आजोबामागे नातू शेतात गेला, पाय घसरुन शेततळ्यात पडला, बाबांनीही उडी मारली अन दोघांचाही अंत झाला.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे आजोबाचा व नातवाचा शेततळ्यात पडुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दि.२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यात शिवाजी अत्याबा सोनवणे (वय ६६, रा. पिंपळमळा वेल्हाळे, ता. संगमनेर) व समर्थ नितीन सोनवणे (वय ३,रा. पिंपळमळा वेल्हाळे, ता. संगमनेर) आशा दोघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे. हा प्रकार नातेवाईकांनी पाहिला असता त्यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. आजोबा व छोट्याश्या नातवाचा पाण्यात पडुन मृत्यू झाल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेल्हाळे गावात पिंपळमळा येथे हे छोटेशे सोनवणे कुटुंब राहत होते. त्यांचा शेतीवर उदरनिर्वाह चालत होता. शेती करण्यासाठी त्यांनी घराजवळच एक शेततळे तयार केले होते. घरात छोटे-छोटे मुले असल्याने या शेततळ्याला सुरक्षा म्हणुन या तळ्याला गेट देखील तयार केले होते. आज गुरुवार दि.२५ जुलै रोजी आजोबाने शेतीतील सर्व काम आटपून जेवण केले. त्यांनी शेततळ्याकडे पाहिले असता रोजच्या पावसाने शेततळ्याच्या भोवती प्रचंड गवत उगलेले दिसले. या शेततळ्याचा परिसर निर्मळ करायचा म्हणुन आजोबा शिवाजी सोनवणे यांनी फवारणीचे औषध आणले. ते शेततळ्याचा गेट उघडुन तळ्यातील आतील बाजुने फवारणी करण्यासाठी शिवाजी सोनवणे गेले. मात्र, शेततळ्यात जात असताना गेट बंद करायचे लक्षात राहिले नसावे. आजोबांची फवारणी सुरू होती ते नातवाने पाहिले. नातू रोज खेळतो तसा आज देखील आजोबाकडे शेततळ्याकडे गेले. मात्र, शेतळ्याकडे खेळत जात असताना नातवाचा पाय घसरला तो शेततळ्यात पडला त्याला पाहण्यासाठी आजोबा गेले असता ते देखील शेततळ्यात पाय घसरून पडले असावे. मात्र, शेततळ्यात पाणी मोठ्याप्रमाणात असल्याने नातवाला व आजोबाला ठाव लागला नाही. पाणी नाकातोंडात गेले. दोघांनी आपल्या प्रयत्नांना पूर्णविराम दिला. दरम्यान काही काळानंतर हा प्रकार  नातेवाईकांनी पाहिला. मात्र, तो पर्यंत आजोबा व नातवाचा श्वास रोखला होता. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. तो पर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी आजोबाला व नातवाला मयत घोषीत केले.

                दरम्यान आ. सत्यजित तांबे यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी सांगितले होते. शेततळे हे शेतीसाठी पाणी देण्यासाठी आहे. शेतकरी आणि मुलांचा जीव घेण्यासाठी नाही. त्यामुळे, शासनाने शेततळ्यांच्या कडेला संरक्षक तटबंदी आणि शेततळ्याच्या वरुन देखील काही अवरण टाकता येईल का? यावर  विचार करावा असे सुचविले होते. मात्र, सरकारने किंवा प्रशासनाने त्यावर कोणतीही ठोस भुमिका घेतलेली नाही. मात्र, लाडक्या बहिनी आणि लाडका भाऊ यावर नको तितके लक्ष केंद्रीत केले आहे. म्हणजे लाकडे बहिन भाऊ शेततळ्यात बुडून मेले तरी चालतील. पण, त्यावर उपयोजनात्मक  निर्णय होत नाही. हे फार मोठे दुर्दैव आहे. येणाऱ्या काळात आणखी किती लोकांचे जीव शासनाला घ्यायचे आहे, किती बाळ गोपाळ आणि विद्यार्थ्यांनी आहुती द्यायची आहे देव जाणे. पण, एक माणूसकी म्हणून का होईना शासनाने ठोस भुमिका घेतली पाहिजे, शेततळ्याला अवरण म्हणून अनुदान देणे किंवा अन्य उपायोजना करणे आवश्यक आहे. कारण, आत्तापर्यंत शेततळ्यात नगर जिल्ह्यात हजारो मुलांनी आपला जीव गमविला आहे. राज्यात आणि देशातील आकडेवारी पुढे आली तर भल्याभल्यांच्या भुवया उंचावतील. त्यामुळे, लाडक्या भावा बहिनींना पैसे देण्यापेक्षा ते आणि त्यांची लेकरं जगली पाहिजे यासाठी उपायोजना व्हावी अशी मागणी केली जात आहे.

                  दरम्यान, शेततळ्यांनी विशेषत: विद्यार्थ्यांचे जीव सर्वाधिक घेतले आहे.  लहान मुलांची देखील त्यात आहुती झाली आहे. त्यामुळे, शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी याकडे जाणिवपुर्वक लक्ष घातले पाहिजे. ज्या शेतकऱ्याचे शेततळे असेल त्यांनी चांगले अवरण केले पाहिजे, चांगली तटबंदी केली पाहिजे, त्या तटबंदीला उंची असावी आणि सहज साधारण माणूस आत जाणार नाही अशी तजबिज असावी. शेततळ्यास एकच दरवाजा असावा, ज्यातून प्रवेश करता येईल आणि त्याची लॉक सिस्टम चांगली असावी. शेततळ्याच्या दरवाजाची चावी फक्त शेतकऱ्याकडे असावी. या पलिकडे जर शेतकऱ्याने शेततळ्यात मासे सोडले तर तो माशांचे संरक्षण म्हणून पुर्ण शेततळ्यावर जाळी मारत असतो. अन्यथा पानकोंबड्या माशांचे भक्ष करतात. त्यामुळे, जशी माशांची काळजी वाटते तशी माणसांची काळजी देखील बंधनकारक वाटली पाहिजे. अशा संरक्षणात्मक जाळ्या अनिवार्य केल्या पाहिजे. अशा काही नियम व अटींच्या अधिन राहून शेततळ्यांचा वापर केला पाहिजे. जो ह्या पुर्तता करणार नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.