या संपर्कात होता. मात्र, त्यानंतर त्याने संगमनेर सोडले व फोट कट करणे, पैसे देतो, पाहु, पळुन चाललोय का, हिशोब करु असे म्हणून त्याने संगमनेरला रामराम केला.

दरम्यान, हा पैसे कमविण्याचा उद्योग आता फक्त पवार यांच्यापुरताच मर्यादीत राहिला नव्हता. तर, त्यांचे मित्र अंकुश जनार्दन नरवडे यांनी देखील १ कोटी ९२ लाख ६७ हजार ७५० रुपये बँकेत वर्ग आणि २० लाख रोख ही रक्कम याच कुशादेवकडे ट्रेडिंगसाठी दिले होते. त्यातील १ कोटी २६ लाख ९७ हजार नरवडे यांना परतावा मिळाला आहे. त्यानंतर नरवडे यांचे मित्र शरद काशिनाथ जेडगुले यांनी देखील कुशादेवच्या खात्यात १३ लाख ४० हजार रुपये आणि रोख ५ लाख दिले होते. त्यापैकी ४ लाख ४४ हजार ४१ रुपये मिळाले आहेत. म्हणजे या तिघांनी मिळून ३ कोटी ६८ लाख ७ हजार ७५० रुपये गुंतवणुक केली होती. त्यातील १ कोटी ८४ लाख ४१ हजार त्याने परत केले असून १ कोटी ८३ लाख ६६ हजार रुपये इतकी रक्कम आरोपी कुशादेव याने परत केली नाही. निव्वळ चेक देवून तो पसार झाला आहे. त्यामुळे, या तिघांनी मिळून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

एक भाकरीपेक्षा आर्धी, पण सुखाने खा.!

खरंतर शेअर मार्केटमध्ये पैसा कमविण्याच्या नादात अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. त्यात अनेक डॉक्टर, वकील, शिक्षक आणि आमदार खासदारांसह अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. फक्त झाकली मुठ सव्वा लाखाची असे म्हणून हाताची घडी तोंडावर बोट आहे. गुन्हा दाखल केला तर पैसा मिळेल की नाही याची शाश्‍वती नाही, कोर्टाच्या पायर्‍या झिजविण्यापेक्षा सामोपचाराने पैसा मिळेल अशी आशा वाटते. त्यामुळे, अनेकांचे पैसे गुंतून देखील मुग गिळून बसल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. मात्र, पवार यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर यातून अनेकांनी धडा घेतला पाहिजे. असल्या फालतू गोष्टींच्या नादाला कोणी लागू नये. दोन नंबर धंद्यावाले बुडाले तरी त्यांच्या कपाळाचे कातडे जात नाही. पण, हीच रक्कम गोरगरिबाची बुडाली. तर, संपुर्ण आयुष्य कोलमडून जाते. म्हणून सावधान.! एक भाकरीपेक्षा आर्धी, पण सुखाने खा...!!