बाबो.! २० आठवड्याच्या बाळाचा गर्भपात.! आईने केला घात बापाला झाला मनस्ताप, सासू व पत्नीसह मेडिकलवालीचा गुन्हा.!


 सार्वभौम (संगमनेर) :- 

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका महिलेने कॉलेज मध्ये शिक्षण घेत असल्याने आपल्या पतीच्या परस्पर २० आठवड्याच्या बाळाचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा असो वा मुलगी, मला बाळ हवे आहे असा अग्रह धरणार्‍या पतीला न सांगता पती संगमनेर शहरातील ताजणे मळा परिसरात असणार्‍या एका मेडिकलमध्ये गेली आणि तेथील एका महिलेकडून नाव नसलेल्या सोनोग्राफी सेंटर मध्ये जाऊन हा गर्भपात केला. ही बाब जेव्हा पतीस माहित झाली तेव्हा त्यांना फार मोठा धक्का बसला. त्यामुळे त्यांनी थेट पोलीस निरीक्षक घारगाव यांच्यासह अन्य ठिकाणी अर्ज दाखल करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, यावर अद्याप कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही. परंतु चौकशी करुन यात गुन्हा दाखल करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दि. ९ डिसेंबर २०२० रोजी सिन्नर तालुक्यातील दुसुंगवाडी-वावी येथील एका व्यक्तीचा विवाह घारगाव येथील एका तरुणीशी झाला होता. त्यानंतर त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर २०२३ मध्ये पुन्हा या महिलेचे पोट दुखु लागले असता त्यानी दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी मेडिकलमध्ये जाऊन प्रेगा टेस्ट आणून घरी तपासणी केली होती. तेव्हा यांच्या लक्षात आले. की, टेस्ट पॉझिटीव्ह असून पत्नीस पुन्हा दिवस गेले आहे. तेव्हापासून पती हा पत्नीची चांगली काळजी घेत होता. तिला हवे ते खायला देणे, घरात काम कमी सांगणे अशा काही गोष्टी सुरू झाल्या होत्या. तर, घरात पुन्हा एकदा प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, होणार्‍या बाळाची काळजी म्हणून पतीने पत्नीस राहाता येथील एका डॉक्टरकडे नेले होते. तेथे सोनोग्राफी करुन ओरीजनल रिपोर्ट घेतले होते. त्याची पावती देखील जपून ठेवली होती. जेव्हा सोनोग्राफी केली होती. तेव्हा बाळ हे १४ आठवड्यांचे होते. हे दाम्पत्य घरी गेल्यानंतर त्यांनी बाळाची काळजी घेण्यासाठी सर्व गोळ्या घेतल्या होत्या. त्याला जे आवश्यक आहे ते देखील पुरविले जात होते. तर दि. ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ही दोघे सिन्नर तालुक्यातील दुसुंगवाडी-वावी येथे रहात होते. त्यानंतर संबंधित आई ही संगमनेर तालुक्यातील असल्यामुळे तिने पदविधर होण्यासाठी एका ठिकाणी प्रवेश घेतला होता. त्यामुळे ती गावाकडे घारगाव येथे आली होती.

जेव्हा ही गर्भवती महिला घारगाव येथे गेली होती. तेव्हा तिचे बाळ हे १९ ते २० आठवड्याचे होते. तेव्हाच पती म्हणत होता. की, आता बाळ मोठे होत आहे. तू प्रवास करणे योग्य नाही, तुला किंवा आपल्या बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे, पत्नीने परिक्षा देण्यासाठी जावे अशी त्याची बिल्कुल मानसिकता नव्हती. मात्र, परिक्षा देणे गरजेचे वाटल्याने पत्नीने घारगावला जाणे पसंत केले. ती माहेरी निघुन आली असता त्यांच्यात तात्विक मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांच्यात फोनहून चर्चा होत होती. पती तिला सांगत होता बाळाची काळजी घेण्यासाठी तुला काळजी घ्यावी लागेल. मात्र, तेव्हापासून पत्नीची मानसिकता होती. की, हे बाळच मला नको आहे. त्यामुळे, यांच्यात फोनहुन वादीवाद देखील होत होते.

दरम्यान, एकदा दोघांचा फोन सुरू होता, तेव्हा पत्नी म्हणाली. की, मी निर्णय घेतला आहे. मला हे बाळ ठेवायचे नाही. मी हे बाळ पाडून टाकणार आहे. असे बोलण्यास सुरुवात केली असता पतीला मनस्ताप झाला. तेव्हा त्याने स्पष्ट शब्दात सांगितले. की, मला हे बाळ हवे आहे. मुलगा असो वा मुलगी तु त्याचा गर्भपात करणार नाही. अशा प्रकारे पतीने ठामपणे निर्णय सांगितला होता. मात्र, ती काही एकण्यास तयार नव्हती. पती हे बाळ ठेवण्यास अग्रह करतो आहे हे लक्षात आल्यानंतर पत्नीने त्यांच्याशी फोनवर बोलण्यास टाळाटाळ सुरू केली. कधी फोन न उचलणे, मोबाईल बंद करुन ठेवणे, दुसरे कोणालातरी बोलण्यास देणे असे प्रकार सुरू झाले होते.

दरम्यान आपल्या लेकराचे काही बरेवाईट होऊ नये म्हणून बाप सारखा फोन करीत होता. मात्र, वारंवार निराशा पदरी येत होती. त्यानंतर त्याने तेथील आपल्या मित्राच्या फोनवर फोन केला की यांचे बोलणे होत होते. दि. १९ एप्रिल २०२४ रोजी पत्नीने सांगितले. की, मी हे बाळ पाडले आहे. हे ऐकल्यानंतर पतीस फार मोठा धक्का बसला. तेव्हा पतीने विचारले की, तु हे कोठे आणि कोणी-कोणी केले? तेव्हा ती म्हणली. की, मला करण्यासाठी कोठून चैतन्य मिळाले हे मी सांगणार नाही. मात्र, गुडनेस माझे की जे काही झाले ते चांगले झाले असून मी सुखरूप आहे. मला आशा आहे की, जे काही झाले ते विसरुन तुमच्या चेहर्‍यावर हास्ये कायम राहिल. या मेडिकलमधील महिलेने सांगितले होते. की, तुला जर कधी बाळ पाडायचे असेल तर माझ्याकडे ये. त्यानंतर ही त्या महिलेकडे गेली आणि कुठलेही नाव नसलेल्या सोनोग्राफी केंद्रात जाऊन बाळ पाडले.

दरम्यान, दोन दिवस या घटनेमुळे पतीस फार मानसिक त्रास झाला. पत्नीने इतका मोठा निर्णय परस्पर घेतला, २० आठवड्यांचे बाळ पाडून टाकले. मुलगा असो वा मुलगी बाळ जन्माला ना घालणे किती मोठे पाप आणि गुन्हा आहे असे अनेक प्रश्‍न पतीस पडले. त्यानंतर त्याने निर्णय घेतला की. ज्यांनी ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे, संबंधित व्यक्तीने सदर प्रकाराबाबत घारगाव पोलीस निरीक्षक, पोलीस उपाधिक्षक संगमनेर, पोलीस अधिक्षक अ.नगर यांना पत्र लिहून मयत झालेल्या बाळाला न्या द्यावा अशी प्रकारची मागणी केली आहे. तर, मेडिलक चालक महिला, सोनोग्राफी सेंटर, पत्नी आणि तिला मदत करणारी सासू अशा व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. आता यात चौकशी होते की नाही, गुन्हा दाखल होतो की नाही की असेच प्रकरण दडपले जाते हे पाहणे महत्वाचे आहे.

अकोल्यात अल्पवयीन मुलीचा गर्भपात.! 

दरम्यान, अकोले तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये देखील अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, याबाबत वैद्यकीय प्रशासन गाढ झोपेत असून त्यांना याची खबर देखील नाही. यात काही व्यक्तींशी फार मोठी अर्थपुर्ण तडजोड झाली असून हे प्रकरण गेल्या महिनाभरात दडपून टाकले आहे. एकतर अकोले तालुक्यात अल्पवयीन प्रेम प्रकरणे आणि त्यातून होणारे अत्याचार व गरोदर अल्पवयीन मुली हे प्रमाण फार मोठे आहे. त्यात बहुतांशी वेळा गुन्हे देखील दाखल होत नाही. तर, समाजसेवा आणि कॅम्प घेण्याच्या नावाने प्रसिद्ध होऊन काही डॉक्टर अल्पवयीन मुलींचे गर्भपात करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची प्रशासनाने सखोल चौकशी केल्यास अधिक धक्कादायक माहिती समोर येऊ शकते अशी माहिती विश्‍वसनिय सुत्रांनी दिली आहे.