राजूर परिसरात अपघात, अकोल्याचा एक ठार चौघे जखमी.! आज हळद उद्या लग्न होते.!

सार्वभौम (राजूर) :- 

अकोले तालुक्यातील रंधा परिसरात हाळदीचा समारंभ आटपून गाडी धुण्यासाठी राजूर येथे जाणार्‍या गाडीचा अपघात झाला. यात एक तरुण जागीच ठार झाला असून चौघे किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज दि. १६ मे २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास केळुंगण परिसरात घडली. यात निहाल संतोष रुपवते (वय १९, रा. अकोले) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून यात स्वप्नील दिवे (राजूर), पारस पराड (खिरविरे), अनिकेत सोनवणे (शिंगणवाडी) सागर पवार (रंधा) अशी चौघे सुखरुप आहेत. नवा चालक आणि गाडीने दोन पलट्या घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. निहाल हा प्रचंड प्रामाणिक व हुशार आणि होतकरु तरुण होता. वडिल नगरपंचायत अकोले येथे कर्मचारी आहेत तर निहाल सुट्टात दोन पैसे शिक्षणासाठी व्हावे म्हणून एका ठिकाणी काम करत होते. प्रचंड सुसंस्कारी व हूशार असणाऱ्या तरुणाचे जाणे हे तालुक्याच्या मनाला चटका लावून गेले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, रंधा परिसरात एका नातेवाईकाची हाळद होती. या कार्यक्रमात मुलांनी मनसोक्त हाळद समारंभाचा अस्वाद घेतला आणि एम.एच ०५ एएक्स ०८६५ ही गाडी धुण्यासाठी ते राजूर येथे जातो असे सांगून हे पाचजण रंधाफॉलहून राजुरकडे निघाले होते. गाडी रंधा क्रॉस करुन केळुंगण येथे आली असता चालक हा फारसा अनुभवी नव्हता. त्यामुळे थोडीशी चूक झाली आणि गाडीची स्टेअरींग लॉक होऊन रस्ता सोडून खाली गेली. वाहन चालकाने गाडी ताब्यात ठेवण्याचा फार प्रयत्न केला. मात्र, त्याला ते शक्य झाले नाही.

दरम्यान, गाडीच्या किन्नर बाजूने निहाल रुपवते बसलेला होता. गाडीने पलटी घेतली असता निहालच्या डोंक्याला मार लागला. गाडीने दोन पलट्या घेतल्याने निहाल अधिक जखमी झाला, त्याच्या मेंदूला गंभीर मार लागला, त्यामुळे, अंतर्गत रक्तस्त्रावाने तो जागीच ठार झाला. यावेळी अन्य चौघांनी मोठ्या प्रसंगावधानाने स्वत:ला वाचविले. यावेळी या मित्रांनी निहालला देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी वाचविण्याचा प्रयत्न करुन देखील ते शक्य झाले नाही. दरम्यान, ही चौघे तरुण प्रचंड घाबरलेले होते.

हा प्रकार काही प्रवाशांनी पाहिला असता त्यांनी या तरुणांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर निहालसाठी फार उशिर झाला होता. त्यानंतर या तरुणांनी देखील काही नातेवाईकांना फोन करून घटनास्थळी बोलाविले. राजूर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चौघे सुखरुप असून त्यांना धिर देण्याचे काम पालकांनी केला. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून यात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, अतिशय कोवळ्या वयात निहाल सारखा हुशार तरुण सोडून गेल्यामुळे, एकच रडारड झाली होती.

खरंतर घोटी ते संगमनेर हा हायवे झाल्यापासून अकोले ते राजूर या महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. गेल्या महिन्याभरात १० पेक्षा जास्त आदिवासी तरुणांचे अपघात होऊन त्यांनी जग सोडले आहे. त्यामुळे, गाव व शाळा तेथे गतिरोधक, वळणांवर पाट्या, जंगलाची ठिकाणे आहेत तेथे पाट्या, उतार, चढ, घट अशा ठिकाणी पाट्या किंवा दिशादर्शन फलक लावण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी रोडच्या साइॅड पट्ट्या भरलेेल्या नाहीत. अशा अनेक कारणांमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यावर प्रशासनेने दखल घेऊन उपायोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.