प्रियकरासाठी आईनं दोन लेकरांची हत्या केली.! गावकर्‍यांच्या सजगतेमुळे दोघांवर गुन्हा, प्रियकर जेलमध्ये.! संगमनेरात भयान प्रकार.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

दि. १७ एप्रिल २०२४ रोजी संगमनेर तालुक्यातील प्रत्येकाच्या काळजावर घाव घालणारी घटना घडली होती. कारण, १२ वर्षाचा रितेश गंगाधर पावसे आणि आठ वर्षाचा प्रणव गंगाधर पावसे (दोघे रा. हिवरगाव पावसा) हे शेततळ्यात बुडून मयत झाल्याची बातमी पसरली आणि या घटनेने अनेकांच्या काळजाचा ठाव घेतला. मात्र, घटना घडल्यानंतर  अनेकांच्या मनात पाल चुकचूकत होती. की, हे दोन्ही चिलेपिले खरच बुडू शकतात का? तर मुळीच नाही. त्यांच्या आईचा प्रियकर आणि आई या दोघांनी पुर्वनियोजित कट रचून केलेले हे दोन मर्डर होते. का? तर, यांना नव्याने आयुष्य जगायचे होते आणि प्रेमातून यांना त्यांची मुले हवी होती. म्हणून दोघांनी या चिमुकल्यांचा जीव घेतल्याचे आता निष्पन्न होऊ लागले आहे. गावकर्‍यांनी जेव्हा या अपघातावर शंका निर्माण केली. तेव्हा, पोलिसांनी तपास करुन काही संशयीत गोष्टी लक्षात घेऊन कविता सारंगधर पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) व सचिन बाबाजी गाडे (रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, गाडे या प्रियकरास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दि. १७ एप्रिल २०२४ रोजी रितेश गंगाधर पावसे (वय १२) व प्रणव गंगाधर पावसे (वय ०८, दोघे रा. हिवरगाव पावसा) या बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यु झाला होता. मात्र, हा अपघात आहे की घातपात यावर अनेकांनी प्रश्‍नचिन्ह निर्माण केले होते. तेव्हापासून हिवरगावात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. मात्र, संबंधित मुलांच्या वडिलांकडचे नातेवाईक यांना या अपघातावर विश्‍वास पटत नव्हता. त्यामुळे, त्यांनी पोलीस निरीक्षक ग्रामीण यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यावर उत्तर मिळाले नाही. त्यानंतर या मयत मुलाच्या पालकांनी पोलीस उपाधिक्षक यांच्यापासून ते वरिष्ठ अधिकार्‍यापर्यंत तक्रारी केल्या. इतकेच काय.! संपुर्ण; हिवरगाव पावसा रस्त्यावर उतरला. मुलांना न्याय द्या, त्यांचे खरे मारेकरी कोण? त्यांचा शोध घ्या, त्यांना शिक्षा द्या, या घटनेची सखोल चौकशी करा अशा प्रकारची मागणी गावकर्‍यांनी केली होती.

दरम्यान, आजकाल संगमनेर तालुक्यात आंदोलन आणि मोर्चा काढल्याशिवाय गुन्हा दाखल होत नाही. अशी संकल्पना रुढ होऊ लागली आहे. म्हणून आंभोरे येथील अपघात हा देखील घातपात आहे. हे सांगण्यासाठी गावकर्‍यांना आंदोलन करावे लागले. तेव्हा लक्षात आले. की, हा अपघात नसून हत्या आहे. अगदी तसेच या मुलांच्या घटनेच्या बाबतीत देखील झाले आहे. त्यामुळे, घटना घडून दोन महिन्यांनी गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पंचनामा, जबाब, पुरावे आता काय हाती लागणार आहे? त्यामुळे, या बालकांना खरच न्याय मिळेल का? याबाबत शंका आहे. मात्र, एखाद्या घटनेत शंका असेल तर तत्काळ चौकशी होणे अपेक्षित आहे. अन्यथा गुन्हेगार मोकाट सुटल्याशिवाय राहणार नाही. आता यात प्रियकर गाडे यास अटक केली आहे. मात्र, पोलीस नेमकी काय तपास करतात आणि काय बाजू मांडतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शंका निर्माण झाली होती.!

गेल्या दिड वर्षापुर्वी कविता पावसे हिचा पती मयत झाला होता. तेव्हापासून ही रितेश आणि प्रणव या दोघांना संभाळत होती. मात्र, जेव्हापासून हिची सचिन गाडे याच्यासोबत मैत्री झाली होती. तेव्हापासून यांना मुले नको-नको वाटत होते. आपल्या स्वत:ची मुले असावी असे देखील यांना वाटत असल्याने यांनी कविता हिचे ऑपरेशन देखील उलटविण्यासाठी डॉक्टरांकडे धाव घेतली होती. असे पोलिसांनी तपासात निष्पन्न  करण्याचा काम केले आहे. घटना घडल्यानंतर स्थानिक परिसरात आरोपी सचिन गाडे याचे देखील लोकेशन मिळून येते आहे. तसेच पोलिसांनी यांच्या संभाषणासह व्हाटसऍप चॅटींग आणि अन्य गोष्टी देखील तपासणी सुरू केली आहे. एकंदर पोलिसांकडे या घटनेचा सबळ पुरावा नसला, तरी देखील परिस्थितीजन्य पुरावा लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यात ग्रामीण पोलिसांनी तपासात फारच हालगर्जीपणा केल्याचे दिसते आहे. त्यामुळे, बालकांना न्याय मिळतो की नाही. यावर देखील शंका निर्माण झाली आहे. 

असा केला होता बनाव.!

दि. १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमी असल्यामुळे मुलांना शाळा नव्हती. हे दोघे घरापासून काही अंतरावर सायकल खेळत होते. या दोघांनी सायकल पाटाच्या कडेने आणली आणि नंतर ते त्यांच्या एका नातेवाईकांच्या घरी गेले. तेथे काही काळ थांबल्यानंतर ही दोघे जवळच असणार्‍या शेततळ्याकडे गेले. तेथे खेळत असताना एका मुलाचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. तो बुडत असल्याचे पाहून दुसरा त्यास वाचविण्यासाठी गेला. मात्र, दोघे पाण्यात बुडाले आणि मयत झाले. काही काळानंतर शेततळ्यात चपला तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसल्या. त्यांनी चौकशी केली असता दोघे मुले पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. दरम्यान दोघांचा मृत्यु झालेला होता. त्यानंतर आईचा आक्रोश आणि तिच्या प्रियकराची नौटंकी यातून अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. घटना घडल्यानंतर त्याच दिवशी हिवगाव पावसा येथील अनेक नागरिकांच्या मनात शंका होती. मात्र, तत्काळ नव्हे.! पण, काही दिवसांनी गावाने एकी दाखविली आणि दडपलेला गुन्हा दाखल करायला लावला आहे.