मी शपथ घेतो, उतनार नाही, मातनार नाही, बहुजनांना मी धमकविणार नाही, कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही, गद्दारी कधीच करणार नाही आणि ५०० शे कोटींपेक्षा जास्त निधी आणेल.!

सार्वभौम (अकोले)-

 डॉ. किरण लहामटे यांना गेल्या पंचवार्षीकला निवडणुक दिल्यानंतर त्यांनी येथील बहुजन वर्गातील कार्यकर्त्यांना विशेषत: त्यांच्या सोबत २०१९ साली सोबत असणार्‍यांना योग्य न्याय दिला नाही. त्यामुळे, त्यातील ९० टक्के कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहे. तर, आमचा नाद करायचा नाही हे वाक्य अजून देखील येथील बहुजन समाज विसरला नाही. ज्या विश्‍वासाने तुम्ही डॉ. लहामटे यांना निवडून दिले होते, त्यांनी मतदारांच्या विश्‍वासाला तडा दिला आहे, जनतेच्या भावनांशी गद्दारी केली आहे. तसे माझ्याकडून कधीच होणार नाही. तर, मी २५ शे कोटी रुपयांची कामे आणली म्हणणार्‍या लहामटे यांनी केवळ नारळ फोडले आहे. आकडे फुगविले आहे, वास्तवत: इतका निधी तालुक्यात आणला नाही. मात्र, मी शपथ घेतो. की, येणार्‍या काळात मी ५० शे कोटींपेक्षा जास्त निधी अकोले तालुक्याला आणून येथील आरोग्य, शिक्षण, पर्यटन, रोजगार, महिला सुरक्षा, मुख्य गाव आणि शेतरस्ते, अनेक पुल, महिलांचे सक्षमिकरण असे अनेक कामे करणार आहे. तरी, एकदा आपण मला संधी द्यावी अशा प्रकारची विनंती अमित भांगरे यांनी मतदारांपुढे केली आहे.

उतनार नाही, मातनार नाही, घेतला वस: सोडणार नाही.!

अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे. येथे कितीही विरोध आणि टिका टिप्पणी झाली. तरी, प्रत्येक विरोधकांचा आणि थोरामोठ्यांचा आदर राखला जातो. मात्र, आमदार महोदयांनी विरोधक म्हणजे भारत पाकिस्तान अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे. जनता मायबाप आहे असे म्हणत सर्व कार्यकत्यांना अक्षरश: वार्‍यावर सोडले आहे. पण ते विसरले. की, कार्यकर्त्यांची देखील एक पळी असते. जीने आपल्याला निवडून आणले आहे. मतदार राजाने मतदान केले आहे. दुर्दैवाने मतदारांच्या छाताडात लाथा आणि कार्यकत्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम आमदार साहेबांनी केले आहे. मात्र, मी शपथ घेतो. की, मी अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करणार नाही. उतनार नाही, मातनार नाही, घेतला वस: मी सोडणार नाही.! मी पुरोगामी विचारांचा, एकनिष्ठेचा, समाजाशी बांधीलकीचा, तालुक्याच्या विकासाचा, रोजगार, आरोग्य, शिक्षणाचा आणि येथील संस्कृतीचा वस: घेऊन चालणार आहे.

बहुजनांना मी धमकविणार नाही,

डॉ. किरण लहामटे यांनी बहुजन समाजातील अनेकांची अवहेलना केली आहे. साडेचार वर्षे येथील बहुजनांना वार्‍यावर सोडणारे आमदार आता बहुजनांच्या ताटाखाली मांजर बनून रहात आहे. मात्र, हेच आमदार मांड्या थोपटून म्हणत होते. आमचा नाद करायचा नाय.! ही सामाजिक विषमत पसरविली कोणी? माझे वडील स्व. अशोकराव भांगरे यांनी तालुक्यातील बहुजन समाजाला धरुन १९९० ते २०२२ असा प्रदिर्घ काळ राजकारण केले आहे. बहुजनांचे नेतृत्व केले आहे आणि त्यांच्या हाताखाली काम देखील केले आहे. मात्र, त्यांनी कधी बहुजनांची लक्तरं वेशीवर टांगली नाही आणि विवाद निर्माण होतील असे वक्तव्य केले नाही. जेव्हा कधी चूक झाली तेव्हा मोठ्या मनाने माफी देखील मागितली आहे. इतके उदार अंत:करणाचे ते लोकनेते होते. दुर्दैवाने लहामटे आमदार झाल्यापासून बॅनर फाडाफाडी, कधी तोंडाला काळे फासाफाशी, कधी लात मारामारी, कधी ते राजा होतात तर कधी हुकूमशहा होतात. कधी म्हणतात आमचा नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. असे वक्तव्य केले जातात. विशेष म्हणजे साथी दशरथ सावंत साहेब, बी.जे.देशमुख, मधुभाऊ नवले, डॉ. अजित नवले, विजय वाकचौरे अशा अनेक मान्यवरांसोबत आमदारांची वागणूक कायम दुसवट्याची राहिली आहे. त्यामुळे, मी शपथ घेतो. की, येथील बहुजनांचा आदर राखून प्रत्येकाला मान सन्मान दिला जाईल.

कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही, 

मुळात: स्व. अशोकराव भांगरे साहेब यांचा स्वाभाव असा होता. की, त्यांनी कधी चुकन कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडले नाही. १९९० ते २०२२ पर्यंत निवडणुका केल्या. तालुक्यातील विरोधक कायम जिवंत ठेवला. आज देखील साहेबांचे कार्यकर्ते माझ्या दिमतीला उभे आहेत. मात्र, २०१९ मध्ये निवडून आलेले डॉ. लहामटे यांच्याकडे कार्यकर्ता सोडा.! साधा गाडीचा ड्रायव्हर, पीए आणि त्यांच्या कार्यालयात काम करणारा ऑफीसबॉय देखील टिकला नाही. २०१९ मध्ये त्यांच्यासाठी दिवसरात्र काम करणारे महेश तिकांडे, संदिप शेणकर, राजेंद्र कुमकर, संपत नाईकवाडी सर, सुरेश खांडगे सर, स्वातीताई शेणकर, संतोष नाईकवाडी, अशी शेकडो नावे सांगता येतील. या सर्व सहकार्‍यांची प्रचंड अवहेलना डॉ. लहामटे यांनी केली आहे. यांच्या स्वाभावाला आणि कार्यपद्धतीला वैतागून हे शिलेदार त्यांच्यापासून दुर गेले आहेत. पण, माझा शब्द आहे. ज्यांनी-ज्यांनी माझ्यासाठी जीवाचे रान केले आहे. त्यांचे अनंत ऋण भांगरे परिवारावर राहणार आहे. कारण, मला खात्री आहे. स्व. अशोकराव भांगरे साहेब तह हयात आमदार होण्यासाठी झुंज देत राहिले. पण, अखेरच्या घटकापर्यंत त्यांना यश आले नाही. त्यांचे स्वप्न ही मायबाप जनता २०२४ मध्ये एकदा तरी पुर्ण करणार आहे. त्यामुळे, ज्यांनी ज्यांनी मला मदत केली. त्या कायकर्त्यांना आणि तालुक्यातील प्रत्येक नगरिकांसाठी मी २४ तास समाजसेवेसाठी कटीबद्ध राहणार आहे. फक्त एक संधी मला द्यावी ही तुम्ही जनतेपुढे नतमस्तक होऊन विनंती करतो.

गद्दारी कधीच करणार नाही

मी शपथ घेतो, मला येणार्‍या काळात तिकीट मिळो अगर ना मिळो, सत्ता येवो ना योवो, राज्यात कितीही बदल होवो. पण मी मतदारांच्या मुल्यांशी आणि मतदारांनी टाकलेल्या विश्‍वासाशी कधीच गद्दारी करणार नाही. २०१९ मध्ये तुम्ही १ लाख १३ हजार ४१४ मतांनी निवडून दिलेल्या आमदारांनी केवळ सत्ता, खोके आणि विकासाच्या नावाखाली कधी पवार साहेब तर कधी अजित दादा अशा बेडूक उड्या मारून तालुक्याच्या जनतेचा विश्‍वासघात केला आहे. गद्दारी केली आहे. विकास विरोधात राहून होत नाही. तर, रोहित पवार, शंकराराव गडाख साहेब अशा कित्तेक आमदारांनी विकासकामे केली आहेत. त्यांना का गद्दारी करावी वाटली नाही? त्यामुळे, ५० खोके येवो किंवा १०० खोके. पण मी मतदार आणि कार्यकर्त्यांचा गळा घोटून स्वत:चे घर भरणार नाही. राज्यात आणि देशात कितीही विपक्ष परिस्थिती होऊद्या. मी मतदारांशी कधीही गद्दारी करणार नाही ही शपथ मी घेतो आहे.

सर्वात जास्त निधी आणणार.!

डॉ. किरण लहामटे म्हणतात. की, मी २५ शे कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र, खरोखर तशी कामे दिसतात का? ६ ते ७ कोटीत बस स्थानक कसे व्हायला हवे होते? केवळ गंध-पावडर आणि लाली टिकली लावून सजविले आहे. ते आज पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी गळताना दिसते. अजून देखील लोकांना बसायला बाकडे नाहीत, महिला आणि पुरुषांना शौचालयाची पर्यायी सोय नाही. हे एकच उदा. आहे. त्यामुळे, केवळ आकडे फुगविण्याचे काम केले आहे. राजूर आणि अन्य ठिकाणी आमदारांनी ५ कोटी रुपयांच्या शाळा बांधल्या. त्याचा कोठे गवगवा नाही. पण उंचखडक बु शाळेच्या दोन खोल्यांचा आमदारांनी तालुकाभर गवगवा केला आहे. वास्तवत: त्या शाळेला अद्याप एक रुपया देखील मिळालेला नाही. विशेष म्हणजे तिसरी खोली बांधून झाली. मात्र, त्या खोलीची अक्षरश: मंजुरीच नाही. त्यात ठेकेदार १३ लाख रुपयांना लॉस जाणार आहे, अशी अनेक उदा. आहेत. फक्त २५ शे कोटींची कामे म्हणजे झाकली मुठ सव्वालाखाची.! मात्र, उद्याच्या काळात शंभर टक्के महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. शरद पवार साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब तसेच उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी येथील महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची मागणी पुर्ण करणार आहे. त्यासाठी तालुक्यात ५०० शे कोटी रुपयांचा निधी या तालुक्यासाठी आणणार आहे. संधी मिळाली की एकापेक्षा एक काम करणारे नेतृत्व तयार होते. मला येणार्‍या काळात ही मायबाप जनता संधी देईल. याची मला खात्री आहे.