इयत्ता १० वी च्या मुलीवर अत्याचार, गोंडस मुलीला दिला जन्म, ज्याच्या घरी मजुरीने कामाला गेली त्यानेच काळे तोंड केले, नराधम अटक!

 

सार्वभौम (संगमनेर) -: 

                दहावीत शिकणाऱ्या शालेय मुलीवर वारंवार अत्याचार झाला. त्यातुन ती गर्भवती राहिली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव परिसरात नोव्हेंबर 2023 दरम्यान घडली. दोन दिवसांपूर्वी मुलीचे अचानक पोट दुखू लागले. चक्कर येऊ लागली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचारकरत असताना  गर्भवती असल्याचे समजले. तेव्हा हा घडलेला सर्व प्रकार सर्वांच्या लक्षात आला. त्यानंतर पिडीत मुलीची प्रसुती करण्यात आली. तेव्हा तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर जेव्हा पिडीत मुलीची मानसिकता ठिक झाली तेव्हा तिने पोलिसांना जबाब दिला त्यावरून आरोपी ज्ञानेश्वर सोपान बोडखे (रा.तळेगाव, ता. संगमनेर) याच्यावर बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते करत आहे.           

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलीचे आई वडील व दोन भाऊ हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. पिडीत मुलगी ही दहावीचे शिक्षण घेऊन आई वडीलांना हातभार लावण्यासाठी शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी मकेची कुट्टी करण्यासाठी जात. सर्व कामगार हे आरोपी ज्ञानेश्वर बोडखे याच्या घरी जमा होत. त्यानंतर जिथे मकेची कुट्टी करायची आहे तिथे ट्रॅक्टरमध्ये सर्व मजुरांना आरोपी ज्ञानेश्वर बोडखे हा सोडवत. दहावीत शिकणारी पिडीत मुलगी ही देखील कामाला येत असल्याने तिची ओळख आरोपी ज्ञानेश्वरशी झाली. मात्र, आरोपी ज्ञानेश्वर याची पिडीत मुलीवर वाईट नजर होती. सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मका कापायची त्यानंतर ती गोळा करून रात्री अकरा वाजेपर्यंत मकेची कुट्टी करायची त्या दरम्यान पिडीत मुलीसोबत आरोपी ज्ञानेश्वर हा लगट करण्याचा प्रयत्न करत.

           दरम्यान, आरोपी ज्ञानेश्वर याची पत्नी देखील कामावर येत. मात्र, त्यांच्यामध्ये वाद होत असल्याने ती दोन चार दिवस माहेरी निघुन जात. त्यामुळे, हा पिडीत मुलीवर डाव टाकण्याचा प्रयत्न करीत. तु घरी चाल तुला गिफ्ट देतो असे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिडीत मुलीने नकार दिला. एकेदिवशी पिडीत मुलीचे आई वडील हे कामावर आले नाही. पिडीत मुलगी ही सकाळीच कामावर आली. संपूर्ण कुट्टी होईपर्यंत थांबली रात्रीचे अकरा वाजले तेव्हा आरोपी ज्ञानेश्वर हा घरी चल असा म्हणाला असता पिडीत मुलगी ओरडली तर त्याने धमकी देऊन घरी नेले. आरोपी ज्ञानेश्वरची पत्नी ही माहेरी गेली होती. याचाच फायदा उचलत आरोपी ज्ञानेश्वर याने दहावीत शिकणाऱ्या पिडीत मुलीचा नासमजपणाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला.

        दरम्यान, हा प्रकार एकदाच नाही. तर पुन्हा एकदा आरोपी ज्ञानेश्वर बोडखे याने धमकी देऊन घरी बोलावून बळजबरीने अत्याचार केला. या बाबत पिडीत मुलीने मौन बाळगले. पिडीत मुलीला त्रास जाणवत होता. मात्र, कोणाला सांगायची हिंम्मत झाली नाही. त्या दरम्यान पिडीत मुलीची तब्येत बिघडली. दोन दिवसांपूर्वी पिडीत मुलीचे पोट दुखू लागले. त्यामुळे, घरच्यांनी पिडीत मुलीला  रुग्णालयात नेले. तेथे पिडीत मुलीवर उपचार सुरू केले असता त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, पिडीत मुलगी ही गर्भवती आहे. वेळ कमी असल्यामुळे डॉक्टरांनी दाखल करून घेतले. त्यानंतर तिने गोंडस मुलीस जन्म दिला आहे. हा सर्व प्रकार भयानक असला तरी पिडीतेस घडल्या प्रकाराची माहिती विचारली असता तिने ज्ञानेश्वर बोडखे याचे नाव सांगितले. त्यानंतर त्याच्यावर बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.