कॉलेजच्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा प्रवरेत बुडून मृत्यू, तीन दिवसात 10 बुडाले आठ मयत.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   संगमनेर शहराच्या लगत असणाऱ्या गंगामाई घाटावर दोन विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि.24 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात आदित्य रामनाथ मोरे (वय-17 रा. घुलेवाडी,ता. संगमनेर) व श्रीपाद सुरेश काळे (वय- 17 रा. कोळवाडे, ता. संगमनेर) यांचा मृत्यू झाला आहे. सुगाव बु येथील घटनेतील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोन बेपत्ता लोक शोधण्यासाठी प्रवरेत सोडलेले आवर्तन बंद केले तरी देखील अवैध वाळुमुळे झालेल्या खड्ड्यांमुळे पाण्यात ठाव लागला नाही त्यामुळे दोघे अचानक एका खोल खड्ड्यात गेले आणि त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे, संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, आदित्य व श्रीपाद हे दोघे शिक्षण घेत होते. ते कॉलेजच्या मित्रांसोबत एकत्रितपणे दुपारच्यावेळी घुलेवाडी परिसरात एकत्रीत बसले. मित्रांनी मिळुन प्रवरा नदीवर पोहायला जाण्याचा निर्णय घेतला. ते आपापल्या गाडीवर गंगामाई घाटावर आले आणि गर्मी थंड करण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. यावेळी त्यांना पाण्याचा फारसा ठाव लागला नाही. गंगामाई घाटावर नदीच्या कडेला पाणी कमी असून जसजसे आत जाऊ तसतसे पाणी पात्र खोल होत गेले आहे. अर्थात ही वाळु तस्कारांची पुण्याई आहे. त्यामुळे, कोठे अचानक खड्डा तर कोठे संथ भाग असे नदीपात्र झाले आहे.

           दरम्यान, सर्व मित्रकडेला पोहत होते. मात्र, आदित्य व श्रीपाद हे संतगतीने असणाऱ्या खड्ड्याकडे गेले एका ठिकाणी खोल गर्त्यात सापडले. जेव्हा या दोघांच्या नाका तोंडात पाणी जायला सुरूवात झाली तेव्हा यांनी गटांगळ्या खाल्ल्या. वाचवा, वाचवा म्हणून आवाज देखील दिला. मात्र, ठाव न लागल्याने दोघांना पुरेसा श्‍वास घेता आला नाही. त्यामुळे,दोघांना मृत्यूला सामोरे जावा लागले. काल अकोल्यातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आता पुन्हा संगमनेरातील दोन युवकांचा  प्रवरा नदीपात्रात पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका हळहळ व्यक्त करत आहे. खरंतर, सुगाव बु येथील घटनेतील दोन व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रवरा नदीत सोडलेले आवर्तन बंद केले होते. तरी देखील संगमनेरातील दोन युवक पाण्यात बुडून मृत्यू झाले. त्यामुळे, प्रवरा नदीपात्राचे वाळुचे किती लचके प्रशासनाच्या आशिर्वादाने तोडले आहे हे न बोलले बरे.

             जसा उन्हाळा सुरू झाला आहे. तेव्हपासून नदी किंवा अन्य पाण्याच्या ठिकाणी अनेकजण पोहायला जाताना दिसतात. त्यांच्या सोबत लहान मुले देखील असतात. त्यामुळे, अशा व्यक्तींनी यातून काहीतरी धडा घेतला पाहिजे. कारण, आजकाल मृत्यु इतका स्वस्त झाला आहे. की, कोणत्या क्षणाला व कोणत्या रुपात तो येईल याचा काहीच नियम नाही. त्यामुळे, पालकांनी आपल्या मुलांना पाण्यापासून सावध ठेवले पाहिजे. स्वत: देखील उष्णतेपासून वाचण्यासाठी नदी, नाले, शेततळे हा पर्याय वापरता कामा नये.