दराडेंमुळेच लोखंडेंचा पराभव, लोक बोकड चाळ्यांना कांटाळलेत- तो पक्षातून गेल्यास येथे शिंदे गटाचा आमदार होईल- संजय वाकचौरे

सार्वभौम (अकोले) :- 

मा. खा.सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाल्यानंतर शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. एकट्या अकोले तालुक्यातून ५४ हजारांचे लिड खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळाले. त्यामुळे, शिर्डी मतदार संघाचे संपर्कप्रमुख बाजीराव दराडे हे अकोले तालुक्याचे असून त्यांची संपुर्ण तालुक्याला ऍलजी होती. इतकेच काय.! तर नेत्यांना देखील दराडे नको होते. असे असताना अगदी नियोजनपुर्वक लोखंडे यांचा पराभव करण्यात आला. त्या अपयशाचा मुख्य सुत्रधार बाजीराव दराडे असल्याचा घाणाघात शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय वाकचौरे यांनी केला आहे. बाजीराव दराडे हे शिंदे गटाचे नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असून सर्व पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडण्यात आले आहे. त्यामुळे, राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

दराडे यांनी सुपारी घेतली होती.!

अकोल्यात आमदार डॉ. किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड या दोघांना दराडे नको होते. तरी देखील नियोजन आपल्याकडे कसे राहिल असा प्रयत्न केला गेला. या दोन्ही नेत्यांच्या भेटी मा.खा. सदाशिव लोखंडे यांच्याशी होणार नाही यासाठी नियोजनपुर्वक काम करण्यात आले. ज्यांच्या भेटी व्हायला नको त्यांच्याशी मात्र दराडे यांनी भेटी घालुन दिल्या. डॉ. लहामटे आणि सिताराम पा. गायकर यांच्या विरोधात दशरथ सावंत आणि बी.जे.देशमुख यांना मुद्दाम भडकविण्यात आले. त्यामुळे, वातावरण अधिक दुषित झाले. हे सर्व दराडे यांनी नियोजनपुर्वक घडवून आणले. अकोले तालुक्यातील जनता आणि नेते हे आपल्या विरोधात आहे. हे माहित असताना देखील दराडे यांनी थांबून घेतले नाही. उलट न पटणार्‍या भुमिका घेतल्या. त्यामुळे, ५४ हजार मतांनी लोखंडे मागे पडले. दराडे यांच्या अनेक भुमिका फार संशयास्पद आहेत. त्यामुळे, त्यांनी सदाशिव लोखंडे यांना पाडण्याची सुपारी घेतली होती. असे आरोप संजय वाकचौरे यांनी केले.

दराडे जातीयवादी आहे.!

लोकसभा निवडणुकीत बाजीराव दराडे यांनी मराठा समाजाला जास्त टार्गेट केल्याचे पहायला मिळाले. संगमनेर गेस्ट हाऊस येथे देखील असाच प्रकार घडला. त्यामुळे, दरडे हे जातीयवादी व्यक्ती असून त्याचा तोटा लोकसभा निवडणुकीत झाल्याचे पहायला मिळाले असे वाकचौरे म्हणाले. मात्र, असे असले तरी, आम्ही शिवसैनिक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदाशिव लोखंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रामाणिकपणे काम केले. दराडे यांच्या मनमानी आणि भोंगळ कारभारामुळे ज्या गावात विशेष निधी दिला. त्या गावात देखील सदाशिव लोखंडे यांना मतदान मिळाले नाही. इतका रोष हा केवळ आणि केवळ बाजीराव दराडे यांच्यावर होता. त्यामुळे, अकोले तालुक्यात इतक्या मोठ्या मतांनी आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले असा आरोप शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय वाकचौरे यांनी केला.

तुमचे हे बोकड चाळे बंद करा..!

दराडे यांनी धरणाची जागा कशी खरेदी केली? धरण व्हावे असा यांनीच प्रस्ताव केला या घटनेच्या खोलात गेल्यास फार भयानक सत्य बाहेर येईल. आंबेवंगण येथे देखील जेसीबी चालकास मारहाण करुन पोलीस ठाण्यात राडा घातला. म्हणजे दराडे हे फक्त दहशत निर्माण करुन डॉन होण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अकोले तालुका हा पुरोगामी तालुका आहे. येथे येड्या-इदर्‍यांना स्थान नाही. हा बुळग्यांचा तालुका नाही. येथे माजलेल्यांच्या खच्चीकरणाची प्रक्रिया केली जाते. अकोले तालुक्याला खुन मारामार्‍यांची परंपरा नाही. तर, देशाच्या आणि राज्याच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थितीला दिशा देणारा हा तालुका आहे. त्यामुळे, नमुन खाल्ले तर टिकते आणि माजल्यासारखे केले तर जाते हा पुर्वीपासूनचा इतिहास आहे. त्यामुळे, येथे वागताना समजून उमजून वागले पाहिजे. लोक उपहासाने का होईना सिंगम म्हणत होते. मात्र, हे स्वत:ला डॉन समजायला लागले. त्यामुळे, त्यांच्या अशा वर्तनामुळे सदाशिव लोखंडे यांचा राजकीय बळी गेला. म्हणून त्यांनी आता तरी बोकड चाळे बंद करुन सुधरुन घेतले पाहिजे असे वाकचौरे यांनी यांनी त्यांच्या नेत्यांना सुनावले.

दराडेंचे संपर्कप्रमुख पद स्थानिक पातळीवरचे.!!

मी कोणतेही पद म्हणून पक्षाचे काम करीत नाही. तर, निष्ठावंत शिवसैनिक आणि शिंदे साहेबांचा समर्थक म्हणून पक्षात काम करतो आहे. त्यांनी मला अकोले तालुक्याध्यक्ष केले आहे. गेल्या दोन वर्षात मी कोणताही ठेका घेतला नाही. कोणाला दमबाजी व दादागिरी केली नाही. कोणत्याही अधिकारी आणि कामाशी एक रुपयांचा संबंध नाही. मी पद आणि राजकारण याकडे व्यवसायीक दृष्टीने पहात नाही. त्यामुळे, मला पदाहून काढल्यास दु:ख होणार नाही. मात्र, बाजीराव दारडे यांचे संपर्कप्रमुख पद हे स्थानिक पातळीवर दिले जाते का? हा मला पडलेला प्रश्‍न आहे. स्थानिक पातळीवर दिलेले संपर्कप्रमुख पद हे निवडणुक आयोगाकडे असते की नसते याबाबत मी अनभिज्ञ आहे. मात्र मला दिलेले तालुकाध्यक्ष पद हे निवडणुक अधिगृहीत केलेले आणि पक्षाच्या घटनेतील पद आहे असे म्हणत वाकचौरे यांनी बाजीराव दराडे यांचा खरपूस समाचार घेतला.

तर अकोल्यात शिंदे गटाचा आमदार.!

अकोल्यातून शिंदे गटाला ५४ हजारांपेक्षा कमी मते मिळाली. त्यामुळे, आम्हाला लाज वाटायला लागली आहे. आमचा पराभव का झाला याबाबत मी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. तसेच जो संघटना विकण्यासाठी काम करीत असेल आणि एकनाथ शिंदे यांना कोठे कमीपणा वाटेल असे कृत्य करीत असेल तर त्यांचे काय करावे याचा विचार करावा असे मत मांडले आहे. कोणाला पक्षातून काढावे असे नाही. मात्र, दराडे यांना पक्षातून काढून टाकल्यास काडीचेही नुकसान होणार नाही. उलट तालुक्यातील शिंदे साहेबांना माननारा मतदार अधिक ऍक्टीव्ह होईल. मात्र, बोकड चाळ्यांना कंटाळुन कार्यकर्ते पक्षात येत नाहीत. येणार्‍या काळात शिंदे साहेब घेतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशी भुमिका आमची असणार आहे. मात्र, जर शिवसेना अलिप्त लढली तर येथे विजयी होणार्‍यासाठी आम्ही निवडणुक लढवू आणि शिंदे गटाचा आमदार अकोल्यात करुन दाखवू असे मत शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय वाकचौरे यांनी व्यक्त केले.