मंडल अधिकारी व तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात ४४ हजारांची मागणी, खादाड मंडल अधिकारी व लाचखोर तलाठी अटक.!

   
सार्वभौम (संगमनेर) :- 

तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी संगणमत करून २२ प्लॉटच्या ऑनलाईन नोंदी करण्यासाठी ४४ हजार रुपयांची मागणी केली. त्यातील ४० हजार रुपये रकमेवर तडजोड करण्यात आली. याप्रकरणी सागर एकनाथ भापकर (तलाठी, सावेडी, अ.नगर) व शैलजा राजाभाऊ देवकाते (मंडल अधिकारी, सावेडी, अ.नगर) अशा दोघांना लाचलुचपत विभाग अहमदनगर यांनी ताब्यात घेतले आहे. ही मागणी दि. १९ मार्च २०२४ रोजी करण्यात आली होती. त्यावर तडजोड म्हणून ४० हजार रुपये स्विकारल्याचे मान्य केले आहे. ही कारवाई पोलीस उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांच्या पथकाने केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या नावे संयुक्त प्लॉट आहे. तो सावेडीत असून त्याचे विभाजन करायचे होते. त्यासाठी या प्लॉटचे अहमदनगर महानगरपालिकेत शासकीय रेखांकन करुन सदर प्लॉटचे बांधकाम करण्याकरीता २२ प्लॉटची स्वतंत्र उपविभागणी केली आहे. त्यानुसार लोकसेवक तलाठी सागर भापकर याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्या २२ प्लॉटच्या फेरफार नोंदी ऑनलाईन करुन त्या मोबदल्यात ४४ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

दरम्यान, ४४ हजार रुपये कशासाठी? असा प्रश्‍न तलाठी भापकर याला केला असता त्याने उत्तर दिले नाही. सर्व काम कायदेशीर असून देखील काम करुन देण्यास पहिल्यापासून टाळाटाळ केली. आम्हाला वर पर्यंत पोहच करावे लागले असे म्हणत त्याने नकळत पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही असे सुचित केले. त्यामुळे, काम होणे गरजेचे होते म्हणून तक्रारदार यांनी ४४ हजार ऐवजी तडजोड करुन रक्कम ४० हजार वर आली. तेव्हा आरोपी भापकर याने ४० हजार घेण्याची तयारी दर्शविली. 

दरम्यान, मंडल अधिकारी, सावेडी शैलजा देवकाते यांनी तक्रारदार यांच्याकडून प्लॉट फेरफार नोंदी मंजुर करुन घेण्यासाठी ४४ हजार रुपये रक्कम स्विकारल्याचे मान्य केले. तसेच तलाठी सागर भापकर याच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये या प्रमाणे २२ प्लॉटचे ११ हजार रुपये लाचेची मागणी केली. दरम्यान, यांना महिन्याला पगार मिळतो, शासन यांना त्यांच्या चौकटीत बसणार्‍या सुविधा देते असे असून देखील हे पैशांची मागणी का करतात? म्हणून तक्रारदार यांनी पैसे देण्याचे कबुल केले. मात्र, यांना धडा शिकविण्यासाठी...!! अखेर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग अ.नगर यांच्याकडे तक्रार केली आणि पोलीस उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांनी सापळा रचून तलाठी व मंडल अधिकारी यांना पैसे स्विकारणे आणि मागणी करणे यानुसार कारवाई करुन त्यांना अटक केली आहे.

मुळात अती तेथे माती होते. यापुर्वी देखील यांनी किती लोकांना लुटले असेल, किती लोकांच्या मानगुटीवर बसले असेल. लोक सहखुशीने पैसे देतात ते घेतले तर लाचलुचपत देखील काही करु शकत नाही. मात्र, लोकांच्या सहनशिलतेचे अंत झाला की अशा प्रकारच्या कारवाया होतात. विशेष म्हणजे लाचखोरीत राज्यात महसुल विभाग अव्वल आहे आणि नगर जिल्ह्यात देखील महसुल अव्वल आहे. त्यामुळे, महसुल विभागाने जनाची नव्हे तर मनाची तरी ठेवली पाहिजे आणि जनतेचा मानगुटीवर बसून पैसा न काढता प्रमाणिकपणे जनतेला समाधान होईल असे काम केले पाहिजी अशी चर्चा आता सोशल मीडियावर होऊ लागली आहे.