सावत्र आई आणि सख्या बापाने सुन व मुलाची हत्या केली.! प्रॉपर्टी व लग्नाचे कारणाहून एकमेकांनी बांधून विहिरीत फेकले.!

सार्वभौम (अकोले) :- 

अकोले तालुक्यातील खिरविरे येथे निर्दयी बाप आणि सावत्र आईने मुलगा आणि सुनेची नियोजनपुर्वक हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीत पहिल्या बायकोचा मुलगा हकदार होऊ नये आणि लग्नाचे कारण म्हणून हे कृत्य केल्याचे समोर येऊ लागले आहे. दि. ४ जुलै २०२४ मयत दोघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आल्यानंतर अकोले तालुक्यात एकच खळबळ उडली. यात मयत बहिरु काळु डगळे (वय २५) व पत्नी सारीका बहिरु डगळे (वय २२) अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. मात्र, हा घातपात नसून आत्महत्या आहे असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, मयत दोघांनी एकमेकांना घट्ट बांधले कसे, यांनी एकमेकांचे हातपाय बांधले कसे, मुलाच्या अंगावर जखमा कशाच्या आहेत, ही दोघे इतका टोकाचा निर्णय का घेतील, जमीन वादातून बाप लेकांचे होणारे वाद आणि बरीच काही कारणे ही संशयास्पद होती. त्यामुळे, ही आत्महत्या नसून घातपात आहे. अशा प्रकारचे आरोप मुलाचे मामा एकनाथ कुलाळे यांनी केले होते. त्यानंतर कुलाळ यांच्या फिर्यादीनुसार काळु काशिनाथ डगळे, हिराबाई काळु डगळे, संतोष काशिनाथ डगळे आणि काशिनाथ लक्ष्मण डगळे (सर्व रा. खिरविरे, ता. अकोले, जि. अ.नगर) अशा चौघांवर अकोले पोलीस ठाण्यात दोघांचा खुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काळु डगळे हा खिरविरे येथील रहिवासी असून त्याने गेल्या काही वर्षापुर्वी पाडोशी येथील एका मुलीशी पहिला विवाह केला होता. एक मुलगा झाल्यानंतर त्यांच्यात फारसे काही टिपन बसत नव्हते. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून काळु याची पत्नी आपल्या लेकराला घेऊन माहेरी निघुन गेली होती. त्यानंतर काळुला फार दिवस रहावले नाही. त्याने दुसर्‍या पत्नीचा शोध घेतला आणि काही वर्षापुर्वी त्याने हिराबाई सोबत लग्न केले. यांचा देखील संसार चांगला सुरु होता. या दरम्यान यांना एक मुलगा झाला. मात्र, पहिल्या बायकोचा मुलगा हा काळु यांच्या संपर्कात होता. त्याचे घरी येणे जाणे होते. त्यामुळे, ती सल सावत्र आईला कदााचित बोचत होती. म्हणून याचा काटा काढायचा असे यांनी ठरविले.

दरम्यान, मयत बहिरु काळु डगळे याचे गेल्या दोन महिन्यांपुर्वी लग्न ठरले होते. तेव्हा बहिरुचा मामा म्हणत होता. की, मी तुझे लग्न करण्यासाठी समर्थ आहे. तु तुझ्या घरी जाऊ नको. आधीच जमिनीचे वाद आणि त्यात लग्न, त्यामुळे काही अनर्थ घडाला नको. मात्र, आरोपी काळु डगळे याने त्याच्या मुलास सांगितले. की, तुझे लग्न आपण खिरविरे येथे करु. त्यानुसार मुलाने देखील बापाच्या म्हणण्यावर विश्‍वास ठेवला आणि तिकडेच लग्न केला. मात्र, त्यानंतर दोन महिने उलटतात कोठे नाहीतर दि. ३० जून २०२४ रोजी बहिरु काळु डगळे व पत्नी सारीका बहिरु डगळे ही दोघे अचानक घरातून गायब झाले अशी माहिती पुढे आली. मात्र, यांनी घरातून कोणतेही साहित्य नेले नाही, घरातून चपला देखील घातलेल्या नव्हत्या. त्यामुळे, हे दाम्पत्य नेमकी गेले कोठे? याची कोणालाच माहिती नव्हती.

दरम्यान, डगळे आणि कुलाळ या दोन्ही परिवाराने बहिरु डगळे व सारीका डगळे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मिळून आले नाही. मात्र, दि.४ जुलै २०२४ रोजी या दोघांचा मृतदेह आरोपी काळु डगळे यांच्या घरापासून अगदी काही मिटर अंतरावर असलेल्या विहिरीत तरंगताना दिसून आला. मात्र, या दोघांना एका कापडाने घट्ट बांधलेले होते. त्यांचे पाय देखील घट्ट बांधलेले होते, यांचे चेहरे देखील पुर्णपणे काळवंडलेले होते. तर, ज्या पद्धतीने यांचा मृतदेह मिळून आला. त्यानुसार ही आत्महत्या आहे असे म्हणणे फार धाडसाचे वाटत होते. त्यामुळे, या दोघांची नियोजनपुर्वक हत्या असल्याचे वाटत होते. त्यामुळे, मुलाचे मामा एकनाथ कुलाळ यांनी या घटनेचा पाठपुरावा केला.  या घटनेला गावातील कोणीही पाठीशी घातले नाही. त्यानंतर पोलिसांनी यात सखोल चौकशी केली असता त्यात काही प्रमाणात तत्थ्य आढळून आले. त्यानंतर याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घर जाळुन टाकले.!

जोवर आरोपी अटक होत नाहीत. तोवर बहिरु आणि सारीका यांच्यावर अंत्यसंस्कार करायचा नाही असा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता. त्यांनी शवविच्छेदन अहवालावर देखील त्यांनी अक्षप घेतला होता. मयत झालेल्या दोघांवर अत्यसंस्कार आरोपी यांच्या घरासमोर करायचा असा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांच्या मध्यस्तीने हा वाद मिटला. मात्र, तरी देखील जमावाने रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आरोपींचे घर जाळुन टाकले. तसेच घरापुढील ट्रॅक्टर आणि अन्य साहित्याला आग लावून पेटवून दिले. त्यामुळे, नातेवाईकांच्या भावना प्रचंड तिव्र असल्याचे लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हताळल्याचे पहायला मिळाले.

अपघाताच्या नावाखाली राजरोस हत्या.!

अकोले आणि संगमनेर तालुक्यात आजकाल चांगलाच पायंडा पडु लागला आहे. नियोजनपुर्वक हत्या करायची आणि त्याला अपघात असे भासवायचे हा प्रकार रुढ होत चालला आहे. अकोल्यात गणेश देठे उंचखडक बु , अमोल वाघमारे अकोले, राहुल शिंदे कोतुळ अशी अनेक प्रकरणे आहेत जी दडपली गेली. त्यानंतर संगमनेर तालुक्यात देखील हिवरगाव पावसा येथे दोन चिमकल्यांची शेततळ्यात ढकलुन देऊन हत्या केली आणि त्यास अपघात दाखविला तर संगमनेर येथील आंभोरे येथे एका व्यक्तीने प्रेयसिची हत्या करुन तिला गाडीखाली चिरडले व तो अपघात असल्याचे भासविले होते. मात्र, पोलिसांनी यातील तीन गुन्ह्यांचा शोध लावला आणि मयत व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, असे अनेक गुन्हे हे अपघाताच्या नावाखाली घातपात म्हणून दडपले जाऊ लागले आहेत. याकडे पोलिसांनी चौकस पद्धतीने पाहिले पाहिजे.